Headlines

नागपुरात 90 कोटी 25 लाखांचा सायबर घोटाळा उघड:आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, 6 जणांना अटक




नागपूर शहर सायबर पोलिसांनी ९० कोटी २५ लाख रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये खाती उघडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या टोळीतील महिलांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना दिघोरी नाका परिसरातील पवनपुत्र नगर आणि हुडकेश्वर येथील गजानन नगरमध्ये एका घरातून हे सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सायबर पोलिसांच्या पथकाने ५ ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान धाड टाकली. या छाप्यात मोठ्या प्रमाणावर संशयास्पद कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये २३६ एटीएम कार्ड, ८२ पासबुक, ८५ चेकबुक, १८० कोरे चेक, ४५ सिमकार्ड, १३ रबर स्टॅम्प, १४ आधार कार्ड, ५ पॅन कार्ड, ४ मतदान कार्ड आणि ३ आरसी कार्ड यांचा समावेश आहे. तसेच, १ स्वाइप मशीन, ७ बँक स्कॅनर, केवायसी कागदपत्रे आणि गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. या प्रकरणी उज्ज्वला ताराचंद राजगिरे (वय ३२), इरफान वल्द इकबाल शेख (वय ३२), मृणाली दिगांबर कांबळे (वय २६), निधीता अमित रामटेके (वय २२), आयुष चंद्रकांत रामटेके (वय २०) आणि आदित्य राहुल दुपारे (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान, या टोळीने उघडलेल्या बँक खात्यांवर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये एकूण १०४ गुन्हे व तक्रारी नोंदवल्या गेल्याचे समोर आले आहे. या खात्यांवर फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता असून, या संपूर्ण रॅकेटमागे आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत