Headlines

धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?


शिवसेना पक्ष आणि चिन्ह, तसेच आमदार अपात्रता प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde And Kapil Sibal
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर दिलेल्या निकालाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. यावेळी कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवावं, अशी मागणी केली. मूळ शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचा आहे. एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्हाचा फायदा घेतला, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

“सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे. त्यामुळे त्यावर टिप्पणी करणे योग्य नाही, असं मला वाटतं. पण तुम्हाला आठवत असेल तर याआधीदेखील म्हणजेच दोन वर्षांपूर्वी सुनावणी झाली त्यावेळीदेखील हेच मुद्दे वकील कपिल सिब्बल बोलत होते. आता त्याचेच रिपिटेशन होत आहे”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

“हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी त्यावर टिप्पणी करु इच्छित नाही. पण लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. जे सरकार 2022 मध्ये बनलं त्याला महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलं. महाराष्ट्राच्या जनेतेने या सरकारला आशीर्वाद देखील दिला. पुन्हा सरकारदेखील आलं. फार मोठ्या बहुमताने परत सरकार आले. त्यामुळे लोकांना समजलं पाहिजे. जनतेच्या कोर्टात इतक्या मोठ्या बहुमताने निवडून येणं हे पहिल्यांदा होत आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

Maharashtra TimesMLA Disqualification : आम्ही शिंदेंना आज अपात्र घोषित करु शकतो का? सुप्रीम कोर्टाचा वकील देवदत्त कामत यांना सवाल

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला

दरम्यान, सुप्रीम कोर्टात आज कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद अखेर संपला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर नियमित सुनावणी सुरु होती. कपिल सिब्बल यांच्याकडून या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरु होता. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात जोरदार युक्तिवाद केला.

कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केला?

विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे वेगवेगळे आहेत. शिवसेना पक्षाच्या 2018 च्या घटनेनुसार, पक्षप्रमुखांना सर्वाधिकार आहेत. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष चालवला जात होता. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांना नेते, मंत्रिपद दिले. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदेंना निवडणुकीत उमेदवारी दिली. उद्धव ठाकरे यांनीच निवडणुकीत उमेदवार ठरवले. त्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार बंडखोरी करणारे आमदार पक्षावर दावा करु शकत नाहीत. तसेच विधीमंडळातील आमदार म्हणजे राजकीय पक्ष नव्हे, असा महत्त्वाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता पदी निवड ही देखील बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. 2018 च्या पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नाही. तसेच एकनाथ शिंदे यांनी बेकायदेशीरपणे बंडखोरी करुन सरकार स्थापन केलं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. यावेळी त्यांनी सुभाष देसाई केसचा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी दहाव्या परिष्ठाचादेखील उल्लेख केला.

Maharashtra TimesShiv Sena Hearing : धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवा, कपिल सिब्बल यांची मागणी, सुनावणीत ट्विस्ट

आम्ही शिंदेंना अपात्र करु शकतो का? न्यायमूर्ती बागची यांचा सवाल

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर उद्धव ठाकरेंचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. यावेळी न्यायमूर्ती बागची यांनी आम्ही आज एकनाथ शिंदे यांना अपात्र करु शकतो का? असा प्रश्न कामत यांना विचारला. तसेच आम्ही परत प्राधिकरणाकडे निर्णय घेण्यासाठी पाठवू शकतो, असंदेखील न्यायमूर्ती बागची म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत होतं ते ठिक आहे. पण त्यांनी बहुमत मिळवलं तेव्हा ते पक्षाचे सदस्य होते का? असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी विचारला. त्यावर देवदत्त कामत यांनी शिंदेंच्या गटाने बंडखोरी करुन पक्षावर दावा सांगण्याची चूक केली, असं उत्तर दिलं.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा