![]()
छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय हस्तकला आणि हातमाग वस्त्रांचे प्रदर्शन करणारा ‘स्वदेशी एक्स्पो’ सुरू झाला आहे. १४ ते १६ ऑगस्ट या तीन दिवसीय प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या एक्स्पोमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि कारागिरांच्या कौशल्याचा समृद्ध वारसा एकाच छताखाली अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्यम मंत्रालयाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी चिकलठाणा येथील सागर रिसॉर्टमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते या स्वदेशी एक्स्पोचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची माहिती घेतली. या प्रदर्शनात देशाच्या विविध भागांतून आलेल्या कारागिरांनी आणि विणकरांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन ग्राहकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांच्या पारंपरिक कलांना व वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. हातमागावर विणलेल्या वस्त्रांमागील कारागिरांचे कौशल्य, पारंपरिक तंत्रज्ञान आणि स्थानिक संस्कृतीची झलक येथे अनुभवता येते. महिला उद्योजक, स्वयंसहाय्यता गट, ग्रामीण कारागीर आणि पारंपरिक कलाकारांनी तयार केलेल्या उत्पादनांनाही एक्स्पोमध्ये स्थान मिळाले आहे. पारंपरिक हातमागावरील साड्या, ड्रेस मटेरियल, शाली, दुपट्टे, कापडांच्या विविध प्रकारांसह कलात्मक हस्तकला वस्तू येथे पाहता व खरेदी करता येत आहेत. ग्राहकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याबरोबरच स्थानिक व पारंपरिक कारागिरांना थेट बाजारपेठ उपलब्ध होत आहे. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना वेगळ्या पद्धतीचे गिफ्ट देण्याची आवड असलेल्यांसाठी हा एक्स्पो एक पर्वणी ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना १४, १५ व १६ ऑगस्ट या काळात सहकुटुंब या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘स्वदेशी’चा संदेश देणारा हा एक्स्पो भारतीय हस्तकला व हातमाग उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देतो. तसेच, कारागिरांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन देऊन नागरिकांमध्ये स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढवणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. विविध राज्यांतील पारंपरिक कला, वस्त्रे आणि हस्तकला यामुळे नागरिकांना भारताच्या विविधतेतील सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव मिळत आहे. या प्रदर्शनामध्ये ७५ हून अधिक दालने आहेत. ओडिशाची ‘पट्टाचित्र’ कला, राजस्थानची विलोभनीय ‘पिचवाई’ कलाकृती, झारखंडची पारंपरिक ‘सोहराई’ कला, बिहारच्या मधुबनीची ‘मधुबनी’ कला, पाटण्याची टिकुली पेंटिंग, उत्तराखंड-हिमालयाची पारंपरिक ‘ऐपण’ कला आणि महाराष्ट्राची शान असलेली अस्सल ‘पैठणी’ यांसारख्या कलाकृतींनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
Source link
छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वदेशी एक्स्पो सुरू, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:भारतीय हस्तकला आणि हातमाग वस्त्रांची अप्रतिम कलाकुसर उपलब्ध
