RIshabh Pant ICC Ranking : आयसीसीच्या ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे. तो आता शुभमन गिलसोबत सातव्या क्रमांकावर पोहोचला असून टॉप-१० मध्ये भारताचे फक्त दोन फलंदाज आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने बुधवारी (२६ ऑगस्ट) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या ताज्या मानांकनात भारतीय संघाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने जबरदस्त गरुडभरारी घेतली आहे. पंतने थेट ६ स्थानांची मोठी झेप घेत जगात सातवा क्रमांक पटकवला असून, तो या क्रमवारीत एक नंबर भारतीय फलंदाज ठरला आहे. पंतच्या खात्यात सध्या ७११ रेटिंग पॉईंट्स जमा झाले असून, तो भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल याच्यासोबत संयुक्तपणे सातव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांच्या यादीत हे दोघे संयुक्तपणे एक नंबरला पोहोचले आहेत.
विशेष म्हणजे, आयसीसीच्या टॉप-१० फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवणारे पंत आणि गिल हे केवळ दोनच भारतीय खेळाडू आहेत. टॉप-५ मध्ये सध्या एकाही भारतीय फलंदाजाला स्थान मिळवता आलेले नाही. इंग्लंडचा हॅरी ब्रूक ८७४ रेटिंग पॉईंट्ससह जगात पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दरम्यान, गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने जसप्रीत बुमराहला मागे टाकत जगातील नंबर-१ कसोटी गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.
गेल्या काही काळापासून रेड-बॉल क्रिकेटमध्ये ऋषभ पंतच्या बॅटचा जलवा सातत्याने पाहायला मिळत आहे. श्रीलंका मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत त्याने अनुक्रमे ३९ आणि ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने ६ चौकार आणि २ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ६३ धावा ठोकल्या. दरम्यान, त्याच्या या धावा काही सोप्या नव्हत्या. सामन्यादरम्यान तो जखमी झालेला पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराचा एक उसळता (शॉर्ट) चेंडू त्याच्या डाव्या मनगटावर जोरात लागला, ज्यामुळे त्याला ‘रिटायर्ड हर्ट‘ होऊन मैदान सोडावे लागले होते. तर आता दुसऱ्या दिवशी त्याच्या उजव्या खांद्यालाही दुखापत झाली होती, अशातही तो एका जखमी वाघाप्रमाणे पेनकिलर्स खात संघासाठी मैदानात खेळला. याआधी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीतही त्याने ८१ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीचे गोड फळ त्याला आयसीसी क्रमवारीत मिळाले आहे.
ऋषभ पंतची कसोटी कारकीर्द
ऑगस्ट २०१८ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या ऋषभ पंतने ५० कसोटी सामन्यांचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंत ५२ कसोटी सामने खेळले आहेत. या ५२ सामन्यांच्या ९० डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ४३.८२ च्या दमदार सरासरीने तब्बल ३७२५ धावा कुटल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ८ शतके आणि २१ अर्धशतके निघाली असून, १५९ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या राहिली आहे. सध्या टीम इंडियाचा मुख्य यष्टिरक्षकम्हणून कसोटी क्रिकेटमध्ये त्याची भूमिका अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची ठरत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा