Headlines

Crime News: अपहरण, मारहाण, जीवघेणा हल्ला; इन्फ्लूएन्सरसोबत भयंकर प्रकार; 54 दिवसांनी मृत्यूनं गाठलं


सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरचं गजबजलेल्या परिसरातून अपहरण झालं. त्यानंतर तिला बेदम मारण्यात आलं. तिला झाडाल बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला.

social media star
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चंदिगढ: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संशयास्पद परिस्थितीत तिचं अपहरण झालं होतं. दोन महिन्यांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर २६ ऑगस्टला पीजीआय चंदिगढमध्ये तिची प्राणज्योत मालवली.

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर मनजीत कौरचं आरोपींनी अपहरण केलं. त्यानंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. झाडाला बांधून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणाचं गांभीर्य पाहता हत्या आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मनजीत कौरचं ३ जुलैला चंदिगढच्या सेक्टर ३४ मधून अपहरण झालं. हा परिसर बराच गजबजलेला असतो. आरोपींना कारमध्ये टाकलं आणि निर्जनस्थळी नेलं. तिथे तिला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिला झाडाला बांधण्यात आलं. मग तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं. भाजल्यामुळे तिला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या होत्या. पीजीआयमध्ये तिच्यावर बरेच दिवस उपचार सुरू होते.

मनजीत कौर अनेक आठवडे बेशुद्वावस्थेत होती. ५ ऑगस्टला मनजीतला थोडी शुद्ध आली. यावेळी तिनं कुटुंबाला सगळी आपबिती सांगितली. त्यानंतर तिची प्रकृती बिघडत गेली. २६ ऑगस्टला तिनं अखेरचा श्वास घेतला.

चंदिगढ पोलीस दलाचे डीसीपी गुरजीत कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजीतची आई कांता देवी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात रिंकु, शुभी आणि पिंडा अशा तिघांविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मनजीतच्या अपहरणामागे आणि तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यामागे नेमका काय हेतू होता, याचा शोध सुरू आहे.

या गु्न्ह्याशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या प्रकरणात अद्याप एकही अटक झालेली नाही. पीडितेच्या कुटुंबांकडून आणखी माहिती घेत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मनजीत कौरच्या मृत्यूनंतर तिचं कुटुंब अंत्यविधीत व्यग्र होतं. त्यामुळे त्यांच्याकडून विस्तृत माहिती घेण्यात आलेली नाही.