![]()
मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (24 ऑगस्ट) पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी भाषा, साहित्य आणि व्याकरणाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रा. यास्मिन शेख यांनी आयुष्याची अनेक दशके मराठी भाषेच्या अभ्यासाला आणि अध्यापनाला वाहिली… ‘मागोवा-मराठी भाषेच्या प्रमाणलेखनाचा इतिहास’ हा बृहद प्रकल्प पाच-सहा वर्षांच्या अभ्यासानंतर जेव्हा पूर्णत्वाला गेला, तेव्हा डॉ. रसाळ सर म्हणाले, ही संहिता प्रा. यास्मिन शेख यांच्याकडून बारकाईने तपासून घ्या. त्यापूर्वी प्रा.शेख यांची त्यांचे विविध कोश आणि पुस्तके गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून मला मोलाचे साहाय्य करत होतीच… पुण्याला गेल्यानंतर त्यांना मी अधूनमधून भेटत असे… डॉ. रसाळ सरांनी सुचवल्याप्रमाणे मी संहिता त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी ती बारकाईने पाहिली, पुढे नीट तपासली आणि या कामाचे खूप भरभरून कौतुक केलं. या कामाचे मोल जाणले. सुधारणा सूचवल्या. अभ्यासपूर्ण-अनुरूप अशी प्रस्तावना लिहिली. (कदाचित ही शेवटची प्रस्तावना त्यांनी लिहिली असावी. ) तीही त्यांच्या हस्तक्षरात. पुढे अधूनमधून आमचं बोलणं होई, पुस्तक लवकरात लवकर येवोत, असे त्या म्हणत. वेळोवेळी अगत्याने विचारपूस असे. (मी स्वतःला सुदैवी समजतो की एवढ्या महनीय, थोर व्यक्तीचा सहवास मला लाभला.) प्रा. यास्मिन शेख… विलक्षण भाषिक बुद्धिमत्ता लाभलेल्या विदुषी! एकशे दोन वर्षांत पदार्पण करणाऱ्या या भाषातज्ज्ञ अक्षरशः तरुणाईला लाजवेल, आचंबा वाटेल अशा ऊर्जा, उत्साह आणि तल्लखतेने कार्यरत होत्या. प्रत्येक शब्दाच्या, वाक्याच्या, मांडणीच्या, तसेच विरामचिन्हांच्या सूक्ष्मतेसह काटेकोर आणि चिकित्सक दृष्टीने भाषेचा समग्र अभ्यास ही त्यांची अभ्यासूवृत्ती असे. ज्येष्ठ लेखकाने इतर लेखकांची उमेद कशी वाढवावी, लेखकाला उभारी कशी द्यावी, याचा वस्तुपाठ म्हणजे प्रा. यास्मिन शेख.(आज हे अभावाने जाणवते, म्हणून हे अनन्य) व्याकरण आणि भाषाशास्त्र ही अभ्यासक्षेत्रे असलेल्या प्रा.यास्मिन शेख (पूर्वाश्रमीच्या जेरुशा जॉन रूबेन) या एक ज्येष्ठ भाषा संशोधक आणि व्याकरण तज्ज्ञ म्हणून संपूर्ण मराठी साहित्य- विश्वात सुपरिचित होत्या. (शब्दकोशाच्या रूपाने त्या आपल्यात नेहमी असतीलच.) नाशिक येथे कन्या शाळा आणि मुलांची शाळा येथे सात वर्षे त्यांनी अध्यापन केले. मिलिंद महाविद्यालय (औरंगाबाद – आताचे छत्रपती संभाजीनगर) येथे दोन वर्षे त्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या. पुढे एस. आय.ई. एस. महाविद्यालय, शीव, मुंबई येथे पंचवीस वर्षे मराठीच्या प्राध्यापिका. शेवटची सहा वर्षे मराठी विभागप्रमुख. निवृत्तीनंतर शासनाच्या ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर’ मुंबई यांच्या वतीने ‘आय.ए.एस.’ च्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण व भाषाशास्त्र शिकवण्यासाठी निमंत्रित, तिथे दहा वर्षे अध्यापन. ‘बालभारती’ पुणे या संस्थेत सात वर्षे मराठीच्या शालेय पुस्तकांचे अचूक संपादन (सहकार्याने) तसेच ‘बालभारती’च्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या अभिनव ‘कार्यात्मक व्याकरणा’च्या पुस्तक निर्मितीत प्रा .शेख यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. पुण्याच्या ‘अंतर्नाद’ (संपादक- भानू काळे) या मराठीतील दर्जेदार मासिकात ‘व्याकरण- सल्लागार’ म्हणून गेली बावीस वर्षे त्या कार्यरत होत्या . अंतर्नाद प्रमाणलेखनदृष्ट्या निर्दोष राखण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. ‘राज्य मराठी विकास संस्था’, मुंबई मा.अध्यक्षांच्या विनंतीवरून ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ हे भाषा तज्ज्ञांनी सुचवलेले शासनमान्य प्रमाण मराठीचे लेखनविषयक अठरा नियम सोप्या, परिचित शब्दांत, अनेक उदाहरणे देऊन त्यांनी प्रस्तुत पुस्तक लिहिले. शिवाय या नियमांत नसलेल्या, पण मराठी प्रमाणलेखनात आवश्यक असलेल्या नियमांचे सुबोध स्पष्टीकरण केले. विशेष म्हणजे यात मौलिक अशी भर घातली. मराठीतील जोडाक्षरांचे लेखन, लेखनातील विविध विरामचिन्हे आणि त्यांचे लेखनातील (वाक्यांतील) योग्य स्थान, वाक्यरचना, (सदोष वाक्यरचना निर्दोष कशी लिहावी, याचे विवेचन) आणि शेवटच्या प्रकरणात ‘हे शब्द असे लिहा’ या शीर्षकाखाली असंख्य शब्दांची दिलेली सूची मराठी भाषकांना उपयुक्त ठरत आलेली आहे, पुढेही ठरत राहील. प्रा.यास्मिन शेख यांनी लिहिलेले दुसरे पुस्तक ‘मराठी शब्दलेखन कोश’ असून उपरोक्त दोन्ही पुस्तके मराठी भाषकांना अत्यंत मार्गदर्शक व संग्राह्य आहेत, याशिवाय त्यांचे व्याकरणविषयक, परीक्षणात्मक, व्यक्तिचित्रणात्मक लेखन विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले होते. प्रा.शेख यांना प्राप्त झालेले काही ठळक पुरस्कार …’मराठी शब्दलेखन कोश’ (प्रथमावृत्ती) महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, ‘अंतर्नाद’ मासिकाच्या वतीने व्याकरण सल्लागार व मुद्रित-शोधन पुरस्कार. प्रा.यास्मिन शेख यांनी प्रमाण लेखनासंदर्भात मांडलेली भूमिका मराठी साहित्य महामंडळाच्या शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार निर्मिती असलेला प्रा .शेख यांनी लिहिलेला संदर्भसंपन्न असा लेखनकोश मराठी साहित्यात आणि भाषाक्षेत्रात मानदंड ठरलेला आहे./ ठरत आलेला आहे. ‘मराठी शब्दलेखनकोशा’च्या ‘पाठराखण’ मधील मनोगतात ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा.ग. जाधव लिहितात, “सध्याच्या मराठी लेखनाची दुरवस्था दूर करण्यासाठी मोठ्या तळमळीने व अभ्यासपूर्वक परिश्रमाने प्रा. यास्मिन शेख यांनी सिद्ध केलेला हा कोश ऐतिहासिक महत्त्वाचा ठरतो; कारण मराठी भाषेत यासारख्या कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या कोशरचनांची गरज आहे व यासाठी अभ्यासकांनी पुढे आले पाहिजे.” प्रा.यास्मिन शेख लिहितात, “बोलीभाषांचे महत्त्व मला मान्य आहे. ललित साहित्याला त्यामुळे प्रादेशिक डूब मिळून एक सच्चेपणा, एक जिवंतपणा येतो; पण औपचारिक, शास्त्रीय, नियतकालिकातील वृत्तलेखन, शासन व्यवहारातील मराठी लेखन व एरवीही जिथे निवेदन असेल, तिथे प्रमाण भाषेचाच वापर हवा. नाहीतर लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे, ते समस्त मराठी जणांना कसे कळणार ? बोलीभाषेतील साधारण आशय संदर्भाने कळेलही, पण त्या आकलनात नेमकेपणा कसा येणार? प्रमाणभाषा जपली नाही, तर भाषेच्या क्षेत्रात अनागोंदी माजेल.” पुढे त्या म्हणतात, “शुद्धलेखनाचे व विशेषतः ऱ्हस्व-दीर्घाबद्दलचे काही नियम बदलायचे असतील, तर त्यानुसार अधिकृतरित्या नियमांमध्ये अवश्य बदल करा, पण जोवर तसे होत नाही, तोवर सध्याचे शासनमान्य अठरा नियम आपण पाळलेच पाहिजेत .”भाषाविषयक विचार मांडताना त्या म्हणतात, “प्रमाण भाषेचा उपहास आणि वेगवेगळ्या स्थानिक बोलीभाषांचा हिरिरीने पुरस्कार करण्याचे दिवस आहेत,पण खरे सांगायचे तर, प्रमाणभाषा की बोलीभाषा हा वाद फसवा आहे, कारण दोन्हींना आपापले स्वतंत्र स्थान आहेच.” लेखनविषयक नियमांबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना प्रा.शेख लिहितात, “मराठीच्या लेखनात एकवाक्यता व एकसूत्रीपणा यावा व शासकीय लेखन व्यवहारात मराठीचा वापर अचूकपणे व सुलभपणे करता यावा म्हणून महाराष्ट्र शासनाने महामंडळाकडे मराठी लेखनासंबंधी नियम निश्चित करण्याचे काम सोपविले… हे लेखनविषयक नियम मराठीचे लेखन करणाऱ्या सर्वांना बंधनकारक आहेत. मराठीचे लेखन या नियमांनुसार करणे अपेक्षित आहे आणि आवश्यकही आहे.” प्रा. शेख आपल्या विवेचनात स्पष्ट करतात की, “प्रमाण मराठी भाषेचे लेखनविषयक नियम सर्वांनीच आत्मसात केले पाहिजेत. “प्राध्यापक यास्मिन शेख यांनी 21 जून 2024 रोजीवयाच्या 99 वर्षात पदार्पण केले, हे औचित्य साधून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुप्रसिद्ध लेखक भानू काळे आणि दिलीप फलटणकर यांनी ‘यास्मिन शेख: मूर्तिमंत मराठीप्रेम’ हा गौरव ग्रंथ संपादित केला. मातृभाषेवर प्रेम करणाऱ्या आणि मातृभाषेप्रती आपुलकी असलेल्या अन्य व्यक्तींनाही हा गौरवग्रंथ अतिशय प्रेरक ठरणारा आहे. आपल्यासाठी पहिला शब्द लेखन कोश उपलब्ध करून देणाऱ्या भाषातज्ज्ञ यास्मिनताईंची जडणघडण आणि त्यांची व्यक्तिपैलू उमजून घेण्यासाठी हा ग्रंथ मराठी साहित्यात मौलिक भर घालणारा आहे. प्रत्येकाकडे हा ग्रंथ संग्रही असावाच.प्रमाणभाषा जपली जावी म्हणून आजच्या पिढ्यांना आणि पुढच्या अभ्यासकांना प्रा. यास्मिन शेख यांच्या लेखनातून प्रेरणा मिळत राहतील . (डॉ. नागेश अंकुश यांनी लिहिलेल्या ‘मागोवा-प्रमाण मराठी भाषेच्या निर्दोष (प्रमाण) लेखनाचा इतिहास’ या पुस्तकातून…)
Source link
थोर विदुषीचे जाणे!:प्रा. यास्मिन शेख म्हणजे विलक्षण भाषिक बुद्धिमत्तेचा वस्तुपाठ; वाचा डॉ. नागेश अंकुश यांचा लेख…!
