Headlines

BSF BGB Standoff: BSF-BGB आमनेसामने; भारत-बांग्लादेश सीमेवर हायव्होल्टेज ड्रामा; झीरो लाईनवर अडकलेला ‘तो’ नेमका कोण?


BSF BGB Standoff: एका ५५ वर्षीय व्यक्तीनं भारतात शिरण्याचा प्रयत्न केला. जवानांनी त्याला हुसकावून लावलं आणि माघारी धाडलं. पण बांग्लादेशी सैनिकांनीदेखील त्याला देशात घेण्यास नकार दिला आणि सीमेवर तणाव वाढला.

indian bangla border
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली/ढाका: भारत आणि बांग्लादेशच्या सीमेवर मेघालयच्या नैऋत्य गारो हिल्स जिल्ह्यात एक अनोखी घटना घडली. इथे एक बांग्लादेशी नागरिक कित्येक तास अडकून पडला होता. अखेर त्याची ओळख पटल्यावर त्याला ११ जूनला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलं. त्या व्यक्तीची खरी ओळख पटली असून तो हिंदू समुदायाचा आहे. बांग्लादेशच्या सुरक्षा दलांनी त्याला जाणूनबुजून भारतात पाठवण्याचा प्रयत्न केला होता.

संपूर्ण प्रकरण सती राजबंशी नावाच्या ५५ वर्षीय व्यक्तीशी संबंधित आहे. सती राजबंशी बांग्लादेशच्या राजेशाही जिल्ह्यातील गुडागाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चलना गावचे रहिवासी आहेत. सीमा सुरक्षा दलानं दिलेल्या माहितीनुसार, वैध कागदपत्रांशिवाय सती राजबंशी यांनी भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मेघालयच्या महेंद्रगंज जवळ असलेल्या नंदिरचार सेक्टरमध्ये पकडण्यात आलं.
Maharashtra TimesEVM Fire: बंगालमध्ये सरकारी इमारतीला आग, 4000 EVM जळून खाक; मंत्र्यांकडून संशय व्यक्त
भारतीय सीमा सुरक्षा दलानं सती राजबंशी यांना नियमानुसार बांग्लादेशच्या दिशेनं पाठवून दिलं होतं. पण बांग्लादेश बॉर्डर गार्डनं त्यांना देशात घेण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर सती राजबंशी दोन्ही देशांच्या सीमांच्या दरम्यान असलेल्या निर्मनुष्य भागात अडकले. BSF आणि BGB च्या अधिकाऱ्यांमध्ये सती राजबंशी यांची ओळख आणि नागरिकत्वावरुन वाद झाला. त्यामुळे सीमावर्ती भागात तणाव वाढला.

यानंतर दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा यंत्रणांची कमांडर स्तरावर फ्लॅग मीटिंगदेखील झाली. पण सुरुवातीच्या टप्प्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सती राजबंशी संपूर्ण रात्र सीमेवरच होते. यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद सुरू असल्याचं दिसलं. सती राजबंशी सीमेवर अडकल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Maharashtra TimesYouth Drown: सुंदर लोकेशन अन् निसर्गरम्य कुंड; प्री-वेडिंग शूटवेळी अर्जुनचा शेवट; अखेरच्या क्षणी काय घडलं?
राजबंशी पूर्णपणे बांग्लादेशी नागरिक असून त्यांना राजशाही येथील त्यांच्या गावातूनच आणण्यात आल्याचा बीएसएफचा दावा होता. सती राजबंशी दिव्यांग असल्याचे दावेही बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी खोडून काढले. बांग्लादेशी अधिकाऱ्यांनीच सती राजबंशी यांना पकडून भारतीय हद्दीत ढकलण्याचा प्रयत्न केले. पण भारतीय जवानांनी ते हाणून पाडले, असा दावा बीएसएफकडून करण्यात आला.

अखेर गुरुवारी सकाळी तणाव संपुष्टात आला. सती राजबंशी यांचे कुटुंबीय आवश्यक कागदपत्रांसह सीमेवर पोहोचले. दस्तावेजांच्या तपासणीनंतर अधिकाऱ्यांनी त्यांना कुटुंबाच्या ताब्यात दिलं. बांग्लादेशातून होणारी अवैध घुसखोरी रोखण्यासाठी पूर्व सीमेवर सध्या टेहळणी वाढवण्यात आली आहे. ईशान्य भारतात सुरक्षा यंत्रणा सातत्यानं परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा