त. भा. प्रतिनिधी
पुणे
एल निनोच्या संकटामुळे विदर्भ वगळता महाराष्ट्रात तसेच देशात जुलै महिन्यात सरासरीच्या कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला. देशात सरासरीच्या 94 टक्के पावसाची शक्यता आहे, तर राज्यात केवळ विदर्भात पाऊस सरासरी गाठण्याचा अंदाज असून, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची ओढ राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहोपात्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जून महिन्याचा आढावा तसेच जुलै महिन्यातील पावसाच्या स्थितीचा अंदाज वर्तविला. यानुसार, जुलै महिन्यात सरासरीच्या 94 टक्के म्हणजेच कमी पावसाची शक्यता आहे. पूर्वोत्तर भारताचा काही भाग, सिक्कीम, लडाख, विदर्भ, छत्तीसगड,ओरिसा, तेलंगणा, दक्षिण आंध्र तसेच तामिळनाडूच्या काही भागात दमदार पाऊस होणार आहे. मात्र, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेटांवर सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
एल निनोचा प्रभाव
प्रशांत महासागरात सध्या एल निनोची कमजोर स्थिती असून, आगामी मान्सून काळात त्याचा प्रभाव वाढीस लागणार आहे. यादरम्यान आयओडी (भारतीय समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान) तटस्थ असून, मान्सून काळात तो असाच कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. तटस्थ आयओडीमुळे पावसाची तूट कमी राहण्याचे संकेतदेखील हवामान खात्याने दिले आहेत.
महाराष्ट्रात पाऊस कमी
दरम्यान, जुलै महिन्यात महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पावसाची ओढ राहणार आहे. केवळ विदर्भात दमदार पावसाची चिन्हे असून, विदर्भालगतच्या मराठवाड्यातील जिल्ह्यांत पाऊस किंचित दिलासा देण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात कमाल तसेच किमान तापमानदेखील सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचे मोहोपात्रा यांनी सांगितले.
महाराष्ट्रात जून महिना कोरडाठाण, तूट 47 टक्क्यांवर
राज्यात जून महिन्यात सरासरीच्या 47 टक्के तुटीचा पाऊस झाला आहे. गेल्या काही वर्षातील जून महिन्यातील हा सर्वांत कमी पाऊस आहे. यापूर्वी 2009 सालच्या जून महिन्यात 50 टक्के तुटीचा पाऊस झाला होता. 2014 तसेच 2015 सालीदेखील दुष्काळाची स्थिती होती. यंदाच्या जून महिन्यात कोकण-गोव्यात सरासरीच्या 47 टक्के, मध्य महाराष्ट्र 56, मराठवाडा 39, तर विदर्भात सरासरीच्या 42 टक्के तुटीचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. जिल्हानिहाय स्थिती पाहता मुंबई शहर, बुलढाणा, अमरावती, वर्धा जिल्ह्यात पाऊस रडतखडत सरासरीच्या आसपास आहे.
कोल्हापूर, साताऱ्यात 60 टक्क्यांहून अधिक तूट
सातारा, ठाणे, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची तूट 60 टक्क्यांहून अधिक असून, या भागात पावसाने पाठ फिरविली आहे. जून महिन्यातील पावसाच्या स्थितीमुळे धरणसाठादेखील खालावला आहे.
आठवडाभर चांगल्या पावसाची शक्यता
या आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण गोवा, विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. यात कोकणात पुढील चार दिवस तीव्र स्वऊपाचा पाऊस होणार असून, ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगडमध्ये गुऊवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
