Headlines

Gang war between two rival groups in Sangli district jail ; सांगलीच्या कारागृहात गँगवार, दोन टोळ्या समोरासमोर; 16 जणांकडून दोन सराईत गुंडांना विटांनी बेदम मारहाण


सांगली कारागृहात दोन टोळ्यांमध्ये भीषण राडा झाला असून १६ जणांच्या टोळीने सराईत गुन्हेगार पवन साळुंखे आणि मेघशाम जाधव यांना विटांनी बेदम मारहाण केली. कारागृहाच्या खुल्या मैदानात झालेल्या या गँगवारमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Gang war in Sangli district jail
सांगली कारागृहात दोन टोळ्यांमध्ये जोरदार राडा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्निल एरंडोलीकर: सांगली कारागृहातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारागृहाच्या आवारातच दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये भीषण राडा झाला असून, १६ जणांच्या टोळीने दोन गुंडांना विटांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वर्चस्ववादातून झालेल्या हाणामारीमुळे कारागृह प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असून परिसरात खळबळ माजली आहे.

नेमकी घटना काय?

सांगली कारागृहातील खुल्या मैदानात कैद्यांना सोडण्यात आले असताना हा प्रकार घडला. जखमी झालेला पवन साळुंखे हा एक सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. त्याचा साथीदार मेघशाम ऊर्फ मोठ्या जाधव हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने या दोघांना सुरक्षेच्या कारणास्तव वेगळ्या बरॅकमध्ये ठेवण्यात आले होते.

दुसरीकडे, त्यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे आदित्य पवार आणि त्याचे १६ साथीदार वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली याच कारागृहात दुसऱ्या बरॅकमध्ये बंदिस्त आहेत. शनिवारी जेव्हा या दोन्ही टोळ्यांतील सदस्य कारागृहाच्या खुल्या मैदानात समोरासमोर आले, तेव्हा त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली.

Maharashtra TimesSolapur News : ‘मी तुमच्या लायकीचा बाप नाही’; मुलाला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केला अन् वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, सोलापूरमध्ये हळहळ

“स्वत:ला शहाणे समजता का?”

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य पवारच्या टोळीने पवन साळुंखे आणि मेघशामला उद्देशून डिवचण्यास सुरुवात केली. “तुम्हाला वेगळ्या बरॅकमध्ये ठेवले आहे, म्हणून तुम्ही स्वतःला जास्त शहाणे समजता का?” असा सवाल करत १६ जणांच्या टोळीने त्यांना घेरले. यातून वादावादी वाढली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. आदित्य पवारने आपल्या साथीदारांना ललकारत “यांना मारून टाका” असे आदेश दिले.

विटांनी केला थरारक पाठलाग

जिवाच्या भीतीने पवन आणि मेघशाम यांनी मैदानातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संख्येने जास्त असलेल्या १६ जणांच्या टोळीने त्यांचा पाठलाग केला. कारागृहाच्या आवारात पडलेल्या विटा उचलून या टोळीने दोघांवरही बेदम हल्ला चढवला. या हल्ल्यात पवन साळुंखे आणि मेघशाम ऊर्फ मोठ्या जाधव हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या राड्यामुळे कारागृहात एकच गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी तातडीने दखल घेतली असून, हल्लेखोर १६ जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कारागृहासारख्या सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारे टोळीयुद्ध भडकल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा