स्वातंत्र्यदिन सोहळा पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
स्वातंत्र्यदिनी दिल्लीत अनेक महत्वाच्या स्थानांवर बाँबस्फोट घडविण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन आज शनिवारी साजरा होत आहे. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी ई-मेलवरुन या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बाँबस्फोट घडविण्याची धमकी देण्यात आलेल्या स्थानांमध्ये दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्री विमानतळ, लाल किल्ला, सर्वोच्च न्यायालय आदींचा समावेश आहे. शनिवारी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्टाला उद्देशून त्यांचे सलग तेरावे भाषण करणार आहेत. स्वातंत्र्यदिनी सलग 13 व्यांदा राष्ट्राला उद्देशून भाषण करणारे ते जवाहरलाल नेहरु यांच्यानंतरचे ते दुसरे नेते ठरणार आहेत. पण लाल किल्लाही उडविण्यात येईल, अशी धमकी देण्यात आल्याने, सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. जाम नगर हाऊस, झंडेवाला बिल्डींग, एमबी साकेत कार्यालय, डीएम कार्यालय, एसडीएम कार्यालय आणि दिल्ली छावणी भागातील काही महत्वाची स्थाने यांच्यातही स्फोट घडविले जातील, अशी धमकी देणारे संदेश पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
उच्च न्यायालयाला ई-मेल
धमकीचे हे संदेश ई-मेलच्या माध्यमातून प्रथम दिल्ली उच्च न्यायालयात पाठविण्यात आले. उच्च न्यायालयाने या संदेशांची माहिती त्वरित दिल्ली पोलिसांनच कळविली. हे ई-मेल कोणी पाठविले याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, कोणताही धोका न पत्करता दिल्ली पोलीसांनी धमकी देण्यात आलेल्या स्थानांप्रमाणेच इतर महत्वाच्या स्थानांवरही सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली आहे.
‘खलिस्तान’च्या नावाने ई-मेल
हे ई-मेल ‘खलिस्तान’ या नावाने पाठविण्यात आले आहेत. हे बाँबस्फोट करुन 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलींचा सूड घेण्यात येईल, अशा अर्थाचा आशय या ई-मेल धमक्यांमध्ये असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी या धमक्या गांभीर्याने घेतल्या असून कोठेही कोणताही अनुचित प्रसंग घडू नये, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यास प्रारंभ केला. प्रत्येक महत्वाच्या स्थानी पोलिसांना मोठ्या संख्येने नियुक्त करण्यात येत आहे. लाल किल्ल्याला विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. दिल्लीचे रेल्वे स्थानक, आंतरराष्ट्रीय विमानतळ इंडिया गेट, कॅनॉट प्लेस इत्यादी स्थानीही मोठ्या संख्येने सशस्त्र पोलीस नियुक्त आहेत.
आजूबाजूच्या शहरांमध्येही बंदोबस्त
केवळ दिल्ली राजधानी शहर नव्हे, तर या शहराच्या आसपासच्या शहरांमध्येही सुरक्षा व्यवस्था आणि देखरेख वाढविण्यात आली आहे. दिल्लीला लागून असणाऱ्या गुरुग्राम, नोयडा आदी शहरांमध्ये गस्त घालण्यात येत आहे. गुरुग्राममध्ये 4 हजार 500 पोलिसांनी नियुक्ती करण्यात आली असून 11 मुख्य चेकपॉईंटस् निर्माण करण्यात आले आहेत. गुरुग्राम जिल्ह्यातून दिल्लीत जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत आहे. अतिमहनीय व्यक्तींच्या जाण्यायेण्याचे मार्ग, दिल्लीत प्रवेश करण्याचे नाके, वाहनांच्या पार्किंगचे भाग आणि अतिसंवेदनशील स्थाने येथे गस्त घातली जात आहे. अर्धसैनिक दलांनाही सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही सुरक्षा व्यवस्था शनिवारचा स्वातंत्र्यदिन सोहळा पूर्ण होईपर्यंत राखली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्लीप्रमाणेच देशातील इतर महानगरे, दाट लोकवस्तीची नगरे, सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्या, महत्वाची संरक्षण आणि औद्योगिक आस्थापने, महत्वाची सरकारी कार्यालये यांच्यातही सुरक्षा वाढविली जाणार आहे.
दिल्ली पोलिसांची विशेष सज्जता
ड स्वातंत्र्यदिन सोहळा विनाविघ्न पार पडावा, म्हणून दिल्ली पोलिस सज्ज
ड दिल्लीसह अवतीभोवतीच्या शहरांमध्ये कडेकोट पोलीस व्यवस्था नियुक्त
ड अर्धसैनिकी दलांनाही सज्जतेची सूचना, महत्वाच्या स्थानांवर पोलिस गस्त
ड लाल किल्ल्याला विशेष सुरक्षा, सशस्त्र पोलिसांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती
