Headlines

‘आई गेली तो पर्यंत तिला माहिती नव्हतं की, बाबा गेलेत’, आयुष भिडेच्या आयुष्यातला तो कठीण दिवस, १४ दिवसांत आयुष्यच बदललं; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी


Aayush Bhide on Parents Death in Corona:मराठी सिनेविश्वातला अभिनेता आयुष भिडे सध्या चर्चेत आलाय. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं त्याच्या आयुष्यात सगळ्यात कठीण असा प्रसंग सांगितला.

Aayush Bhide Interview
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांच्याही आयुष्यात असे अनेक क्षण, अशा अनेक आठवणी असतात ते ऐकणं, वाचणं चाहत्यांनाही कठीण जातं. मराठी नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीतला अभिनेता आयुष भिडे याच्या आयुष्यातही असे कठीण प्रसंग एकदा नव्हे तर दोनदा आले.

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना कायमचं गमावलं. आयुषच्या वाट्याला आलेलं हे दु:ख किती तरी मोठं होतं. त्यानं आई-वडिल दोघांनाही काही दिवसांच्या आता गमावलेलं. इतकंच नाही तर वडिलाचं निधन झालंय, हे त्यानं आईला शेवटपर्यंत सांगितलंच नव्हतं. हा सगळा काळीज पिळवटून प्रसंग, ते दिवस त्यानं महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या सेलिब्रिटी कॉर्नर या मुलाखतीत शेअर केले. हे सांगत असताना त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं.

बाबांना वर्क फ्रॉम होम होतं. कधी इमर्जन्सी असली की कामाला जावं लागायचं असं नाही की ते ट्रेन ने किंवा ऑफिसच्या बसने प्रवास करायचे, मी त्यांना स्वत: गाडीने घेऊन जायचो. पण दुर्देवानं त्यांना करोनाची लागण झाली. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांना ताप आला होता. त्यानंतर चाचणी केल्यानंतर त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की, जास्त नाहीये, आपण बरा करुया, फक्त ऑक्सिजन लेव्हल कमी झाली की अॅडमिट करूया. हे सगळं ऐकल्यानंतर मी घाबरलो होतो. दुसऱ्याच्या घरी जेव्हा असं काही होतं तेव्हा आपण सहानुभूती देतो, पण जेव्हा आपल्याच सोबत घडतं तेव्हा मला कळत नव्हतं, आता करू काय? दुसऱ्या लाटेत बेड मिळत नव्हते तेव्हा. त्यानंतर गोष्टी नॉर्मल होत होत्या. पण अचानक त्यांची ऑक्सिजन लेव्हल डाऊन होत होती याच काळात आईला पण करोना झाला.

आईला करोना झाल्यानंतर मी जास्तच घाबरलो. त्या दोघांनाही अॅडमिट केलं.आता मी पळू कुठे कुठे. बाबांचे बाबा , आजोबा तेही होते. त्यांचं वय ९२ वर्षे होतं. अॅडमिट केल्यानंतर दोन तीन दिवसांनी मला फोन आला की, बाबांची तब्येत गंभीर आहे, तुम्ही या. एक इंजेक्शन हवं आहे,ते तुम्ही अरेंज करा. पण लक इतकं वाईट की ते मिळालंच नाही. मी कधीच विचार केला नव्हता की, असा काही प्रसंग माझ्या आयुष्यात, माझ्या वाट्याला येईल.

आयुष भिडे मुलाखत

एकुलता एक मी, इन मीन आम्ही घरी तिघंच असायचो. पण बाबांचं असं झाल्यानंतर मला कळलंच नाही, हे कसं झालं…पण मी उभा होतो, कारण आई होती. तिच्यासमोर मला हे सांगणं जड जाणार होतं. आई गेली तो पर्यंत तिला माहिती नव्हतं की बाबा गेलेत. माझी भीती ही होती की, मी तिला सांगितलं आणि तिला काय झालं तर, एक धक्का मी पचवण्याचा प्रयत्न करत होतो, पटकन दुसरा आला तर मी करू काय? यानंतर आईची तब्येत काहीशी सुधारत होती. म्हणून मी आजीला, मावशीला घरी बोलावून घेतलं होतं. की मी तिला सांगेन, पण तुम्ही सांभाळायला या. या दरम्यान, मी आई समोर अभिनय करायचो की, बाबा आहेत त्याच हॉस्पिटलला,फक्त ते दुसऱ्या वॉर्डमध्ये आहेत. हे करताना मला खूप वाईट वाटायचं, ज्यांच्याकडून मी अभिनय शिकलो, माझे पहिले अभिनयातले गुरू माझे बाबा. आज त्यांच्या निधनाबद्दल आईला मला सांगता येत नाहीये, हे दु:ख होतं. मला आईला गमवायचं नव्हतं.

बाबा गेले त्यानंतर ७ मे रोजी, १४ व्या दिवशी बाबांचं डेट सर्टिफिकेट हातात आलं. तेव्हाच हॉस्पिटलमधून मला फोन आला, की आईची प्रकृती गंभीर आहे. आईला व्हेंटिलेटरवरती शिफ्ट करतोय.व्हेंटिलेटर ऐकल्यानंतर मी खचलोच. त्यानंतर मी कैलास दादा त्याला घरी बोलवलं होतं. हॉस्पिटलमधू तिसरा फोन आला तो मी उचलाच नाही, मी तो दादाला दिला. त्याने फक्त माझ्याकडे बघितलं. मला असं झालं की, सगळं संपलं, काही राहिलंच नाहीये माझ्या आयुष्यात आता. माझी मावशी, आजी घरी होत्या, सगळे रडत होते, पण माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं. कारण मला त्यांना सांभाळायचं होतं. १४ दिवसांत माझं आयुष्य पूर्णपणे बदललं.

हे मुलाखतीत सांगत असताना आयुषला त्याचे अश्रृ थांबवणं कठीण गेलं. इतक्या मोठ्या प्रसंगातून आयुष पुन्हा उभा राहिला आणि त्याने करिअरवर लक्ष केंद्रीत केलंय. आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करत असल्याचंही त्यानं यावेळी सांगितलं. त्याची ही मुलाखत युट्यूब तसंच सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा