मुंबई : सोन्याच्या दराने दीड लाख रुपयांचा टप्पा पार करत विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता पुन्हा मोठी घसरण सुरू झाली आहे. अमेरिकेतील महागाईचे आकडे अपेक्षेप्रमाणे राहिल्यानंतर सोन्याच्या दरात जोरदार तेजी आली होती. मात्र, दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केल्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरावर दबाव आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोने 4,400 डॉलर प्रति औंसच्या वर गेले होते. मात्र, आठवड्याच्या अखेरच्या व्यवहारात सोन्याच्या दरात जवळपास 40 डॉलरची घसरण झाली. शुक्रवारी सकाळी सोने सुमारे 4,382 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होते. चांदीच्या दरातही नरमाई दिसून आली.
नफा वसुलीमुळे सोन्याला मोठा धक्का
अमेरिकेतील महागाईचे आकडे जाहीर होण्यापूर्वी सोन्याच्या दराबाबत बाजारात मोठी अनिश्चितता होती. मात्र, महागाई अपेक्षेप्रमाणे राहिल्यानंतर ही अनिश्चितता दूर झाली आणि सोन्याच्या दरात जोरदार वाढ झाली. त्यानंतर दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या सोन्यात गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केली.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्या सोन्याच्या दरातील घसरण ही प्रामुख्याने प्रॉफिट बुकिंगमुळे झाली आहे. त्यामुळे तेजीच्या काळात खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांनी नफा सुरक्षित करण्यासाठी विक्री केल्याने सोन्याच्या दरावर दबाव निर्माण झाला.
4,500 डॉलरच्या पातळीवर गुंतवणूकदारांची नजर
StoneX चे वरिष्ठ बाजार विश्लेषक बॉब हॅबरकॉर्न यांच्या मते, 4,500 डॉलर प्रति औंस ही सोन्यासाठी महत्त्वाची पातळी आहे. सोन्याने ही पातळी दोनदा गाठल्यानंतर पुन्हा माघार घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये या पातळीबाबत सावधगिरी वाढली आहे.
तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील परिस्थितीही सोन्याच्या दरासाठी महत्त्वाची आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठोस प्रयत्न होत नाहीत तोपर्यंत सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.
फेडच्या व्याजदराच्या निर्णयाकडे लक्ष
अमेरिकेतील महागाई नरमल्यानंतर फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता कमी झाली आहे. CME FedWatch Tool नुसार, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या फेडच्या बैठकीत व्याजदर वाढण्याची शक्यता सध्या 35 टक्के मानली जात आहे. यापूर्वी ही शक्यता 44 टक्क्यांपर्यंत होती.
व्याजदर वाढण्याची शक्यता कमी झाल्यास सोन्याला पुन्हा आधार मिळू शकतो. मात्र, सध्या सोन्याचा व्यवहार एका मर्यादित पातळीत होण्याची शक्यता आहे. साधारणपणे अमेरिकेत व्याजदर वाढल्यास सोन्यावर दबाव येतो, कारण उच्च व्याजदरामुळे गुंतवणूकदारांचा कल व्याज देणाऱ्या मालमत्तांकडे वाढतो.
MCX वर सोने आणि चांदीमध्ये घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम देशांतर्गत वायदा बाजारावरही झाला आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे 10.30 वाजता MCX वर 5 ऑक्टोबर डिलिव्हरीचे सोने 960 रुपयांनी घसरून 1,52,506 रुपये प्रति 10 ग्रॅम पातळीवर व्यवहार करत होते.
चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. 4 सप्टेंबर डिलिव्हरीची चांदी 2,446 रुपयांनी घसरून 2,33,001 रुपये प्रति किलो पातळीवर व्यवहार करत होती.
गेल्या महिन्यात सोन्यात 10 हजारांची वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात सोन्याच्या दरात जवळपास 10,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)ने गुरुवारी संध्याकाळी जाहीर केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव किरकोळ वाढीसह 1,53,071 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 22 कॅरेट सोन्याचा दर 1,40,213 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 1,14,803 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. दरम्यान, चांदीचा भाव घसरून 2,34,228 रुपये प्रति किलो झाला.
गुंतवणूकदारांनी काय लक्षात घ्यावे?
सोन्याच्या दरात अलीकडे मोठी तेजी झाल्यानंतर आता नफा वसुलीमुळे घसरण होत आहे. अमेरिकेचे व्याजदर, महागाईचे आकडे, डॉलरची स्थिती आणि मध्यपूर्वेतील भू-राजकीय घडामोडी यांचा आगामी काळात सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होऊ शकतो.
(डिस्क्लेमर : सोने-चांदीतील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
