माझ्यासाठी ‘सारेगमप’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर माझ्या संपूर्ण कारकिर्दीबरोबर समांतर चाललेला प्रवास आहे. १९९७मध्ये मी हिंदी ‘सारेगमप’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालो होतो आणि राष्ट्रीय स्तरावर विजेता ठरलो. त्यानंतर मराठी ‘सारेगमप’च्या पहिल्या पर्वापासून मी परीक्षक म्हणून जोडला गेलो. या मंचानं मला लोकप्रियता दिली, माझी ओळख टिकवून ठेवली. या कार्यक्रमानं महाराष्ट्राला उत्कृष्ट गायक दिलेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे चांगले श्रोते घडवले. लोकांना संगीत ऐकण्याची, समजून घेण्याची आणि त्यातील बारकावे समजून ओळखण्याची सवय ‘सारेगमप’ मुळे लागली.
रिअॅलिटी शोमध्ये संघर्षकथा गायकीवर मात करतात, अशी टीका होते. याकडे तू कसं पाहतो ?
कोणताही कार्यक्रम हा प्रेक्षकांच्या आवडीचा विचार करून तयार केला जातो. लोकांना काय आवडतं, काय भावतं याचा सतत अभ्यास होत असतो. संघर्षकथा दाखवल्या जातात, कारण त्या खऱ्या असतात आणि लोक त्यांच्याशी जोडले जातात. पण आम्ही केवळ संघर्षावर भर देत नाही. आमचा प्रयत्न नेहमी समतोल राखण्याचा असतो. एका बाजूला लोकप्रिय गाणी आणि कथा असतात, तर दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांना नवीन गाणी, नवीन विचार आणि वेगळ्या कथा देण्याचाही प्रयत्न असतो. आम्ही सामाजिक भान जपत कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करतो. केवळ एका गाण्यावरून स्पर्धकाचं मूल्यमापन करता येत नाही, त्यामुळे आम्ही त्याच्या ऑडिशनपासून ते आतापर्यंतच्या प्रवासाकडे पाहतो. अर्थात, त्या दिवशीच्या सादरीकरणाला गुण देणं हे आमचं कर्तव्य असतं. पण त्याचबरोबर या स्पर्धकाचा पुढे गायक म्हणून प्रवास होईल का, तो या क्षेत्रात टिकेल का, याचाही विचार आम्ही करतो. माझ्या मते, एखादा स्पर्धक जिंकला की, नाही यापेक्षा स्पर्धेनंतर त्यानं आपली कारकीर्द किती यशस्वीपणे उभी केली, हे अधिक महत्त्वाचं आहे.
खरी ताकद सामाजिक विषयांमध्येच !
गेली काही वर्षं दिग्दर्शनापासून थोडा दूर राहिलो. त्यामागचं कारण म्हणजे निर्मिती, संगीत, टीव्हीवरील कार्यक्रन, कॉन्सर्ट्स आणि वर्ल्ड टूर यामध्ये व्यग्र होतो. खरं सांगायचं तर मराठी चित्रपट दिग्दर्शित करणं आर्थिकदृष्ट्याही मोठी जबाबदारी असते. आता मी पुन्हा त्या दिशेनं काम सुरू केलं आहे. दोन संहिता तयार आहेत आणि २०२७मध्ये त्या प्रत्यक्षात येतील, अशी अपेक्षा आहे. माझा कल नेहमीच सामाजिक आणि वास्तववादी विषयांकडे राहिला आहे. त्यामुळे आगामी चित्रपटही त्याच धाटणीचे असतील. प्रेमकथा करण्याचा एक प्रयत्न मी पूर्वी केला होता, पण माझी खरी ताकद सामाजिक विषयांमध्येच आहे, हे मला समजलं. त्यामुळे त्याच मार्गानं पुढे जाण्याचा विचार आहे.
विविध कामांमध्ये व्यग्र असतानाही तू सातत्यानं सिनेमात गाणं गातोस…
कारण सर्वप्रथम मी गायक आहे. गायक हीच माझी मूळ ओळख आहे. त्यानंतर संगीत दिग्दर्शन, परीक्षण, चित्रपट निर्मिती, कॉर्पोरेट अँथम्स, राजकीय गाणी, नाटकं अशा अनेक गोष्टी आल्या. पण मुळाशी गायकच आहे. डॉक्टर जसा कितीही मोठा झाला तरी रुग्ण तपासणं सोडत नाही, तसंच माझं आहे. मला वाटतं, व्यवसाय आणि प्रोफेशन यामध्ये फरक असतो. प्रोफेशनमध्ये मूल्यं आणि बांधिलकी असते. म्हणूनच कोणीही मला गाण्यासाठी बोलावलं तर मी शक्यतो नाही म्हणत नाही. तो मोठा निर्माता असो किंवा गावाकडून आलेला नवोदित निर्माता असो. मी वेळ देतो, गाणं गातो. कारण गाणं ही माझ्यासाठी केवळ कमाईची गोष्ट नाही, ती माझी ओळख आणि माझं कर्तव्य आहे.
तुझे गुरू कोण आहेत आणि तुझ्या संगीतप्रवासावर त्यांचा कसा प्रभाव आहे?
माझ्या संगीतप्रवासात मला अनेक गुरू लाभले. लहानपणी मी शिवानंद पाटील यांच्याकडे शिकलो. मी साऊंड इंजिनीअर असल्यामुळे संगीताच्या तांत्रिक बाबींचा माझ्यावर प्रभाव आहे. गायक म्हणून किशोर कुमार हे माझे मोठे गुरू आहेत. आजही एखादं गाणं गाताना अडचण आली तर मी स्वतःला विचारतो, ‘हे किशोरदांनी कसं गायलं असतं?’ संगीतकार म्हणून पंचमदांचं योगदान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. पण या सगळ्यांपेक्षा मोठा गुरू म्हणजे प्रेक्षक. त्यांनी इतकी वर्षं प्रेम दिलं, चुका दाखवल्या, चांगलं काम स्वीकारलं आणि वाईट नाकारलं. कलाकारासाठी याहून मोठा आणि प्रामाणिक गुरू दुसरा कोणी असूच शकत नाही.
Aayush Bhide Interview: ‘आई गेली तो पर्यंत तिला माहिती नव्हतं की, बाबा गेलेत’, आयुष भिडेच्या आयुष्यातला तो कठीण दिवस, १४ दिवसांत आयुष्यच बदललं; तुमच्याही डोळ्यात येईल पाणीसहकारी वैशाली सामंत विषयी काय सांगशील ?
वैशाली सामंत ही माझ्यासाठी केवळ सहकारी किंवा मैत्रीण नाही, तर माझ्या आयुष्याला दिशा देणारी व्यक्ती आहे. खरं सांगायचं तर, आज मी जो काही आहे, त्यामध्ये तिचा फार मोठा वाटा आहे. मिठीबाई कॉलेजमध्ये ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी सीनिअर होती. त्या कॉलेजच्या दिवसात इंटरकॉलेज स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना पाठवण्याची जबाबदारी तिच्यावर असायची. मी मात्र तेव्हा खूप आळशी होतो. स्पधांमध्ये जाण्याचा कंटाळा करायचो, पण ती मला सतत प्रोत्साहन देत राहिली. नंतर मी साऊंड इंजिनीअरिंग केलं, रेकॉर्डिस्ट म्हणून काम करू लागलो. वैशालीनंच मला विचारलं, ‘तू संगीत दिग्दर्शन का करत नाहीस ?’ तिनंच मला संगीत दिग्दर्शनाकडे वळवलं,सागरिका म्युझिककडे घेऊन गेली. आज मी गायक संगीतकार, दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो, त्यामागे तिनं योग्य वेळी दिलेला पाठिंबा आहे. वैशाली नसती तर कदाचित मी आजही फक्त रेकॉर्डिस्ट म्हणूनच काम करत असतो. ‘सारेगमप’च्या मंचावर आमचं नातं केवळ परीक्षकांचं नाही, तर अनेक वर्षांच्या मैत्रीचं आहे. त्यामुळे संवाद नैसर्गिक होतो. एकमेकांच्या ताकदी आणि कमतरता आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे मंचावरील आमचं ट्युनिंग प्रेक्षकांनाही जाणवतं.

