Headlines

'माझ्या मुलाचे नाव आल्यास, मी स्वतः पोलिस ठाण्यात आणेल':विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंचे खुले आव्हान




बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात 20 जून रोजी झालेल्या विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोपांवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. जर या गुन्ह्यात आपल्या मुलाचा सहभाग असेल किंवा आरोपींच्या सीडीआर रिपोर्टमध्ये त्याचे कुठेही नाव आढळल्यास, आपण स्वतः त्याला पोलिस ठाण्यात आणून हजर करू, असे खुले आव्हान त्यांनी दिले. तसेच, काही जणांचे सरकार असताना आरोपी पळून जात होते, मात्र आम्ही कोणताही गुन्हा केला नसल्यामुळे समाजात उजळ माथ्याने फिरत आहोत, असेही सोनवणे यांनी स्पष्ट केले. याच प्रकरणाच्या तपासावरून खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या निर्णयावर शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि सखोल चौकशीची गरज लक्षात घेता, विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास थेट सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी आग्रही मागणी सोनवणे यांनी केली आहे. बीडच्या पोलिसांवर विश्वास नाही का? विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासावरून खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या निर्णयावर थेट शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणी सकाळी अर्ज दिल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सीआयडी तपासाचे आदेश निघाल्याने, आपले महाराष्ट्र शासन खरोखरच इतके जलद निर्णय घेते का, असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. बीड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत एका आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली असतानाही, पोलिस महासंचालकांनी तातडीने सीआयडीकडे तपास सोपवल्याने त्यांचा बीड जिल्ह्याच्या पोलिस यंत्रणेवर भरवसा राहिला नाही का, असा थेट प्रश्नही खासदार सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. माझा मुलगा काही पळून गेला नाही बजरंग सोनवणे म्हणाले, विलास घुले प्रकरणाचा तपास सीबीआय कडे द्यावा. जेवढे आरोपी अटक झालेत तेवढ्या आरोपींच्या सीडीआरमध्ये माझ्या मुलाचे कुठे नाव आले तर मी त्याला स्वतः पोलिस स्टेशनला नेऊन सोडतो. माझा मुलगा काही पळून गेला नाही. तो लपत नाही. एसपी साहेबांनी सांगितल्यानंतरही जवाब का घेतला जातो? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, काही आरोपी सरकार असताना, सत्ता असताना पळत होते. आम्ही कुठेही गुन्हेगार नाहीत म्हणून उजळ माथ्याने फिरतोय. काही जणांचे म्हणणे आहे की आरोपी नसला तरी माझ्या मुलाचे नाव या प्रकरणात घेण्यात यावे. अटक करा आणि पुन्हा नंतर त्याला सोडून द्या, असे काहीच म्हणणे असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. पण या प्रकरणात काहीही संबंध नसताना नाव कसे घेणार? हे जमणार नाही.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत