Headlines

रवींद्र जडेजा 88 वर, पाकिस्तानचा स्टार 40 वर; टीम इंडियाची चिंता वाढवणारे आकडे नेमके कोणत्या रेकॉर्डचे?


Ravindra Jadeja News : कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर असताना रवींद्र जडेजाच्या नावावर अनोखा आणि नकोसा वाटणारा विक्रम नोंदला गेला आहे. २०२१ नंतर टेस्ट क्रिकेटमध्ये झालेल्या या विक्रमाच्या यादीत जडेजा अव्वल ठरला आहे.

Ravindra Jadeja no balls
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटीत टीम इंडिया विजयाच्या अगदी उंबरठ्यावर उभी आहे. पण, या विजयाच्या आनंदात भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने केलेली एक मोठी चूक समोर आली आहे. या एका चुकीमुळे जडेजाच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील एका अत्यंत लाजीरवाण्या आणि नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. २०२१ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘नो-बॉल’ टाकणाऱ्या फिरकी गोलंदाजांच्या यादीत जडेजा आता थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

जडेजाचा लाजीरवाणा विक्रम

कोलंबो कसोटीत जडेजाने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात १ असे एकूण ४ नो-बॉल टाकले. यासह २०२१ पासून कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नो-बॉलची संख्या तब्बल ८८ वर पोहोचली आहे. हा आकडा टीम इंडियाची चिंता वाढवणारा आहे, कारण या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानच्या नोमान अलीच्या नावावर फक्त ४० नो-बॉल आहेत. म्हणजेच, जडेजा दुसऱ्या क्रमांकावरील गोलंदाजापेक्षा तब्बल ४८ नो-बॉलने पुढे आहे.

या यादीत लसिथ एम्बुलडेनिया (३३), जॅक लीच (१९), जोमेल वॉरिकन (१७) आणि झहीर खान (१७) यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व गोलंदाज डावखुरे फिरकीपटू आहेत. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये ‘नो-बॉल’ म्हणजे केवळ एक धाव नसते, तर तो फलंदाजाला मिळणारा जीवदान आणि अतिरिक्त चेंडू असतो. अशा वेळी संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजाने ८८ नो-बॉल टाकणे हे खऱ्या अर्थाने चिंताजनक मानले जात आहे.

Maharashtra TimesAnaya Bangar News : BCCIकडून प्रतिसाद नाही, मग ऑस्ट्रेलियाकडे धाव; अनायाला महिला संघात क्रिकेटची संधी कशी मिळाली? रिपोर्ट ठरला महत्त्वाचा

स्पिनर्सची बेशिस्त अन् प्रशिक्षकांवर प्रश्न

फक्त जडेजाच नाही, तर संपूर्ण भारतीय फिरकी आक्रमणाची बेशिस्त या सामन्यात चव्हाट्यावर आली आहे. या कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी आतापर्यंत तब्बल १० नो-बॉल टाकले आहेत. २०२१ नंतर एका कसोटी सामन्यात फिरकीपटूंनी सर्वाधिक नो-बॉल टाकण्याचा विक्रम अफगाणिस्तान-बांगलादेश (२०२३ – १५ नो-बॉल) आणि भारत-इंग्लंड (२०२१ – १४ नो-बॉल) यांच्या नावावर आहे. आता भारत या नकोशा विक्रमाच्या बरोबरीपासून अवघ्या ४ नो-बॉल दूर आहे.

भारतीय संघात सध्या साईराज बहुतुले फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. अशा वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर फिरकीपटूंकडून होणाऱ्या या घोडचुका टीम मॅनेजमेंट आणि प्रशिक्षकांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.