Headlines

मराठ्यांनो घराबाहेर पडा, हे शेवटचं आंदोलन, सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगे यांचं आवाहन


मनोज जरांगे यांनी उपोषणाला बसू नये यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटी गावात जावून जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. पण सरकारच्या शिष्टमंडळाला त्यामध्ये यश आलं नाही. जरांगे 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम आहेत.

manoj jarange patil
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्टला पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषणाला बसू नये यासाठी जालनाच्या अंतरवली सराटी येथे सरकारचं शिष्टमंडळ आलं. या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. मात्र, या चर्चेनंतरही 29 ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन थांबणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झाले. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड आणि मंत्री शंभूराज देसाई यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसह नोंदी, प्रमाणपत्रे, दाखल गुन्हे मागे घेणे आणि आंदोलनादरम्यान बलिदान झालेल्या समाजबांधवांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत चर्चा झाली.

विखे पाटील काय म्हणाले?

या बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगितले. जरांगे पाटील यांचा समाजासाठी लढा असून, शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने त्यांची नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंमलबजावणीतील त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही विखे पाटील यांनी सांगितले. तसेच आंदोलनाबाबत जरांगे पाटील यांनी फेरविचार करावा, अशी विनंती सरकारच्या वतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जरांगे पाटील काय म्हणाले?

शिंदे समितीने दिलेल्या 58 लाख नोंदींच्या आकडेवारीचा मुद्दाही चर्चेत आला. या नोंदींच्या आधारे पात्र मराठा समाजबांधवांना प्रमाणपत्रे देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी सरकारसमोर ठामपणे मांडली. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांचे प्रमाणपत्र द्या आणि जे काही करायचे आहे ते 29 ऑगस्टपूर्वी करा, असे आपण सरकारला स्पष्ट सांगितल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

सरकारच्या शिष्टमंडळासोबत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

सरकारच्या शिष्टमंडळासोबत सातारा GR संदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी, त्याअंतर्गत प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी, मराठा आंदोलनादरम्यान राज्यभर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे तसेच आंदोलनात बलिदान झालेल्या समाजबांधवांच्या कुटुंबीयांना निधी देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, 27 ऑगस्ट रोजी सरकारसोबत पुन्हा बैठक होण्याची शक्यता असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. शासनाला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

जरांगे यांचं मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन

सरकारकडून होणाऱ्या चर्चेपेक्षा 28 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ज्या मराठा समाजबांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत, मात्र अद्याप त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत यावे, असे त्यांनी आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील त्यांनीही अंतरवालीत यावे, असे ते म्हणाले.

29 ऑगस्टचे आंदोलन थांबणार नाही. हे माझे शेवटचे आणि निर्णायक आंदोलन आहे, असे सांगत जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठा समाजबांधवांना खडबडून जागे होऊन घराबाहेर पडण्याचे आणि 29 ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.