► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
भारताच्या भूसेना प्रमुखपदी जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मावळते भूसेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी निवृत्त झाले. आपल्या कार्यकाळात भारतीय भूसेनेने सज्जता, संतुलन आणि सतर्कता या तीन्ही क्षेत्रांमध्ये आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे, असे उद्गार जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काढले.
जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भूसेना प्रमुखपद गेली दोन वर्षे सांभाळले.
जनरल धीरज सेठ भारतीय भूसेनेचे 31 वे प्रमुख झाले आहेत. त्यांनी हे पद स्वीकारण्यापूर्वी जवळपास चाळीस वर्षे भारतीय भूसेनेत सेवा केली आहे. त्यांनी डिसेंबर 1986 मध्ये भारतीय भूसेनेत प्रवेश केला. ते सैनिकी परंपरेतलेच असून त्यांचे पिता कृण मोहन सेठ यांनी भारतीय भूसेनेतून अॅडजुटंट जनरल पदावरुन 1997 मध्ये निवृत्ती स्वीकारली होती. कृण मोहन सेठ यांनी त्यांच्या कार्यकाळात भारतीय सेनेच्या महत्वाच्या ‘21 वी स्ट्राईक कोर’ आणि अन्य तुकडीचे नेतृत्व केले असून आता जनरल धीरज सेठ यांनी पित्याच्याही पुढचा टप्पा गाठला आहे.
निरोपाच्या भाषणात माहिती
निवृत्त जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांच्या निरोपाच्या संदेशात त्यांच्या कार्यकाळात भूसेनेने केलेल्या प्रगतीची माहिती दिली आहे. भारताच्या उत्तर सीमेवर ‘स्नो लेपर्ड अभियाना’च्या अंतर्गत भारतीय सेनेने आपली स्थिती बळकट केली आहे. तर पश्चिम सीमेवरही भारतीय भूसेनेने आपले उत्तरदायित्व अत्यंत गंभीरपण आणि परिश्रमपूर्वक आपली क्षमता अनेकवेळा सिद्ध केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
स्थिती स्थिर पण संवेदनशील
भारताची संपूर्ण सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा यांच्यावर सध्या परिस्थिती स्थिर पण संवेदनशील आहे. सेनेने संपूर्ण सीमाप्रदेशात आपली सज्जता बळकटपणे ठेवली असून सेना कोणत्याही आव्हाने केव्हाही परतवून लावण्यास सज्ज आहे. कोणीही दु:साहस करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला धडा देण्यास सेना समर्थ आहे. सीमा सुरक्षेचे आपले उत्तरदायित्व सेना उत्तमरित्या पार पाडत आहे. आता ते नव्या सेनाप्रमुखांनी स्वीकारायचे आहे, असे प्रतिपादन जनरल उपेंद्र द्वेवेदी यांनी केले.
नव्या भूसेनाप्रमुखांचा अल्पपरिचय
नूतन भूसेना प्रमुख जनरल धीरज सेठ हे या पदाच्या पूर्वी भूसेना उपप्रमुख पदी कार्यरत होते. ते या पदावर 1 एप्रिल 2026 पासून आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील खडकवासला येथील भारतीय संरक्षण अकादमी या संस्थेतून आपले सैनिकी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डिसेंबर 1986 मध्ये त्यांनी भारतीय भूसेनेत प्रवेश केला. आपल्या साधारणत: चाळीस वर्षांच्या सेनासेवा काळात त्यांनी विविध प्रदेशातील अनेक सैनिकी अभियानांमध्ये भाग घेऊन पराक्रम गाजवला आहे. त्यांनी वाळवंटी प्रदेशात भारतीय सेनेच्या सशस्त्र तुकडीचे नेतृत्व केले.
तसेच सखल भागात सशस्त्र ब्रिगेडचे नेतृत्व केले. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या दुर्गम आणि डोंगराळ हिमप्रदेशात दहशतवाद विरोधी अभियानांचेही यशस्वी नेतृत्व केले आहे. अशा प्रकारे पराक्रम, बुद्धीमत्ता आणि साहस यांचा परिचय देत त्यांनी लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पदोन्नती मिळविली.
सुदर्शन तुकडीचे नेतृत्व
या पदावर असताना त्यांनी ‘सुदर्शन चक्र’ तुकडीचे नेतृत्व केले. त्यानंतर दिल्ली येथे जनरल ऑफिसर म्हणून सेवा दिली. या काळात त्यांनी काही आंतरराष्ट्रीय अभियानांमध्येही भाग घेऊन आपला ठसा उमटविला. नंतर त्यांनी भारतीय भूसेनाच्या नैऋत्य कमांड आणि दक्षिण कमांडचेही नेतृत्व केले. आपल्या विविध अधिकारपदांच्या काळात त्यांनी भारतीय सेनेचे आधुनिकीकरण आणि नवे युद्धतंत्राचा समावेश या महत्वाच्या क्षेत्रांमध्येही अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे. नव्या युद्धतंत्रासाठी आणि नवनवी अत्याधुनिक शस्त्रे, तसेच साधने हाताळण्यासाठी सैनिकांना सज्ज करण्याचे उत्तरदायित्वही त्यांनी सांभाळले आहे.
