Headlines

Eknath Shinde Sudden Visit to Dare Village During hearing on shiv sena party and symbol case


शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या खटल्याची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. त्यांच्याकडून उद्यादेखील युक्तिवाद केला जाणार आहे. एकीकडे कोर्टात सुनावणी सुरु आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे अचानक दरेगावात गेले आहेत.

Eknath Shinde
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाच्या खटल्याची महत्त्वाची सुनावणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. उद्या उर्वरित सुनावणी होणार असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील आपल्या दरे गावी दाखल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. दोन दिवस ते गावी मुक्कामी आहेत. त्यांच्या या अचानक दौऱ्यामागील नेमकं कारण समजू शकलेले नाही. सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांनी तांत्रिक मुद्दे अतिशय मुद्देसूद मांडले. तसेच घडलेल्या घडामोडी सांगितल्या. सिब्बल यांच्याकडून उद्यादेखील युक्तिवाद केला जाणार आहे. असं असताना एकनाथ शिंदे दरेगावी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकनाथ शिंदे दरेगाव दौऱ्यावर का आले असावेत?

राजकीय वर्तुळातील मिळत असलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटनेची ताकद वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवस ते दरे गावी मुक्कामी आहेत. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांशी चर्चा करतील, असे समजते.

ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाच्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आली आहे. आजच्या सुनावणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे विधान केले आहे. पक्षचिन्ह राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं, एवढाच प्रश्न असल्याचं न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे गटात उत्साह संचारला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी शिंदे प्रयत्नशील

सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा खटला सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरे गाव गाठल्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांचा दौरा पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक ताकद वाढीसाठी असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिंदे यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

शिवसेना खटल्याच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष

दरम्यान, शिवसेना फुटीला आता चार वर्षे झाले आहेत. या विषयी अनेक घडामोडी घडल्या आहेत. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. असं असलं तरी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होत आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष हे वेगळे असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. यासाठी त्यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल काय येईल? याबाबत सस्पेन्स वाढला आहे.