![]()
हिंगोली तालु्क्यातील भटसावंगी येथे मुलास मारहाण होत असतांना मध्यस्थी करून सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघांवर सोमवारी ता. ३१ बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर या घटनेनंतर आरोपीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याला तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील भटसावंगी येथे सचिन कपाटे व पांडूरंग कपाटे शेजारी राहतात. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात शेतीचा वाद आहे. या शिवाय किरकोळ कारणावरून कुरबुरी होत होत्या. दरम्यान, रविवारी ता. ३० रात्री पांडूरंग हा दारु पिऊन घरी आला. यावेळी त्याने शेजारी राहणाऱ्या सचिन याला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शाब्दिक चकमकीनंतर वाद वाढत गेल्याने पांडूरंग याने सचिन यास मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक मारहाण होत असल्याने त्याने आराडा ओरड केली. यावेळी सचिन याची आई मंगल कपाटे (६०) भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडल्या. यावेळी पांडूरंग, त्याची आई यशोदाबाई कपाटे, बहिण कविता कपाटे यांनी मंगल यांना मारहाण करण्यास सुरवात केली. यामध्ये पांडूरंग व यशोदाबाई यांनी मंगल यांचे हात धरले तर कविता हिने त्यांच्या डोक्यात दगडाने वार केला. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन जमीनीवर कोसळल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या घटनेनंतर पांडूरंग यानेही विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सचिन कपाटे याच्या तक्रारीवरून बासंबा पोलिसांनी पांडूरंग कपाटे, यशोदाबाई कपाटे, कविता कपाटे यांच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे, संतोष वाठोरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे.
Source link
भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेच्या डोक्यात दगड घालून खून:तिघांवर गुन्हा दाखल, एका आरोपीचा विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
