Headlines

घरबसल्या मोबाईलवरून काढा नवीन पॅन कार्ड; ऑनलाईन पद्धत, सरकारी फीसह इथे ‘A टू Z’ माहिती । Maharashtra Times


Apply New PAN Card: आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पॅन कार्ड (PAN Card) काढणे आता अत्यंत सोपे झाले आहे. आयकर विभागाच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे युजर्स कोणत्याही कागदपत्रांची फिजिकल कॉपी न पाठवता, केवळ आधार कार्ड आणि ई-केवायसीच्या माध्यमातून नवीन पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Pan Card । Maharashtra Times
सौजन्य:’X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
Apply New PAN Card : नवीन पॅन कार्ड काढताना डिजिटल कॉपी (e-PAN) आणि प्लास्टिक कार्ड (Physical PAN) असे दोन पर्याय मिळतात. सरकारी नियमांनुसार यासाठी केवळ 101 ते 107 रुपये खर्च येतो. पेपरलेस प्रक्रियेमुळे अर्जदाराचा वेळ वाचतो आणि अवघ्या काही दिवसांत पॅन कार्ड घरपोच स्पीड पोस्टाने पाठवले जाते.

नवे पॅन कार्ड डिजिटल पद्धतीने अवघ्या 10 मिनिटांत मिळवणे शक्य झाले असून, e-PAN पूर्णपणे मोफत डाउनलोड करता येते. भारत सरकारच्या आयकर विभागाने NSDL/Protean आणि UTIITSL पोर्टलवर नवीन पॅन कार्डसाठी संपूर्ण प्रक्रिया कागदपत्रविरहित आणि डिजिटल केली आहे.

नवीन पॅन कार्ड काढण्याची ऑनलाईन पद्धत आणि त्याचा नेमका खर्च खालीलप्रमाणे आहे.

पॅन कार्डच्या अर्जासाठी लागणारा खर्च

तुम्हाला प्लास्टिकचे पॅन कार्ड घरपोच हवे असेल, तर इंटरनेट बँकिंग/कार्डद्वारे 107 रुपये (GST सह) शुल्क भरावे लागते. जर तुम्हाला फक्त ई-मेलवर PDF स्वरूपात पॅन कार्ड हवे असेल, तर त्यासाठी केवळ 72 रुपये फी लागते. आयकर विभागाच्या ‘e-Filing’ पोर्टलवरून आधार कार्डच्या मदतीने मिळणारे इन्स्टंट पॅन कार्ड पूर्णपणे मोफत असते. जर पॅन कार्ड भारताबाहेरील पत्त्यावर मागवायचे असेल, तर 1,011 रुपये शुल्क आकारले जाते.

ऑनलाईन अर्ज करण्याची ‘स्टेप-बाय-स्टेप’ टेक प्रोसेस

  • अधिकृत पोर्टलला भेट द्या: सर्वप्रथम ‘Protean’ (पूर्वीचे NSDL) किंवा ‘UTIITSL’ च्या अधिकृत पॅन कार्ड पोर्टलवर जा.
  • अर्ज प्रकार निवडा: होमपेजवर ‘Apply Online’ निवडून ‘Application Type’ मध्ये ‘New PAN – Indian Citizen (Form 49A)’ हा पर्याय निवडा आणि कॅटेगरीमध्ये ‘Individual’ सिलेक्ट करा.
  • वैयक्तिक माहिती भरा: तुमचे नाव, आडनाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर अचूक भरा. सर्व माहिती सबमिट केल्यावर स्क्रीनवर एक ‘टोकन नंबर’ (Token Number) जनरेट होईल, तो जतन करून ठेवा.
  • डिजिटल ई-केवायसी: पुढे तुम्हाला तीन पर्याय मिळतील. त्यापैकी ‘Submit digitally through e-KYC & e-Sign (Paperless)’ हा पर्याय निवडा. या तंत्रज्ञानामुळे तुमच्या आधार कार्डवरील फोटो आणि पत्ता आपोआप पॅन कार्डसाठी घेतला जातो, ज्यामुळे वेगळे कागदपत्र अपलोड करावे लागत नाहीत.
  • आधार क्रमांक आणि फी भरणे: तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 अंक टाका. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने 107 रुपये (किंवा निवडलेल्या पर्यायानुसार) फी भरा.

आधार OTP प्रमाणीकरण

फी भरल्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो स्क्रीनवर टाकून डिजिटल स्वाक्षरी प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज यशस्वी झाल्यावर पोचपावती डाऊनलोड करा. पुढील 2 आठवड्यांत पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा