Headlines

Kelghar Ghat Close From July 28 After Landslide in Satara


महाबळेश्वरला पावसाळी सहल साजरी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या महाबळेश्वर आणि पाचगणीत मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच केळघर घाटात वारंवार दरड कोसळत असल्याने केळघर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Satara News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : महाबळेश्वर पाचगणी परिसरात वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घाट मार्गावर दरडी कोसळत आहेत. सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात काळा कडा या ठिकाणी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सोमवारी पर्यटक दोन्ही बाजूला अडकून पडले होते. यानंतर आता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केळघर घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

साताऱ्याकडून महाबळेश्वर-पाचगणीला जाताना वाटेत केळघर घाट लागतो. अनेक दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे केळघर घाटातील काळा कडा याठिकाणी भली मोठी दरड रस्त्यावर कोसळली आहे. दरड हटविताना जेसीबी देखील अडकला आहे. त्यामुळे सातारा-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरड हटविण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

पावसाळ्यात राज्यभरातील पर्यटक महाबळेश्वर आणि पाचगणीतील वर्षा पर्यटनासाठी येत असतात. झिम्माड पाऊस आणि दाट धुके हे पर्यटकांचे खास आकर्षण असते. असेच वातावरण सध्या महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात पाहायला मिळत आहे. महाबळेश्वर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे केळघर घाटातील काळा कडा या ठिकाणी सोमवारी मोठी दरड कोसळली आहे. प्रचंड प्रमाणात मलबा रस्त्यावर आल्याने सातारा-मेढामार्गे महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

दरड हटवण्यासाठी आलेला जेसीबीच त्यात अडकून पडल्याने आणखी सामग्री मागविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सातारा-महाबळेश्वर मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाट पूर्ववत होण्यासाठी आणखी बराच काळ लागणार असल्याने वाहतूक बंद राहणार आहे. या दुर्घटनेत सुदैवाने जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.

प्रशासनाकडून आदेश जारी

दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. “महाबळेश्वर-मेढा-सातारा-धामणेर रस्ता, राज्य मार्ग क्र. १४० कि.मी. ११/०० ते १२/५०० (केळघर घाट. काळा कडा) या लांबीमध्ये अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरून वारंवार दरड कोसळत आहे. मोठ्या प्रमाणात दगड आणि माती रस्त्यावर येत आहे. कार्यकारी अभियंता, सा.बां. (प) विभाग सातारा, उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी २८ जुलै रोजी केळघर घाटलांबीची प्रत्यक्ष स्थळपाहणी केली असता केळघर घाटामध्ये वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे”, असं आदेशात म्हटलं आहे.

“सबब प्रवासी आणि वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सदर रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी २८ जुलैपासून पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. केळघर घाटातील रस्ता सुरू करण्यापूर्वी आपणास अवगत करण्यात येईल”, असं प्रशासनाकडून आदेशात म्हटलं आहे.

शासनाच्या ‘या’ दोन पर्यायी मार्गाने प्रवास करण्याच्या सूचना

  1. मेढा- मालदेव मंदिर मार्ली भिलार-महाबळेश्वर
  2. मेढा-कुसुंबी-सह्याद्रीनगर-माचुतर-महाबळेश्वर