बरोबर २६ वर्षांपूर्वी २० जून २००० रोजी विज्ञानक्षितिजावर एक अलौकिक घटना घडली! एका बहुराष्ट्रीय, प्रदीर्घकालीन, महाखर्चिक, अतिमहत्त्वाकांक्षी, महासंशोधन प्रकल्पाच्या निष्कर्षांची घोषणा करण्यात आली! तो एवढा महत्त्वाचा प्रकल्प होता की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी एकाच वेळी वॉशिंग्टन आणि लंडनमधून ही संयुक्त घोषणा केली. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. बिल क्लिंटन यांच्याबरोबर ही घोषणा करताना या महाप्रकल्पातील दोन प्रमुख शास्त्रज्ञ हजर होते. सरकारी प्रकल्पाचे नेतृत्व करणारे फ्रान्सिस कॉलिन्स आणि सेलेरा जिनोमिक्स या खासगी कंपनीतून हा प्रकल्प यशस्वी करणारे डॉ. जे. क्रेग व्हेन्टर! हा प्रकल्प म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. नुकतेच क्रेग व्हेन्टर वयाच्या ७९ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. अनेक वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामनिर्देशन होऊनसुद्धा नोबेल हुकलेले शास्त्रज्ञ! एक अक्षरशः अफाट, अचाट, बंडखोर, वादळी व्यक्तिमत्त्व!
माणसाच्या प्रत्येक पेशीत ४६ गुणसूत्रे असतात. प्रत्येक गुणसूत्र डीएनएच्या धाग्याने बनलेले असते माणसाच्या पेशीत असलेला समग्र डीएनएचा संच म्हणजेच जिनोम. डीएनए हा अॅडेनाईन, ग्वानाईन, थायमाईन, सायटोईन या चार मुळाक्षरांना आलटून पालटून जोडून बनलेला असतो. या संपूर्ण डीएनएवरील अॅडेनाईन, ग्वानाईन, थायमाईन, सायटोईन या चार रासायनिक मुळाक्षरांचा अनुक्रम शोधून काढणं हे ह्यूमन जिनोम प्रोजेक्टचे ध्येय होते. यासाठी डीएनए सिक्वेन्सिंग तंत्रज्ञान वापरले जाते. आपल्या पेशीतील डीएनएमध्ये जवळजवळ ३.२ अब्ज अशी रासायनिक मुळाक्षरे असतात. जिनोमवरील या चार रासायनिक मुळाक्षरांच्या क्रमवारीचा पहिला खर्डा या दिवशी जाहीर केला! ही क्रमवारी म्हणजे माणसाच्या आयुष्याची पटकथा.
क्रेग व्हेन्टर यांनी आयुष्यात फक्त ह्युमन जिनोम प्रोजेक्ट एवढेच काम केले असते तरी ते अजरामर झाले असते. मग ते क्रेग व्हेन्टर कसले! आयुष्यभर ते विज्ञानाची अत्युच्च शिखरे एकापाठोपाठ एक सर करीतच राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत हा माणूस झपाटल्यासारखा संशोधनकार्य करीत होता. प्रत्येक संशोधन प्रकल्पामध्ये ते सरधोपटमार्गाने, मळलेल्या वाटेने कधीही जात नसत. ह्यूमन जिनोम प्रोजेक्टचं उदाहरण घेऊ या. हा सरकारी प्रकल्प १९९० साली सुरू झाला. अब्जावधी डॉलर्स त्यावर खर्च केले. क्रेग व्हेन्टर यांनी १९९८ मध्ये सेलेरा जिनोमिक्स नावाची स्वतःची खासगी कंपनी स्थापन करून या प्रकल्पात उडी घेतली. काळाच्या पुढे पाहणाऱ्या या शास्त्रज्ञाने अॅप्लाईड बायोसिस्टीम या कंपनीने नुकतीच बाजारात आणलेली स्वयंचलित डीएनए सिक्वेन्सिंग मशीन्स मोठ्या प्रमाणात वापरली. या सिक्वेन्सिंग मशीन्सचे ते जगातील पहिले ग्राहक होते. कम्प्युटर आणि सुपर कम्प्युटरची मदत घेतली आणि केवळ दोन वर्षांत आणि कितीतरी पटीने कमी खर्चात २००० साली सरकारी प्रकल्पाच्या खांद्याला खांदा लावून बिल क्लिंटन यांच्याकडून यशस्वीतेची घोषणा केली! या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारी कंपनी आणि क्रेग व्हेन्टर यांची खासगी कंपनी यांच्यात तगडी स्पर्धा होती. शेवटी सामना सामंजस्याने बरोबरीत सुटला! क्रेग व्हेन्टर यांनी शोधून काढलेल्या जिनोमच्या क्रमवारीला ‘सायन्स’ या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये स्थान मिळाले तर सरकारी प्रकल्पातून शोधून काढलेल्या जिनोमच्या क्रमवारीला ‘नेचर’ या दुसऱ्या जगप्रसिद्ध संशोधन पत्रिकेत स्थान मिळाले!
या आधी १९९५ साली दि इन्स्टिट्यूट फॉर जिनॉमिक रिसर्च या त्यांनीच स्थापन केलेल्या कंपनीमध्ये क्रेग व्हेन्टर यांनी हिमोफायलस इन्फ्लुएन्झे नावाच्या जिवाणूच्या जिनोमची क्रमवारी जगात सर्वप्रथम शोधून काढली. जिनोमची क्रमवारी शोधून काढलेला जगातील हा पहिला जिवाणू. २००० साली ड्रोसोफिला मेलॅनोगॅस्टर नावाच्या फळमाशीच्या जिनोमची क्रमवारी त्यांनीच जगात पहिल्यांदा शोधून काढली! सेलेरा जिनॉमिक्स या त्यांच्याच कंपनीमध्ये त्यांनी हा पराक्रम केला. जिनोमची क्रमवारी शोधून काढलेला कीटक गटातील पृथ्वीतलावरील हा पहिला कीटक म्हणजे ही फळमाशी!
कंपन्या तरी किती स्थापन कराव्यात या माणसाने? सेलेरा जिनॉमिक्स, दि इन्स्टिट्यूट फॉर जिनामिक रिसर्च, जे क्रेग व्हेन्टर इन्स्टिट्यूट, ह्यूमन लॉंगेविटी इनकार्पोरेशन, सिंथेटिक जिनॉमिक्स, डिप्लॉयड जिनोमिक्स वगैरे वगैरे. खऱ्या अर्थाने उद्योगपती-शास्त्रज्ञ म्हणता येईल असे हे अचाट, धाडसी, धडाडीचे व्यक्तिमत्त्व अनेक शास्त्रज्ञ कल्पनाही करू शकणार नाहीत एवढे ते श्रीमंत होते. त्यांच्याकडे साॅसेरर नावाची स्वतःची खासगी मालकीची दहा लाख डॉलर्स किमतीची आलिशान नौका (याॅट) होती! तिचा नुसता देखभालीचा वार्षिक खर्च ३ लाख डॉलर्स होता.
या धडाकेबाज शास्त्रज्ञाने २०१० साली जे संशोधन प्रसिद्ध केले त्याचे वर्णन आक्रीत या शब्दात करावे लागेल. एका लहानात लहान जिवाणूच्या जिनोमवरील सर्व जनुकांचा त्यांनी अभ्यास केला. या जिवाणूला जगण्यासाठी कमीत कमी किती जनुके आवश्यक आहेत याचा अंदाज बांधला. आणि हा डीएनए प्रयोगशाळेतील निर्जीव रसायने वापरून तयार केला. अॅडेनाईन, ग्वानाईन, थायमाईन, सायटोईन ही चार रासायनिक मुळाक्षरे विशिष्ट क्रमाने जोडून हा डीएनए प्रयोगशाळेत तयार करण्यात आला. हा डीएनए म्हणजे त्या जिवाणूचे सॉफ्टवेअर! या सॉफ्टवेअरचे जिवाणूच्या पेशीमध्ये रोपण करण्यात आले आणि काय आश्चर्य! हे सॉफ्टवेअर वापरून तो जिवाणू स्वतःचे विभाजन करू लागला. हा नवीन जिवाणू वाढू लागला! जगू लागला! सिंथेटिक बायोलॉजी या नवीन जीवशास्त्र शाखेचा भक्कम पाया या संशोधनाने घातला गेला. या कृत्रिम किंवा संश्लेषित जिवाणूला सिंथिया १.० असे नाव दिले. जे क्रेग व्हेन्टर रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये हे जिवाणूचे बाळ जन्माला आले. त्यांनी केलेल्या संशोधनाचा एक एक ऐवज नोबेल पारितोषिकाच्या तोडीचा आहे.
२००३ साली ते त्यांच्या मित्रमंडळीसह सागरसफर मोहिमेवर निघाले. सागरसफरीची बीजं त्यांच्या बालपणात रुजलेली आहेत. पोहणे, सागर नौका विहार, सागरांच्या लाटांवरील सर्फिंग हे त्यांचे आवडते खेळ. ऐन तारुण्यात ते ट्रान्स-अटलांटिक नौकानयन स्पर्धेत पहिले आले होते. त्यामुळे महासागर त्यांना नेहमीच खुणावत असे. चार्ल्स डार्विन यांच्याकडून प्रेरणा घेऊन यांनी ज्या मार्गाने सागरसफर केली होती, त्याच मार्गाने त्यांनी जायचे ठरवले. सॉरसेरर II ही आलिशान नौका त्यासाठी सज्ज करण्यात झाली. या स्वतःच्या मालकीच्या नौकेवर सुसज्ज प्रयोगशाळा उभारली. ६५००० नॉटीकल मैल प्रवास करून आणि जवळजवळ २३ देशांमध्ये थांबून ही नौका परत आली. या सागर मोहिमेवर त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. यावेळी त्यांनी महासागरातील जिवाणूंचे असंख्य नमुने गोळा केले. जिवाणूंच्या जवळजवळ दहा कोटी जनुकांची बेगमी त्यांना गवसली. जनुक-भांडार, जनुक-खजिना त्यांच्या हाती लागला!
या सागरी जिवाणूंचा आणि त्यातील जनुकांचा उपयोग करून नवीन इंधने तयार करता येतील का यावर त्यांचे संशोधन सुरू होते. या जिवाणूंचा आणखी कशासाठी उपयोग करून घेता येईल यावरही अभ्यास सुरू होता. त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये हा अभ्यास यापुढेही सुरू राहील. परंतु मार्गदर्शन करायला आता क्रेग व्हेन्टर नसतील. क्रेग व्हेन्टर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील असंख्य पारितोषिकं, मानसन्मान मिळाले. परंतु त्यांना नोबेल पारितोषिक न मिळाल्याची खंत त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम राहील!
(लेखक जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)

