Headlines

Shivraj motegaonkar cbi custody; ‘तो’ डेटा डिलीट ते मॉक टेस्ट’; CBI कडून कोर्टात जोरदार युक्तिवाद, मोटेगावकरला 9 दिवसांची कोठडी


Shivraj Motegaonkar Custody: NEET पेपरफुटी प्रकरणात RCC क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या अडचणी वाढल्या आहेत. CBIने दिल्ली कोर्टाकडून आता ९ दिवसांची कोठडी मिळवली आहे.

shivraj motegaonkar 10 days cbi custody
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
लातूर: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्यावरील आरोप अधिक गंभीर होताना दिसत आहेत. सीबीआयने अटक केल्यानंतर मोटेगावकरला दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने न्यायालयात केलेल्या युक्तिवादात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणात मोटेगावकर यांना ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

सीबीआयने न्यायालयात सांगितले की, शिवराज मोटेगावकर हा पेपरफुटी रॅकेटमधील सक्रिय सदस्य आहे. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका मोटेगावकर यांच्याकडे तब्बल २३ एप्रिललाच पोहोचली होती, असा दावा तपास यंत्रणेने केला. ही प्रश्नपत्रिका विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पैशांच्या मोबदल्यात पोहोचवण्यात आल्याचा आरोपही सीबीआयने केला आहे.

आरसीसी क्लासेसवर टाकलेल्या छाप्यात सीबीआयने मोबाईल, लॅपटॉप आणि काही प्रश्नसंच जप्त केले आहेत. तपासादरम्यान मोटेगावकर याच्या मोबाईलमध्ये संबंधित प्रश्नपत्रिका आढळून आली होती. मात्र, सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर त्याने मोबाईलमधील डेटा डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. फॉरेन्सिक तपासातून हा डेटा पुन्हा मिळवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

Maharashtra TimesWho Is Shivraj Motegaonkar: घर चालवण्यासाठी संघर्ष ते कोट्यवधींचे ‘RCC’चे साम्राज्य; CBIनं उचललेला शिवराज मोटेगावकर नेमका कोण?

सीबीआयने न्यायालयात आणखी काय सांगितले?

सीबीआयने न्यायालयात सांगितले की, या प्रकरणात देशभरातील विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, पुणे, नाशिक, लातूर आणि अहिल्यानगर येथे आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. दलालांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला. काही कोचिंग क्लासेसमध्ये परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न समजावून सांगितले जात होते, असेही तपासात समोर आल्याचे सीबीआयने स्पष्ट केले.

इतर आरोपींशी मोटेगावकर याचे थेट संबंध

या प्रकरणात आधीच अटक करण्यात आलेले पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांच्याशी मोटेगावकर याचे थेट संबंध असल्याचा दावा सीबीआयने केला. विशेष म्हणजे पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर हे दोघेही लातूरमधील असून, त्यांनी मिळून पेपरफुटीचा कट रचल्याचा आरोप न्यायालयात करण्यात आला. या संपूर्ण रॅकेटमधील आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिका पुरवठा आणि इतर आरोपींची भूमिका याचा तपास सुरू असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले.

जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, मोटेगावकर याचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये ते आपल्या क्लासेसची आक्रमक पद्धतीने जाहिरात करताना दिसत आहेत. तसेच विद्यार्थ्यांकडून ‘मॉक टेस्टमधील प्रश्नच परीक्षेत आले’ अशा प्रतिक्रिया घेतानाचे व्हिडिओही चर्चेत आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर न्यायालयाने शिवराज मोटेगावकरला नऊ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा तपास आणखी वेगाने सुरू आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा