Headlines

Uddhav Thackeray Eknath Shinde Shiv Sena reunite in Amravati Municipal Swikrut Nagarsevak Election; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची हातमिळवणी, अमरावतीत चमत्कार, दोन्ही शिवसेनांच्या युतीने राजकारणात चर्चांना उधाण


Amravati News : शिवसेना-शिवसेना (उबाठा)-बसप या नव्या गटाने दिनेश बूब यांना पुढे करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली

Amravati Uddhav Thackeray Eknath Shinde Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : राज्य पातळीवर शिवसेना आणि शिवसेना (उबाठा)तील राजकीय वाद शिगेला पोहचला असताना अमरावतीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले. बहुजन समाज पक्षाच्या साथीने दोन्ही शिवसेनेनी स्वतंत्र गटाची स्थापना करीत माजी नगरसेवक दिनेश बूब यांना स्वीकृत सदस्य म्हणून निवडले. या अनपेक्षित युतीची अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चा वाढली आहे.

नेमकं काय घडलं?

अमरावती महापालिकेची पहिली सभा शुक्रवारी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमहापौर सचिन भेंडे व आयुक्त सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीत झाली. या सभेत आठ स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड झाली. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत मतांच्या मूल्यानुसार भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. भाजपकडून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. प्रशांत देशपांडे आणि प्रा. संजय तिरथकर यांची वर्णी लागली. काँग्रेसने माजी महापौर मिलिंद चिमोटे आणि अनिल अग्रवाल यांच्यावर विश्वास दाखविला. युवा स्वाभिमान पक्षाने संजय हिंगासपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसने भोजराज काळे, तर एमआयएमने सै. मुनज्जर अली यांना संधी दिली. ठाकरे-शिंदे-बसप गटाकडून दिनेश बूब यांची निवड झाली.

महापालिकेची आर्थिक सूत्रे हाती ठेवणाऱ्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची अविरोध निवड झाली. संख्याबळानुसार भाजपचे पाच सदस्य निवडले गेले. युवा स्वाभिमान पक्ष आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन, राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएमचे प्रत्येकी दोन, तर शिवसेना गटाचा एक सदस्य स्थायी समितीत दाखल झाला. भाजपने मिलिंद बांबल, पद्मजा कौंडण्य, पंचफुला चव्हाण, स्मिता सूर्यवंशी आणि विनोद तनवाईस यांना संधी दिली. युवा स्वाभिमान पक्षाचे प्रशांत वानखडे, प्रियंका पाटणे आणि दीपक साहू; काँग्रेसचे ललिता रतावा, प्रशांत महल्ले व अस्मा फिरोज खान; राष्ट्रवादीचे अविनाश मार्डीकर व मीनल सवाई; एमआयएमचे सल्लाउद्दीन इक्राममुद्दीन व नाझीम खान करीम खान तर शिवसेनेकडून मंजुषा जाधव यांचा समावेश झाला. शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट अमरावतीत एकत्र आल्याने पुढील महापालिका राजकारणात नवे समीकरण किती काळ टिकते, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra TimesBhiwandi Mayor : भाजपकडून नारायण चौधरींनाच आधी पसंती, रवींद्र चव्हाणांचं पत्र व्हायरल, अचानक सूत्रं फिरली अन् पक्षाने नामुष्की ओढावून घेतली

राजकीय वर्तुळात खळबळ

शिवसेना-शिवसेना (उबाठा)-बसप या नव्या गटाने दिनेश बूब यांना पुढे करत राजकीय वर्तुळात खळबळ उडविली. बूब यांना युवा स्वाभिमान पक्षाची साथ लाभल्याची चर्चा आहे. आमदार रवी राणा आणि बूब यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रूत आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत बूब यांनी प्रहारतर्फे भाजपच्या नवनीत राणा यांच्याविरोधात लढत दिली होती. पराभवानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर राणा यांनी आपला आणखी एक स्वीकृत सदस्य निवडून आणण्याची संधी असतानाही बूब यांना पाठिंबा दिल्याचे बोलले जाते.

राज ठाकरे-एकनाथ शिंदेंची भेट, उद्धव ठाकरेंचा जळफळाट? संजय राऊत थेटच बोलले

‘स्थायी’वर राष्ट्रवादीचा डोळा

महायुतीच्या सत्ता समीकरणात भाजपकडे महापौरपद, युवा स्वाभिमान पक्षाकडे उपमहापौरपद गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समितीच्या सभापतिपदावर दावा केला आहे. ११ नगरसेवकांच्या बळावर राष्ट्रवादीकडे निर्णायक भूमिका आहे. स्थायी समितीत महायुतीचे दहा सदस्य असल्याने सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचा मार्ग सुकर मानला जात आहे. ज्येष्ठ नगरसेवक अविनाश मार्डीकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्यांनी यापूर्वी चार वेळा स्थायी सभापती म्हणून काम पाहिले आहे. अनुभव, प्रशासनावर पकड आणि आर्थिक विषयांतील जाण या जोरावर मार्डीकर यांची उमेदवारी भक्कम मानली जाते. मात्र अंतिम निर्णयात भाजप-युवा स्वाभिमानची भूमिका काय राहते, याकडे लक्ष आहे.
Maharashtra TimesMadhuri Manjrekar : शेवटच्या क्षणी BMC चं तिकीट नाकारल्याने ढसाढसा रडलेल्या, पण दीड महिन्यात ठाकरेंकडून बक्षिसी, माधुरी मांजरेकर म्हणतात…

देशपांडेंना दिलेला शब्द पाळला

भाजपचे अॅड. प्रशांत देशपांडे यांना स्वीकृत सदस्यपद मिळणे हीदेखील चर्चेची बाब ठरली. अमरावतीच्या पहिल्या महिला महापौर विद्या देशपांडे यांचे पुत्र असलेल्या प्रशांत देशपांडे यांना अंबापेठ प्रभागातून उमेदवारी नाकारल्यानंतर नाराजी उसळली होती. ती शमवण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वत: त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी स्वीकृत सदस्यपदाचा शब्द देण्यात आल्याची चर्चा होती. आजच्या निर्णयाने तो शब्द पाळला गेला. प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोमध्ये देशपांडेंना विशेष स्थान देण्यात आले होते. त्या चर्चांवर आज औपचारिक शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा