Headlines

Gandhi’s sit-in protest in front of the police station


पॅलेट गन प्रकरणात तक्रार नोंद करण्याची मागणी

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्थानकासमोर धरणे धरले आहे. त्यांच्यासह या धरणे कार्यक्रमात त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी याही समाविष्ट झाल्या. 20 जुलैला दिल्लीत नीट-युजी आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चातील एका व्यक्तीवर पोलिसांनी पॅलेट गनमधून छरे झाडल्याचा राहुल गांधी यांचा आरोप आहे. या प्रकरणी एफआयआर नोंद करुन घेण्यासाठी ते या पोलीस स्थानकात आले होते.

गांधी यांच्यासह पॅलेट गनमधून छरे मारण्यात आलेला युवक आणि त्याचे कुटुंबियही होते. या युवकाचे नाव साहिल लोचाव असे आहे. गांधी यांनी पोलिस स्थानकाच्या डीसीपीशी प्रथम चर्चा केली. नंतर पॅलेट गन उपयोग प्रकरणी एफआयआर नोंद करण्याची मागणी केली. लोचाव याच्या शरीरात 200 छरे मारण्यात आले. त्यातील तीन त्याच्या डोळ्यांना लागले, असा आरोप त्यांनी केला. अखिल भारतीय आयुविर्ज्ञान संस्थेच्या (एम्स) अहवालात ही माहिती आहे, असे गांधी यांचे म्हणणे आहे. एफआयआर नोंद झाल्याशिवाय काहीही झाले तरी आपण येथून हलणार नाही, असे गांधी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांचा जमाव

राहुल गांधी यांचे धरणे सुरु झाल्यानंतर पोलीस स्थानकासमोर काही काँग्रेस कार्यकर्त्यांचा जमाव गोळा झाला. त्यांनी घोषणा देण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे एफआयआर नोंदवून घेता येणार नाही. आम्हाला आमच्या वरीष्ठांची अनुमती घ्यावी लागेल, असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न पोलिस स्थानकात उपस्थित अधिकाऱ्यांनी केला. तथापि, गांधी यांनी धरणे मागे घेण्यास नकार दिला आहे.

पॅलेट गनचा वाद

20 जुलैच्या संसद मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांच्या विरोधात पॅलेट गन्सचा (छऱ्याच्या बंदुका) उपयोग केला काय, हा वादाचा मुद्दा बनला आहे. पोलिसांनी अशा कोणत्याही गनचा उपयोग केल्याचा आरोप पूर्णत: फेटाळला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहचले असून सर्वोच्च न्यायालयाने हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी 5 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. समितीची स्थापना होण्याआधी दिल्ली पोलिसांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यात पोलिसांनी कोणत्याही प्रकारच्या बंदुकांच्या उपयोग करण्यात आल्याचा इन्कार केलेला आहे.

छरे नेमके कोणी मारले ?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार 20 जुलैच्या मोर्चेकऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून केवळ लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा उपयोग करण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या गन्स किंवा बंदुका यांचा उपयोग केला गेला नाही. या संपूर्ण मोर्चाचे व्हिडीओ चित्रण करण्यात आले आहे. तथापि, पॅलेट गनचा उपयोग होत असतानाचा व्हिडीओ अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे नेमके छरे मारले कोणी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली उच्चस्तरीय समितीच या संदर्भात नेमके काय घडले, यावर प्रकाश टाकण्याची शक्यता आहे. या समितीचा अहवाल काही दिवसांमध्ये सादर केला जाणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत