Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे, ज्ञान तर सागरातच मिळते




गेल्या आठवड्यात माझ्या एका मित्राने मला व्हिडिओ कॉल केला. तो हिरव्यागार डोंगरदऱ्यात उभा असावा असे वाटत होते. पण प्रत्यक्षात तो एका मठातील वर्गात होता. विद्यार्थी डोळे मिटून जमिनीवर मांडी घालून बसले होते. लांब कुठेतरी घंटा वाजत होत्या, खोलीत पूर्ण शांतता होती आणि एक बौद्ध भिक्खू ध्यानासह दिवसाचा पहिला तास सुरू करत होते. ते तिबेटी भाषेत बोलत होते आणि प्रत्येक काही वाक्यांनंतर थांबत होते, जेणेकरून अनुवादक त्यांची शिकवण समजून सांगू शकेल. त्यांनी ध्यान पूर्ण केल्यानंतर एका कॅनेडियन मानववंशशास्त्रज्ञाने इतिहासाचा तास सुरू केला. मित्राने वर्गातून बाहेर येऊन मला विचारले, “सांग, मी कुठे होतो?” मला पहिल्या प्रयत्नात उत्तर देता आले नाही. जेव्हा मी विचारले की, “इतक्या वेगवेगळ्या देशांचे विद्यार्थी तिथे कसे काय बसले आहेत?” तेव्हा त्याने सांगितले की, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह 40 देशांतील शेकडो विद्यार्थी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी का-निंग शेद्रुब लिंग मठात येतात. हा मठ प्रसिद्ध बोधनाथ स्तुपाच्या उत्तरेला काही मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यानंतर आमची चर्चा या विषयावर सुरू झाली की, दरवर्षी हजारो नेपाळी विद्यार्थी पदवी आणि चांगल्या संधींच्या शोधात ऑस्ट्रेलिया, भारत, ब्रिटन, अमेरिका आणि इतर देशांतील विद्यापीठांत जातात, ज्या सुविधा नेपाळमध्ये उपलब्ध नाहीत. पण, एक छोटासा शैक्षणिक प्रवास विरुद्ध दिशेनेही होत आहे, ज्याची आपल्याला माहिती नाही. हे विद्यार्थी बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी काठमांडूमध्ये येत आहेत. काही जण अल्पकालीन उन्हाळी विशेष अभ्यासक्रमात प्रवेश घेतात आणि नंतर ते क्रेडिट्स परदेशी विद्यापीठांमध्ये हस्तांतरित करतात. काही विद्यार्थी काठमांडू विद्यापीठ बौद्ध अध्ययन केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या सत्र विनिमय कार्यक्रमांतर्गत अभ्यास करण्यासाठी तिथेच राहतात. 30 वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही संस्था सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या एका छोट्या गटाने सुरू केली होती, ज्यांना तिबेटी बौद्ध शिक्षक चोक्यी न्यिमा रिनपोछे यांच्याकडून शिकायचे होते. लवकरच संस्थापकांना जाणीव झाली की, जर बौद्ध शिक्षणाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून द्यायची असेल, तर ते विद्यापीठाच्या चौकटीत आणले पाहिजे. 2002 मध्ये संस्थेने औपचारिकपणे काठमांडू विद्यापीठाशी भागीदारी करून बौद्ध अध्ययन केंद्राची स्थापना केली. त्या वेळी तिथे केवळ 36 विद्यार्थी होते. आज त्यांच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये 169 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत आणि दरवर्षी सुमारे 100 विद्यार्थी उन्हाळी विशेष अभ्यासक्रम पूर्ण करतात. माझा मित्र वेगवेगळ्या धर्मांच्या विद्यार्थ्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याच्या पद्धतीचे खूप कौतुक करत होता. विद्यार्थ्यांचे हे कार्य पाहून मला 1968 मधील ‘अनोखी रात’ चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले एक गीत आठवले – ‘ओह रे, ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना।’ मला वाटले की, या गाण्याचे बोल आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीवर किती चपखल बसतात. आयआयटी जम्मूचेच उदाहरण घ्या. त्यांनी या शैक्षणिक वर्षात ‘युनिफाइड इंजिनिअरिंग’ नावाचा नवीन बीटेक कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम अशा विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे, ज्यांना पारंपरिक एकाच विषयाच्या अभियांत्रिकीच्या पुढे जायचे आहे. हा कार्यक्रम जेईई ॲडव्हान्स्डच्या उमेदवारांसाठी खुला असून, त्याचा अभ्यासक्रम पूर्णपणे नवीन आणि व्यावहारिक आहे. यात अभियांत्रिकीच्या अनेक क्षेत्रांना एकत्र जोडले आहे. सिस्टीम इंजिनिअर, उत्पादन विकास अभियंता, ऑटोमेशन तज्ज्ञ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ यांसारख्या विविध जबाबदाऱ्या सांभाळू शकणारे पदवीधर तयार करणे हा याचा उद्देश आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अशी बहुआयामी कामे का आवश्यक आहेत? आज लोकप्रिय होत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांचेच उदाहरण घ्या. ही वाहने बाजारात चांगली कामगिरी करतील हे सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांतील तज्ज्ञांची गरज लागते. तसेच स्मार्ट सिटीजसाठी सिव्हिल इंजिनिअर्स, डेटा विश्लेषक आणि शाश्वत विकासाचा अभ्यास करणाऱ्यांची गरज असते. थोडक्यात सांगायचे तर, अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटा आता पूर्वीपेक्षा खूप व्यापक होत आहेत. फंडा असा की… जर तुम्हाला खरोखर ज्ञानवंत बनायचे असेल, तर तुम्हाला एका छोट्या ‘तळ्या’तून बाहेर पडून ‘नदी’ची मदत घ्यावी लागेल, जेणेकरून तुम्ही ‘ज्ञानाच्या सागरा’पर्यंत पोहोचू शकाल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत