ग्रामीणमध्ये तीन केंद्रांना मंजुरी : विजेच्या समस्या होणार दूर : खासदारांकडून सकारात्मक प्रतिसाद
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : सुरळीत व चांगल्या दर्जाचा औद्योगिक वसाहतींना वीजपुरवठा मिळत नसल्याची तक्रार मागील अनेक वर्षांपासून होत होती. विजेच्या समस्येमुळे अनेक उद्योजक आपले युनिट बेळगाव ऐवजी इतर राज्यांमध्ये सुरू करण्यावर भर देत होते. यावर तोडगा काढण्यासाठी केपीटीसीएल व हेस्कॉम पुढे सरसावले असून येत्या वर्षभरात तीन नवी वीज केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
बेळगावची औद्योगिक वसाहत ही केवळ उद्यमबाग व अनगोळपुरती
मर्यादित न राहता ती मच्छे, वाघवडे रोड, नावगे, किणयेरोड, बामणवाडी, खादरवाडी, पिरनवाडी, देसूर या ग्रामीण भागातही वाढू लागली आहे. परंतु शहरी भागाप्रमाणे या ठिकाणी वीजपुरवठा होत नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे होते. शहरातील औद्योगिक वसाहतीत भूमीगत वीजवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा
खंडित होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. परंतु ग्रामीण भागातील केवळ मच्छे वगळता इतर औद्योगिक वसाहतीत भूमीगत वीजवाहिन्या नसल्याची तक्रार उद्योजकांतून होत होती.
वीज केंद्रांसाठी निविदा
उद्योजकांची ही समस्या सोडविण्यासाठी हेस्कॉमचा ग्रामीण विभाग पुढे सरसावला आहे. नावगे, मच्छे व देसूर अशा तीन ठिकाणी नवीन वीज केंद्रे होणार आहेत. यापैकी नावगे येथील 110 केव्ही वीज केंद्रासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित दोन वीज केंद्रांच्या निविदा लवकरच मागविल्या जाणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे.
ही तिन्ही वीज केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर वीजपुरवठ्याची समस्या कायमची दूर होईल. तसेच नवीन उद्योगांना चांगल्या दर्जाचा वीजपुरवठा करणे सोयीचे होईल. केपीटीसीएलने तात्पुरता दिलासा म्हणून मच्छे 110 केव्ही केंद्रावर अतिरिक्त 10 एमव्हीए आणि उद्यमबाग 110 केव्ही केंद्रावर 10 एमव्हीए वीजपुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मच्छे, नावगे व देसूर येथील वीज केंद्राचे काम पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
खासदारांकडून सकारात्मक प्रतिसाद
औद्योगिक वसाहतीतील वीज समस्या सोडविण्यासाठी सोमवारी हेस्कॉमचे ग्रामीण कार्यकारी अभियंता विनोद करूर व चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी यांनी खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेतली. यावेळी त्यांना औद्योगिक वसाहतीतील वीज समस्या समजावून सांगून नवीन वीज केंद्रांची माहिती देण्यात आली. यापूर्वी त्यांनी कर्नाटकचे औद्योगिक मंत्रीपद सांभाळले असल्याने त्यांनी वीज केंद्र सुरू करण्यासाठी आपणही प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
उद्योगांचेस्थलांतर थांबेल
बेळगावच्या उद्योगांसमोरील वीज समस्या सोडविण्यासाठी नव्याने तीन वीज केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी हेस्कॉम व केपीटीसीएलकडून मेहनत घेतली जात आहे. सर्व लोकप्रतिनिधींनीही यासाठी वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे बेळगावमधील उद्योग तसेच युवकांना यापुढे इतर देश अथवा राज्यांमध्ये नोकरीसाठी स्थलांतर करावे लागणार नाही. यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– विनोद करूर,
साहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम ग्रामीण
