![]()
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आयोजित देशव्यापी जनजागरण अभियानांतर्गत तालुक्यात १२ गावांमध्ये सभा घेण्यात आल्या. दुसरीकडे पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील कार्यकर्ते गावागावात, वस्त्या आणि बाजारपेठांमध्ये फिरुन दिल्लीच्या आंदोलनाची हाक देत आहेत. शेतकरी, कामगार, युवक, विद्यार्थी, महिला आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांशी थेट संवाद साधून त्यांना आगामी १ सप्टेंबरच्या दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होण्याची हाक दिली जात आहे. नऊ ऑगस्ट या क्रांतिदिनी मंगरूळ चव्हाळा येथून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. तेथे रॅली व जाहीर सभा घेण्यात आली. त्यानंतर आज, गुरुवारपर्यंत नांदगाव खंडेश्वर, शिवणी रसुलापूर, वाघोडा, फुबगाव, येणस, येवती, शिंगणापूर, धामक, येणस, सातरगाव, सावनेर, मांजरी म्हसला या गावांमध्ये सभा घेण्यात आल्या. सभेपूर्वी प्रत्येक गावात रॅली काढून जनतेशी संवादही साधला. महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, अन्नधान्य आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींचा मोठा फटका जनतेला बसत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही, युवकांमध्ये बेरोजगारी वाढत आहे आणि शिक्षण व आरोग्याच्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात व्यापारीकरण होत आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर हमीसह किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळावी, मनरेगेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून ग्रामीण भागातील रोजगार वाढवावा, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण व्यवस्था मजबूत करावी, वाढती बेरोजगारी थांबवून युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, महिला व दलित-आदिवासींच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, या मागण्यांसाठी जनतेने या संघर्षात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात येत आहे. कामगारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या चारही श्रमसंहिता रद्द करून पूर्वीचे कामगार कायदे पुन्हा लागू करावेत, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा द्यावी, कंत्राटीकरण व असुरक्षित रोजगाराला आळा घालावा, अशी मागणीही या जनजागरण अभियानातून करण्यात येत आहे. देशाची संपत्ती मोजक्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या हितासाठी वापरण्याऐवजी ती शेतकरी, कामगार, गरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी वापरली पाहिजे, असा संदेश हे कार्यकर्ते देत आहेत. दरम्यान जिल्ह्याच्या इतर भागातही जनजागरण अभियानाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून दिल्लीतील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या अभियानात पक्षाचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, तालुका सचिव संतोष सुरजुसे, सहसचिव विनोद तऱ्हेकर, ओमप्रकाश सावळे यांच्या नेतृत्वात विजय मंडवधरे, ईस्राईल शहा, राजेश्वर मासुतकर, हरिदास राजगीरे, प्रज्वल ढोके, नारायणराव भगवे, संजय मंडवधरे, लिलेश्वर आगळे, योगेश अवझाडे, मनोज गावनर आदी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जेन झी मुद्द्यांनाही हात जेन झी व जेन अल्फा अशा विद्यार्थी-युवकांच्या वाढत्या असंतोषाकडेही या अभियानातून लक्ष वेधले जात आहे. रोजगार, शिक्षण आणि भविष्यातील सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर असताना धर्म आणि जात यांच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे राजकारण थांबवून जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर सरकारने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
Source link
‘बदलाव जरुरी है’साठी नांदगाव तालुक्यात 12 गावांत होणार सभा:1 सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनात सहभागी होण्याची हाक
