![]()
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘भेसळमुक्त महाराष्ट्र, आरोग्यदायी महाराष्ट्र’ या विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार मयुरेश कोण्णूर यांनी तुकाराम मुंढे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी अन्नातील भेसळ, नागरिकांची भूमिका, सोशल मीडिया, मोबाईलचा वाढता वापर, प्रशासनाची कार्यपद्धती आणि नैतिकतेचे महत्त्व अशा विविध विषयांवर मुंढे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
“झोपलेल्या व्यक्तीला जागं करता येतं; मात्र झोपल्याचं सोंग घेतलेल्या व्यक्तीला जागं करता येत नाही,” असं सांगत त्यांनी समाजातील उदासीनतेवर भाष्य केलं. माहिती आणि ज्ञानाच्या बाबतीत आपण चिकित्सक असतो; मात्र अन्नपदार्थ खरेदी करताना आणि त्यातील भेसळ ओळखताना तोच चिकित्सकपणा दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“माणूस केवळ शरीराने नव्हे, तर वैचारिकदृष्ट्याही निरोगी असायला हवा. भेसळ पदार्थांमध्ये असते, तशीच भेसळ विचारांमध्येही असते,” असं म्हणत त्यांनी डिजिटल युगातील आव्हानांकडे लक्ष वेधलं. सोशल मीडिया अल्गोरिदममुळे आपल्यासमोर एकाच बाजूची माहिती येऊ शकते. त्यामुळे कोणतीही माहिती थेट लाईक किंवा फॉरवर्ड करण्यापूर्वी तिचा परिणाम विचारात घ्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
मोबाईलच्या अतिवापरामुळे घराघरातील संवाद कमी होत असल्याची खंत व्यक्त करताना त्यांनी नव्या पिढीला “रीलऐवजी रियालिटी काय आहे, याचा विचार करा,” असा संदेश दिला.
आपल्या स्वभावाविषयी बोलताना मुंढे म्हणाले की, “अगोदर मी साधासुधा होतो, आताही तसाच आहे. आतून एक आणि बाहेरून एक असा माझा स्वभाव नाही. निस्वार्थीपणे सत्याचा स्वीकार करणे आणि जे काही करायचे ते पारदर्शक पद्धतीने करायचे, ही आई-वडील आणि भावाची शिकवण आहे.”
प्रशासनातील निर्णयांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, नियम हे केवळ बंधन नसून लोकहित साधण्याचे माध्यम आहेत. प्रत्येक अधिकारी काम करतो; मात्र कामाची पद्धत योग्य की अयोग्य, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आधीच्या अधिकाऱ्यांनी काय केले याची तुलना करण्यापेक्षा आपल्या निर्णयांचा नागरिकांना अपेक्षित फायदा होतोय का, हे पाहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“हलाखीची परिस्थिती असू शकते; मात्र त्यासाठी नैतिकतेशी तडजोड करणे योग्य नाही. बौद्धिक प्रामाणिकपणा नसेल तर मिळालेले यश तात्पुरते असते,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. कार्यक्रमात नीट यूजी २०२६ परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेली श्रावणी कृष्णकांत कुदळे, जागतिक शूटिंग स्पर्धेतील रौप्यपदक विजेती शौर्या दिलीप भरणे आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेला क्षितीजय प्रवीण नप्ते यांचा तुकाराम मुंढे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रेरणा शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी महक जमू जहागिरदार हिने तुकाराम मुंढे यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर भाषण केले. पत्रकार शफी पठाण लिखित ‘तुकाराम’ या पुस्तकातील मजकुराचे श्रीकांत चौगुले यांनी अभिवाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले, तर सानिका कांबळे यांनी आभार मानले.
