Wildlife Viral Video: रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात वाघ आणि अस्वल आमनेसामने आले. या संघर्षात अखेर कोण बाजी मारली, हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हायरल व्हिडिओ पाहा. या व्हिडिओमध्ये जंगलातील दोन बलाढ्य प्राण्यांची समजूतदार वर्तणूक आणि संघर्ष टाळण्याची वृत्ती पाहायला मिळेल.

शेवटी कोण जिंकलं?
हा व्हिडिओ ranthamborejunglesafari या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये वाघ आणि अस्वल आमनेसामने आल्याचं दिसतं. एक वाघ शांतपणे बसलेला असताना त्याच्या नजरेसमोरून एक अस्वल जात होतं. अस्वलाला पाहताच वाघ सावध झाला. कारण अस्वलही तितकाच धोकादायक प्राणी आहे. आपल्या क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी वाघ पुढे सरसावला. वाघ समोर येताना पाहून कोणताही प्राणी घाबरला असता. मात्र, अस्वल पळून जाण्याऐवजी लढाईच्या पवित्र्यात उभं राहिलं. त्यानं डोळ्याला डोळा भिडवत वाघाला आव्हान दिलं. अस्वलाचा आवेश पाहून वाघानंही आपला आक्रमकपणा कमी केला. बहुधा अस्वलही लढाईच्या तयारीत नव्हतं. त्यामुळे ते शांतपणे मागे फिरलं आणि वाघही आपल्या जागेवर परतला.
(फोटो सौजन्य – ranthamborejunglesafari/Instagram)
लढाईमध्ये घडलं काय?
वाघ कितीही शक्तिशाली असला तरी तो आपली ताकद विनाकारण वापरत नाही. हीच गोष्ट अस्वलाच्या बाबतीतही लागू पडते. दोघेही आपल्या शक्तीचा वापर प्रामुख्यानं अन्न मिळवण्यासाठी किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी करतात. केवळ ताकद आहे म्हणून ते प्रत्येकाशी संघर्ष करत नाहीत. विशेषतः समोर तितकाच बलाढ्य प्रतिस्पर्धी असेल, तर शक्यतो संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण अशा लढाईत ते स्वतःही गंभीर जखमी होऊ शकतात. दुखापतीतून सावरण्यासाठी त्यांना अनेक महिने लागू शकतात. त्या काळात अन्न मिळालं नाही, तर त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. शिवाय त्यांच्या प्रदेशावर दुसरा प्राणीही कब्जा करू शकतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये दोघांनीही एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत संघर्ष टाळणंच पसंत केलं.

