Headlines

'तुमच्याकडे तलवार असून तुम्ही त्याने डास मारता..':मुंबई उच्च न्यायालयाने FDA ला सुनावले, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर




‘तुमच्याकडे अधिकाररूपी तलवार आहे, पण तुम्ही त्याचा वापर केवळ डास मारण्यासाठी करता. हीच खरी समस्या आहे,’ अशा अत्यंत कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाची कानउघाडणी केली आहे. कॅडिला फार्मास्युटिकल्स या नामांकित औषध कंपनीवर एफडीएने केलेल्या अचानक जप्ती आणि विक्री बंदीच्या कारवाईवरून उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, एफडीए केवळ आपल्या अधिकारांचे प्रदर्शन करत असल्याचे खडेबोल सुनावले आहेत. या प्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आणि फटकारण्यानंतर, एफडीएने कॅडिला फार्मास्युटिकल्स कंपनीवरील औषध विक्री व वितरणाची घातलेली बंदी मागे घेण्याची ग्वाही उच्च न्यायालयात दिली आहे. यामुळे कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी पार पडली. यावेळी एफडीएच्या कारवाईवर ताशेरे ओढताना खंडपीठाने अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी करत सुनावले की, ‘आधी गोळी झाडायची आणि नंतर प्रश्न विचारायचे, हा ‘वाईल्ड वेस्ट’चा नियम असू शकतो. कायद्याच्या क्षेत्रात किंवा प्रशासनात हा नियम लागू होत नाही. हॉटेल्सवरील धाडीच्या बाबतीतही तुम्ही आधी कारवाई करता आणि नंतर प्रश्न विचारता. निदान सर्व कीटक मारण्याचे काम तरी आधी करा.’ तसेच, प्राधिकरणाने आपल्या अधिकारांचा वापर करताना नेहमी विवेकबुद्धी आणि योग्य कायदेशीर पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचे एफडीएचे समर्थन एफडीएने कॅडिला फार्मास्युटिकल्सच्या काही औषधांचा साठा अचानक जप्त करून त्यांच्या विक्री व वितरणावर थेट बंदी घातली होती, ज्याविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. या कारवाईचे समर्थन करताना एफडीएने दावा केला की, कंपनीच्या काही औषधांचे ब्रँडिंग समान असले, तरी त्यातील औषधी घटक (Active Pharmaceutical Ingredient – API) वेगवेगळे आहेत. यामुळे औषध देताना किंवा प्रत्यक्ष वापरताना मोठा गोंधळ होऊन रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची दाट शक्यता होती. 32 दिवस औषधे उपलब्ध न झाल्याने न्यायालयाची चिंता दुसरीकडे, एफडीएच्या या दाव्यावर कंपनीने आपली बाजू भक्कमपणे मांडली. कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता थेट औषधांचा साठा जप्त केल्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणावर चिंता व्यक्त केली. तसेच, एफडीएच्या या अचानक केलेल्या कारवाईमुळे बाजारात तब्बल 32 दिवस रुग्णांना संबंधित औषधे उपलब्ध न झाल्याबद्दल न्यायालयाने प्रशासनावर तीव्र ताशेरे ओढले. कारणे दाखवा नोटीस उच्च न्यायालयाच्या कठोर पवित्र्यानंतर अखेर एफडीएने नमती भूमिका घेत न्यायालयात आपले स्पष्टीकरण दिले आहे. यानुसार, कॅडिला कंपनीच्या औषध विक्रीवर घालण्यात आलेली बंदी तातडीने मागे घेतली जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली. तसेच, थेट कारवाई करण्याऐवजी आता नियमानुसार कंपनीला आधी ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात येईल. यावर कंपनीला त्यांचे सविस्तर लेखी उत्तर मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल आणि या प्रक्रियेनंतरच कायद्याच्या चौकटीत राहून पुढील योग्य तो आदेश काढला जाईल, असे एफडीएने स्पष्ट केले. अधिकाऱ्यांना कायद्याच्या गांभीर्याचा विसर; न्यायालयाची टिप्पणी या कारवाईच्या निमित्ताने वारंवार अशा प्रकारच्या याचिका न्यायालयात दाखल होण्यावरही खंडपीठाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यावर भाष्य करताना न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दांत टिप्पणी केली की, “आम्ही ही याचिका नक्कीच मंजूर करू शकतो; मात्र या संपूर्ण प्रकरणावरून एफडीए आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशांचे तसेच कायद्याच्या गांभीर्याचे अजिबात भान नसल्याचेच प्रकर्षाने दिसून येते.”



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत