Headlines

दीपिंदर गोयल यांचा मोठा खुलासा; ‘टेंपल’ डिव्हाइसची डिलिव्हरी याच वर्षी होणार सुरू। Maharashtra Times


झोमॅटोचे को-फाउंडर दीपिंदर गोयल यांचे बहुप्रतीक्षित ‘टेंपल’ डिव्हाइस याच वर्षी बाजारात येणार असून त्याची डिलिव्हरी लवकरच सुरू होईल. गोयल यांनी या लिमिटेड एडिशन डिव्हाइसचा नवा फोटो शेअर केला आहे. हे डिव्हाइस लोकांचे आयुष्य बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याने ग्राहकांमध्ये याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Deepinder Goyal Temple Device । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
टेक विश्वात मोठी क्रांती घडवण्यासाठी सज्ज असलेले दीपिंदर गोयल यांचे ‘टेंपल’ डिव्हाइस या वर्षी लॉन्च होणार आहे. स्वतः गोयल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या लिमिटेड एडिशन गॅझेटची डिलिव्हरी याच वर्षी सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मानवी जीवन बदलण्याची क्षमता या नव्या उपकरणात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

झोमॅटो आणि एटरनलचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी त्यांच्या हेल्थ-टेक स्टार्टअप ‘टेंपल’ या वियरेबल डिव्हाइसबाबत एक मोठी घोषणा केली आहे. दीपिंदर गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे की, या प्रायोगिक ‘टेंपल’ डिव्हाइसची डिलिव्हरी याच वर्षी (2026 च्या अखेरीस) सुरू केली जाईल आणि लवकरच याचे प्री-ऑर्डर्स देखील स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे.

डिव्हाइसच्या आकारात मोठी कपात?

दीपिंदर गोयल यांनी ‘टेंपल’ या डिव्हाइसच्या नव्या डिझाईनची पहिली झलक शेअर केलीआहे. हे नवे मॉडेल पूर्वी दाखवण्यात आलेल्या व्हर्जनपेक्षा 50 टक्क्यांहून अधिक लहान करण्यात आले आहे. गोयल यांनी दावा केला आहे की, आकाराच्या (Volume) दृष्टीने हे सध्याच्या जागतिक बाजारपेठेतील सर्वात लहान वियरेबल डिव्हाइस आहे, परंतु तांत्रिकदृष्ट्या हे पूर्वीपेक्षा 10 पट अधिक शक्तिशाली आहे. (REF.)

‘टेंपल’ डिव्हाइस नेमके काय करते?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘टेंपल’ हे डोक्याच्या बाजूला (कपाळाजवळ) लावले जाणारे एक छोटे मेटॅलिक क्लिपसारखे गॅझेट आहे. हे डिव्हाइस मानवी मेंदूतील रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनची पातळी रिअल-टाइममध्ये अचूकपणे ट्रॅक करते. हे डिव्हाइस शरीराची चयापचय क्रिया आणि मानसिक ताण मोजण्यासाठी ‘एन्ट्रॉपी’ नावाचा लाईव्ह स्कोर (1 ते 250 दरम्यान) दाखवते. झोप, मानसिक ताण, कॅफिनचे सेवन, व्यायाम आणि ध्यान धारणा या गोष्टींचा मेंदूवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण हे गॅझेट करते. (REF.)

नुकत्याच नवी दिल्लीत पार पडलेल्या BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 दरम्यान भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही देखील हे डिव्हाइस परिधान करून सराव करताना दिसली होती, ज्यामुळे या गॅझेटबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.

2026 च्या अखेरीस डिलिव्हरी; लिमिटेड एडिशन

गोयल यांनी स्पष्ट केले आहे की, हे डिव्हाइस व्यावसायिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर लॉन्च करण्यापूर्वी एक ‘लिमिटेड लाँच एडिशन’ म्हणून सादर केले जाईल. यासाठी ग्राहकांना टेंपलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मेलिंग लिस्टमध्ये सामील व्हावे लागेल, ज्याद्वारे प्री-ऑर्डरचे अपडेट्स दिले जातील. या मर्यादित उपकरणांची प्रत्यक्ष शिपिंग डिव्हिलरी 2026 संपण्यापूर्वी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल. (REF.)

“टेंपल डिव्हाइससह जगणे आणि सराव करणे हे लोकांचे आयुष्य बदलून टाकेल,” असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला आहे.

वैज्ञानिक विश्लेषणाबाबत वाद आणि चर्चा

हे डिव्हाइस जरी तंत्रज्ञान प्रेमींमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले असले, तरी वैद्यकीय क्षेत्रात यावरून वाद सुरू आहेत. AIIMS Delhi च्या डॉक्टरांनी आणि आरोग्य तज्ज्ञांनी यापूर्वी यावर आक्षेप घेत म्हटले होते की, अशा प्रायोगिक गॅझेट्सना थेट वैद्यकीय उपकरणाचा दर्जा देता येत नाही आणि त्याच्या वैज्ञानिक दाव्यांची अद्याप कोणतीही क्लिनिकल चाचणी सिद्ध झालेली नाही. यावर उत्तर देताना दीपिंदर गोयल यांनी स्पष्ट केले होते की, हे प्रॉडक्ट सध्या त्यांच्या ‘कंटिन्यू रिसर्च’ या वैयक्तिक संशोधन उपक्रमाचा भाग असून, गॅझेट प्रत्यक्षात विक्रीसाठी उपलब्ध झाल्यावर त्याचे सर्व सायंटिफिक डेटा आणि बेंचमार्किंग लोकांसोबत शेअर केले जाईल.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा