(पडदा उघडतो. वांद्र्याचे बाबा घरात अंधार करून उदास चेहऱ्यानं एकटेच बसलेले आहेत. पार्श्वभूमीला त्यांच्या मूडला साजेसं गाणं सुरू आहे…) ‘जाने वो कैसे लोग थे जिन के प्यार को प्यार मिला हमने तो जब कलियां मांगी, काटों का हार मिला…’ (वांद्र्याच्या बाबांचा मुलगा येतो.)
मुलगा : का असे अंधारात बसला आहात ? कसला विचार करताय एवढा ?
बाबा : अरे ९ जण होते तेव्हा सत्ती लावणे खेळायला फार मजा यायची. आता तिघांत कसं खेळणार ते?
मुलगा : त्यात काय, उद्यापासून पाच तीन दोन खेळतील.
बाबा : अरे वा! हे माझ्या डोक्यातच नाही आलं. तुझं बरं डोकं चाललं. संजय काकांना फोन लाव जरा.
मुलगा : कशाला ?
बाबा : त्यालाही मी विचारलं होतं, तिघांत सत्ती लावणं कसं खेळणार म्हणून…
मुलगा : बाबा, तुम्ही काकांना असलं काही विचारत नका जाऊ. ते लगेचच बारामतीच्या आजोबांना फोन लावतात आणि त्यांना विचारतात. बारामतीच्या आजोबांचं ऐकून एकदा तुम्ही फसलात ना…
बाबा : अरे, पण बाबा सुद्धा त्यांना विचारायचे…
मुलगा : हो, पण ते जे सांगतील त्याच्या उलट करायचे. तुम्ही सुलट केलं आणि मग सगळं उलट झालं.
बाबा : झालं ते झालं, आता आम्ही समदुःखी आहोत. हे बघ, त्यांनी मला कालच ही ऑडिओ क्लिप पाठवली.
(बाबा क्लिप ऐकवतात.) ‘अकेले है चले आओ, जहां हो कहां आवाज दे तुम को कहां हो…’
मुलगा : बंद करा ती क्लिप बाबा. असं आवाज वगैरे देऊन कोणी येत नसतं. त्यांना दुसरंच काही तरी द्यावं लागतं.
बाबा : पण आपण एवढ प्रेम दिलं, आणखी काय देणार आपण ?
मुलगा : तुम्ही सगळ्यांशी फोनवर बोलला होता ना?
बाबा : तर काय! प्रत्येकाला विचारलं होतं, माझ्या कानावर येतंय ते खरं आहे का? आपापल्या मनाला प्रश्न विचारा आणि मला उत्तर द्या.
मुलगा : मग ? दिलं का त्यांनी उत्तर ?
बाबा : त्यातल्या दोघांचे फोन आले तेव्हा माझा फोन सायलेन्ट मोडवर होता. आणखी दोघांचे आले तेव्हा मी फोन चार्जिंगला लावून झोपलो होतो आणि उरलेल्या दोघांचे आले तेव्हा मी संजय काकांशी बोलत होतो.
मुलगा : अहो, पण मग तुम्ही त्यांना कॉलबॅक करायचा ना!
बाबा : प्रश्न मी विचारला होता ना त्यांना? मग मीच फोन करून उत्तर विचारायचं त्यांना? एकदा करून नाही लागला कॉल, तर त्यांनी पुन्हा करायला नको ?
मुलगा : बाबा, अहो अशी अटीतटीची वेळ असताना, त्यांनी फोन करायचा की आपण करायचा, अशा क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नसतो.
(तेवढ्यात मेसेज टोन वाजते. दोघेही फोनकडे पाहतात.)
बाबा : बघ बघ, त्यातल्याच एकाचा व्हॉइस मेसेज आहे बहुधा.
मुलगा : ऐकवा, बघू या काय म्हणतोय. (बाबा मेसेज सुरू करतात. गाणं सुरू होतं.)
आवाज : ‘गुजरा हुवा जमाना, आता नही दोबारा, हाफीज खुदा तुम्हारा…’
बाबा : काय सुंदर गाणं आहे रे हे. खूप दिवसांनी ऐकलं मी.
मुलगा : बाबा, अहो गाण्याचं कसलं कौतुक करताय, जरा सिच्युएशन काय आहे, या गाण्याचा अर्थ काय होतो, ते बघा.
बाबा : ते काम संजय काकांकडे दिलेलं आहे. त्याचं काही स्टेटमेंट आलंय का बघ बरं.
मुलगा : (मोबाइल बघतो) हो, त्यांच्या स्टेटमेंटचा ऑडिओ आलाय काही तरी.
बाबा : ऐकव ऐकव… संजयनं सॉलिड ऐकवलं असेल एकेकाला. (मुलगा ऑडिओ प्ले करतो.)
आवाज : अरे, बीप बीप बीप… उद्या तुम्हाला बीप बीप बीप बीप… मला सांगा बीप बीप बीप..
बाबा : हे काय बोललाय संजय, मला काहीच कळत नाही.
मुलगा : बाबा, माझ्या फोनमधलं एआय शिव्या गाळून टाकतं. कुठेही शिवी आली की तिथं ‘बीप बीप’ असा आवाज येतो. (तेवढ्यात बाहेरच्या गोंधळाचा आवाज येतो.)
बाबा : कसला गोंधळ चाललाय बाहेर ?
मुलगा : तुमचं स्टेटमेंट हवंय प्रेसला, त्यासाठी गर्दी जमलीय.
बाबा : पण तो संजय आणि आपले तीन सरदार बोलताहेत ना ? बरं ठीक आहे, मी बोलतो प्रेसशी. (बाबा बाहेर येतात आणि मीडियाच्या गर्दीला सामोरे जातात. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार होतो.)
बाबा : हे बघा, तुम्ही काय विचारताय, कोणाविषयी विचारताय तेच मला कळत नाही. आमच्याकडून कोणीही, कुठेही गेलेला नाही. पण तुम्ही एवढे म्हणताच आहात तर मी माहिती घेतो आणि मग बोलतो.
(काही पत्रकार कुजबूज करतात… ‘आता इथं थांबण्यात काही अर्थ नाही’, ‘हे बोलणार नाहीत’, आपण जाऊ या निघून…’)
बाबा : तुमची कुजबूज ऐकलीय मी. माझ्यावर विश्वास नसेल तर, ज्यांना जायचं असेल त्यांनी खुशाल जावं…
(एवढं बोलून बाबा-मुलगा घरात येतात. टीव्ही लावतात. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू असते.) यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘ज्यांना जायचं असेल त्यांनी खुशाल जावं…!’
मुलगा : (चकित होऊन) तुम्ही असं बोललात ? (बाबा विचारात पडलेले, गोंधळलेले. पडदा पडतो.)

