Eknath Shinde: गेल्या आठवड्यात लोकसभेच्या सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. पण त्यांचा प्रवेश खासदारांपेक्षा वेगळा ठरला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश घडवून आणत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. गेल्या आठवड्यात लोकसभेतील ठाकरेसेनेचे ९ पैकी ६ खासदार फोडताना शिंदेंनी पक्षांतरबंदी कायद्याला पद्धतशीर बगल दिली. तर यावेळी विधान परिषदेचे सदस्य असलेल्या अहिर यांना पक्षात घेताना शिंदेंनी पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाटेचा आधार घेतला.
२०१९ मध्ये सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिवसेना अखंड होती. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. जून २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०२२ मध्ये त्यांना ठाकरेंनी विधान परिषदेवर संधी दिली. त्यावेळीही शिवसेना अखंड होती. ते अखंड शिवसेवेकडून विधान परिषदेवर गेले होते. Sachin Ahir: सचिन अहिरांचं नाव घेताना शिंदे चुकले, सगळेच हसले; ठाकरेंना धक्का, 30 जूनचा योगायोगही सांगितला सचिन अहिर यांना आपल्या गोटात आणताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘ नीलम गोऱ्हे पॅटर्न’ वापरला आहे. नीलम गोऱ्हे यांना उद्धव ठाकरे ंनी चारवेळा विधान परिषदेवर संधी दिली. २००२ ते २००८, २००८ ते २०१४, २०१४ ते २०२० या कालावधीत ठाकरेंनी नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये त्या विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आल्या. २०२० मध्ये ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवर पुन्हा संधी दिली. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.
जून २०२२ मध्ये शिंदे यांनी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केलं. त्यांनी ४० आमदारांसह ठाकरेंची साथ सोडली. ठाकरे यांचं सरकार कोसळलं. पक्ष आणि चिन्हदेखील ठाकरेंच्या हातून गेलं. शिवसेनेची सुत्रं शिंदेंकडे जाताच वर्षभरानंतर नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे त्यांचं उपसभापतीपदही कायम राहिलं. Sachin Ahir: पक्षांतरबंदी कायद्याला बगल; सचिन अहिर शिंदेंच्या गळाला; आदित्य ठाकरेंभोवती भाईंचा चक्रव्यूह आता सचिन अहिर यांना शिवसेनेत घेताना शिंदे यांनी नीलम गोऱ्हे पॅटर्न वापरला आहे. शिवसेना एकसंध असताना, शिवसेनेकडून विजयी झालेल्या, विधान परिषदेवर गेलेल्या सचिन अहिर यांना शिंदेंनी आपल्याकडे घेतलं आहे. त्यामुळेच अहिर यांच्या पक्षप्रवेशावेळी शिंदेंनी पक्षांतरावर भाष्य करताना ते शिवसेनेकडून निवडून गेले होते आणि आता ते शिवसेनेतच येत आहेत, असं म्हटलं. विशेष म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी शिंदेसेनेत जाऊन त्यांचं उपसभापतीपद कायम राखलं. तर अहिर शिंदेसेनेत जाऊन उपसभापतीपद मिळवणार आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. महायुतीचं संख्याबळ पाहता अहिर यांचा विजय निश्चित आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा