भारतात मान्सूनच्या संथ प्रगतीची चर्चा सुरू असताना, हजारो किलोमीटर दूर युरोपमध्ये आणखी चिंताजनक हवामान संकट उभे राहिले आहे. फ्रान्ससह अनेक युरोपीय देशांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, आरोग्य यंत्रणांवर ताण वाढला आहे, वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण झाले आहेत आणि बदलत्या हवामानाविषयीच्या चिंतेला नव्याने खतपाणी मिळाले आहे.
ही उष्णतेची लाट केवळ एका देशापुरती मर्यादित नाही. आयर्लंड, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, इटली, स्वित्झर्लंड, रोमानिया आणि बल्गेरियासह युरोपातील अनेक भागांमध्ये मे महिन्याच्या उत्तरार्धापासून तापमानाचा पारा सातत्याने चढत आहे. मे महिन्यात सुरू झालेली उष्णतेची लाट जूनमध्ये अधिक तीव्र स्वरूपात परतली आहे. २२ आणि २३ जून रोजी दक्षिण-पश्चिम फ्रान्समधील पिसोस येथे तापमान ४४.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, तर बोर्डो शहरात ४२ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. अनेक भागांमध्ये रेड ॲलर्ट जारी करण्यात आले असून शाळा बंद ठेवाव्या लागल्या, खेळ कार्यक्रमांवर निर्बंध आलेत, तसेच नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला.
युरोपमधील उष्णतेच्या लाटांची वारंवारता, तीव्रता आणि कालावधी झपाट्याने वाढत आहे. जागतिक हवामान संघटना आणि युरोपीयन हवामान संस्थांच्या अहवालानुसार युरोप हा जगातील सर्वांत वेगाने तापमान वाढ अनुभवणारा खंड ठरला आहे. औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत जागतिक तापमानात सुमारे १.३ ते १.४ अंश सेल्सिअस वाढ झाली असताना, युरोपमध्ये ही वाढ २ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाली आहे. यामागे भौगोलिक आणि हवामानाशी संबंधित अनेक कारणे आहेत. युरोपच्या दक्षिणेला झपाट्याने तापणारा भूमध्य समुद्र आहे, तर उत्तरेला वेगाने बदलणारा आर्क्टिक प्रदेश. आर्क्टिकमध्ये तापमान वाढीचा वेग जागतिक सरासरीपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. हिमनद्या, समुद्री बर्फ आणि बर्फाच्छादित प्रदेश कमी होत असल्याने अधिक सौरऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावर शोषली जाते आणि तापमानवाढीचा वेग आणखी वाढतो. याला हवामानशास्त्रात ‘आर्क्टिक अॅम्प्लिफिकेशन’ असे म्हटले जाते.
युरोपमधील कोरडी होत चाललेली जमीन ही देखील उष्णतेची तीव्रता वाढवणारी महत्त्वाची बाब आहे. सामान्यतः जमिनीतील आर्द्रता सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा काही भाग बाष्पीभवनासाठी वापरते. त्यामुळे वातावरणाला नैसर्गिक थंडावा मिळतो. मात्र दुष्काळी परिस्थितीत जमिनीतील ओलावा कमी झाल्याने ही प्रक्रिया कमकुवत होते. परिणामी सूर्याची जास्तीत जास्त ऊर्जा थेट हवा तापविण्यासाठी वापरली जाते आणि उष्णतेची तीव्रता वाढते.
यंदाच्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता समजून घेण्यासाठी वातावरणातील जेट स्ट्रीमकडे पाहावे लागेल. पृथ्वीच्या वरच्या स्तरांमध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या या वेगवान वायुप्रवाहामुळे हवामान प्रणालींची हालचाल नियंत्रित होते. मात्र आर्क्टिक प्रदेशातील वेगवान तापमानवाढीमुळे ध्रुव आणि विषुववृत्त यांतील तापमानातील फरक कमी होत आहे. परिणामी जेट स्ट्रीम अधिक वाकडी-तिकडी होत असून तिच्या मोठ्या लाटा काही वेळा एका जागीच अडकून पडतात.
यंदा युरोपवर अशीच एक ‘ओमेगा ब्लॉक’ स्थिती निर्माण झाली. ग्रीक अक्षर ओमेगा प्रमाणे दिसणाऱ्या या रचनेत मध्यभागी उच्च दाबाची प्रणाली अडकून राहते आणि तिच्या दोन्ही बाजूंना कमी दाबाच्या प्रणाली असतात. त्यामुळे हवामानाची संपूर्ण रचना स्थिर होते आणि उष्णतेची लाट अनेक दिवस कायम राहते.
या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या उच्च दाबाच्या क्षेत्राला ‘हीट डोम’ असे म्हटले जाते. या उच्च दाबाखालील हवा सतत खाली उतरते. खाली येताना ती अधिक दाट वातावरणात संकुचित होते आणि तिचे तापमान वाढते. त्याच वेळी ढगनिर्मिती आणि पर्जन्याला अडथळा निर्माण होतो. परिणामी निरभ्र आकाशाखाली सूर्याची उष्णता सतत जमिनीवर पडत राहते. याशिवाय उत्तर आफ्रिकेतील सहारा वाळवंटातून येणारी उष्ण व कोरडी हवा पश्चिम युरोपमध्ये पोहोचल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. हवामान बदल या संपूर्ण प्रक्रियेला अधिक तीव्र बनवत आहे. हिवाळा आणि वसंत ऋतूंमधील वाढते तापमान, लवकर वितळणारा बर्फ आणि जमिनीतील कमी होत जाणारा ओलावा यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जमीन कोरडी पडते. त्यामुळे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा बाष्पीभवनासाठी खर्च न होता थेट हवा तापविण्यासाठी वापरली जाते. यामुळे दिवसाचे तापमान अधिक वाढते आणि रात्रीही पुरेसा गारवा निर्माण होत नाही.
युरोपमध्ये तापमान वाढीमागे आणखी एक कमी चर्चिला जाणारा घटक म्हणजे हवेतील प्रदूषणात झालेली घट. गेल्या काही दशकांत युरोपीय देशांनी सल्फर डायऑक्साइडसारख्या प्रदूषकांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारली, मात्र वातावरणातील काही सूक्ष्मकण सूर्यप्रकाश परावर्तित करून तापमानवाढीचा काही अंशी प्रभाव कमी करत होते. हे प्रदूषण कमी झाल्याने पृथ्वीच्या पृष्ठभागावर अधिक सौरऊर्जा पोहोचू लागली आणि तापमानवाढ अधिक स्पष्टपणे दिसू लागली.
मात्र या संपूर्ण घटनेतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे रात्रीचे वाढते तापमान. युरोपातील अनेक शहरांमध्ये रात्रीचे तापमान २० अंश सेल्सिअसच्या खालीच गेले नाही. दिवसाची उष्णता रात्री कमी न झाल्याने मानवी शरीर, इमारती आणि पायाभूत सुविधा यांना विश्रांतीची संधी मिळत नाही. यामुळे उष्माघात, हृदयविकार आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचा धोका वाढतो. ही उष्णतेची लाट केवळ हवामानशास्त्रीय चर्चेचा विषय राहिलेली नाही; ती आता समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्यावर थेट परिणाम करणारे वास्तव बनले आहे. फ्रान्समधील प्रसिद्ध लुव्र संग्रहालयाला कामकाजात बदल करावे लागले, रेल्वे आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला, तर काही ठिकाणी आरोग्याच्या कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर निर्बंध घालावे लागले. हे केवळ उष्ण हवामानाचे परिणाम नाहीत; तर मानवी समाजाने ज्या हवामानाला गृहीत धरून आपली शहरे, पायाभूत सुविधा आणि दैनंदिन व्यवस्था उभारल्या, त्या व्यवस्थांची बदलत्या हवामानाशी होत असलेली टक्कर आहे.
वाढत्या उष्णतेचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर, कामकाजाच्या वेळांवर, श्रमक्षमतेवर, झोपेवर, ऊर्जा वापरावर आणि दैनंदिन जीवनशैलीवरही दिसून येतो. उष्णतेच्या लाटांशी जुळवून घेणे ही आता केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि धोरणात्मक गरज बनत आहे. भारतातून पाहता युरोपमधील ही उष्णतेची लाट एखादी दूरची घटना वाटू शकते. परंतु तिच्यामागील हवामानशास्त्र आपल्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. भारतातही गेल्या काही दशकांत उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता वाढली आहे. अनेक शहरांमध्ये रात्रीचे तापमान वाढत आहे. मान्सूनचे स्वरूप अधिक अनिश्चित होत आहे आणि अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे.
युरोपची सध्याची उष्णतेची लाट ही संपूर्ण जगासाठी एक इशारा आहे. आता प्रश्न हवामान बदल होत आहे का हा नाही, तर त्याच्या परिणामांना तोंड देण्यासाठी आपण कितपत तयार आहोत हा आहे.
(लेखक हवामान बदलांबाबत संशोधन करतात.)

