सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आरोग्यविषयक विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची त्यांच्या ‘सुरुची’ निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह मतदारसंघातील इतर रुग्णालयांमध्ये रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय तसेच इतर आरोग्य संस्थांमध्ये डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. ही पदे लवकरात लवकर भरून रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केसरकर यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली.
तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. परिसरातील रुग्णांना डायलिसिससाठी इतर ठिकाणी जावे लागू नये, यासाठी रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे लवकरात लवकर भरण्याचे तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी डायलिसिस यंत्रणा लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न आता मार्गी लागला असून रुग्णालयाच्या बांधकामासाठी पुढील आवश्यक कार्यवाही विभागाकडून तातडीने करण्यात यावी, अशी विनंतीही आमदार केसरकर यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. रुग्णालयाचे बांधकाम लवकर सुरू होण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
