Headlines

Gold-Silver Rate Today 5 August 2026; सराफा बाजारात उलथापालथ; सोन्याला पुन्हा नवी झळाळी, चांदीही लखाखली; सलग तिसऱ्या दिवशी दरात वाढ


Gold Silver News: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव तुलनेने स्थिर राहिले आहेत. मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार पुढील काही महिने फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णय आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावावर बारकाईने लक्ष ठेवून असतील, ज्यामुळे सोन्याच्या भविष्यातील हालचाली निश्चित होऊ शकतात.

सोने-चांदीचा आजचा दर काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत 6% पर्यंत घसरण झाली आणि सोने-चांदीच्या बाजारात खरेदीदारांची गर्दी जमली.

भारतातील फ्युचर्स मार्केट MCX वर सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी दरवाढी कल पाहायला मिळत आहे, तर चांदीने देखील आलेख उंचावला आहे. बुधवार, 5 ऑगस्ट रोजी, MCX वर सोन्याच्या फ्युचर्स किमती 0.61 टक्क्यांनी वाढून 1.45 लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत, तर चांदीचा वायदा 1.01 टक्के वाढीसह 2.23 लाखांवर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची चमक कायम राहिली आणि भाव 4,129.40 डॉलर प्रति औंसवर पोहोचला, ज्यामुळे देशांतर्गत बाजाराला चालना मिळाली. या दरम्यान, चांदीचा भाव 200 रुपयांनी घसरून 2,35,000 रुपये किलो झाला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचा डोळा

जागतिक बाजारातील अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या दरांमधील चढ-उत्तरांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक आज धोरणात्मक दरांची घोषणा करेल. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या नेतृत्वाखाली MPC समिती पुन्हा एकदा रेपो दर स्थिर ठेवण्याची दाट शक्यता आहे.

मध्य-पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढण्याच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावांमुळे युरोप, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिका यांसह अनेक देशांमधील मध्यवर्ती बँकांनी आधीच व्याज दरवाढीचा पर्याय अवलंबला आहे. पण, अमेरिकी फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ जपानने दर स्थिर ठेवले आहेत.

दुसरीकडे, सौदी अरेबियासह मध्य-पूर्वेतील प्रमुख मित्र राष्ट्रांनी नियोजित हल्ले स्थगित करून त्याऐवजी राजनैतिक करार करण्याचा आग्रह केल्याचे ट्रम्प ऑन-कॅमेरा म्हणाले. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित पुन्हा उघडण्याच्या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.

गुंतवणूकदारांसाठी लक्ष ठेवायचे फॅक्टर्स

याशिवाय आता बाजारात गुंतवणूकदार अमेरिकेच्या कामगार बाजाराच्या आकडेवारीने भरलेल्या आठवड्याकडे लक्ष ठेवून असतील, ज्यामध्ये शुक्रवारी बहुप्रतिक्षित मासिक रोजगार अहवाल जारी होईल. त्याआधी गेल्या आठवड्यात फेडरल रिझर्व्हने व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले असले तरीही 3 अधिकाऱ्यांनी निर्णयाला विरोध केला आणि जास्त काळ कारवाईस विलंब केल्यास अखेरीस अधिक आक्रमक धोरण कडक करण्याची गरज भासू शकते, असा इशारा दिला.