Headlines

एमपीएससी पेपरफुटीचे धक्कादायक कनेक्शन; ब्रेकअपनंतर प्रियकराची तक्रार;तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक (गट-ब) पदासाठी झालेल्या चाळणी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात पेपरफुटीचा प्रकार एका प्रेमसंबंधातील वाद आणि त्यानंतर झालेल्या ब्रेकअपमुळे उघड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गुन्हे शाखेच्या आरोपानुसार, लोकेश उर्फ गौरव पाटील (25) याला 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेपूर्वी त्याची प्रेयसी ऋतुजा हिच्याकडून एमपीएससी परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाली होती. परीक्षेनंतर निकाल जाहीर झाला आणि ऋतुजाने चांगले गुण मिळवत यश संपादन केले.

यानंतर दोघांमध्ये ब्रेकअप झाले. ऋतुजाला सरकारी नोकरी मिळाल्यानंतर ती आपल्यापासून दूर जाईल, अशी भीती गौरवला वाटत होती. त्यातून त्याने एमपीएससीकडे पेपरफुटीबाबत तक्रार केल्याचा आरोप गुन्हे शाखेने केला आहे. त्यामुळे खासगी नात्यातील वादामुळे पेपरफुटीचा प्रकार तपास यंत्रणांच्या निदर्शनास आल्याचे समोर आले आहे.

या परीक्षेत ऋतुजाने सातवा क्रमांक मिळवल्याचे सांगण्यात येत आहे. पेपर आधीच मिळाल्याचा आरोप असल्याने तिलाही गुन्हे शाखेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात तिची भूमिका आणि प्रश्नपत्रिका तिला कशी मिळाली, याबाबत तपास सुरू आहे.

पेपरफुटीच्या या प्रकरणात एमपीएससीच्या अधिकाऱ्यांचा सहभाग समोर आल्याने स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हे शाखेकडून तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी तसेच प्रश्नपत्रिका फुटण्यामागील संपूर्ण साखळीचा तपास सुरू आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत