त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 2026 सालासाठीचे राष्ट्रपतींचे प्रशंसनीय सेवा पदक जाहीर झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच गुन्हे रोखणे व घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच सायबर गुन्ह्यांच्या तपासात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रपती पदक जाहीर केले जाते. 2005 मध्ये पोलीस दलात दाखल झाल्यानंतर महालिंगपूर, इलकल, माळमारुती पोलीस स्थानकात उपनिरीक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. 2016 मध्ये निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर सीसीबी, सीईएन व सध्या माळमारुती पोलीस स्थानकात कार्यरत आहेत.
बेळगाव, बागलकोट, गदग, विजापूर जिल्ह्यात घडलेल्या घरफोड्यांचा छडा लावून दहा गुन्हेगारांना अटक करून 24 घरफोडी प्रकरणातील 1 किलो 625 ग्रॅम सोने, 3 किलो चांदी जप्त केल्यामुळे 2013 मध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांचे सुवर्णपदकही मिळाले आहे. 2014 मध्ये चेनस्नॅचिंग प्रकरणातील दोघा जणांना अटक करून 21 प्रकरणांचा त्यांनी छडा लावला आहे. या प्रकरणी 498 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी जप्त केले आहेत.
बेळगावकरांना हैराण करणाऱ्या चेनस्नॅचिंग प्रकरणातील इराणी टोळीतील गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याजवळून 1 किलो 49 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी जप्त केले आहेत. यापैकी पाच प्रकरणात सहा जणांना शिक्षाही झाली आहे. मंगळूर अंडरवर्ल्डमधील दिनेश शेट्टी याला कारागृहातून पळवून नेण्यासाठी आलेल्या सहा जणांना अटक करून त्यांच्याजवळून पाच पिस्तूल, 29 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
मुंबई अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुन्हेगार रशिद मलबारीच्या टोळीतील नऊ जणांना अटक करून एक अपहरण व तीन खून प्रकरणांचा त्यांनी छडा लावला आहे. सायबर क्राईम विभागात सेवा बजावताना झारखंडमधील जामतारा येथून तिघा जणांना अटक केली आहे. अशा अनेक प्रकरणांचा छडा लावण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बी. आर. ग•sकर यांच्या सेवेची दखल घेत त्यांना राष्ट्रपतींचे प्रशंसनीय सेवा पदक जाहीर झाले आहे.
