Headlines

Congress Maharashtra President Harshwardhan Sapkal Slams DCM Sunetra Pawar


काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल वापरलेल्या शब्दांवरुन महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने केलेल्या टीकेचं समर्थन करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणत निशाणा साधला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत.

congress
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : काँग्रेस पक्षाकडून ट्विट करण्यात आलेल्या व्हिडीओत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असे संबोधित करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने वापरलेले गुंगी गुडिया हे शब्द योग्य असल्याचे म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण देत असताना सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. यामुळे राजकारण तापलं आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयात जावून आंदोलन केलं. पण सपकाळ नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

“राजकारण तापण्याचं कारण काय आहे? पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले पाहिजे. पत्रकारांनी विचारलेच पाहिजे, पण नागरिक जे विचारत आहेत त्याचे उत्तर दिले पाहिजे. आपल्यावर सार्वजनिक जीवनात आरोप होत असतील त्याचे देखील उत्तर दिले गेले पाहिजे”, असं हर्षवर्धन सपकाळ सुरुवातीला म्हणाले.

“मात्र आपण बघितलं की, ज्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने जे ट्विट केलं, त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारत आहेत, आणि एक नेता ज्याच्यावर गुंडगिरीचे आरोप आहेत, लोकप्रतिनिधी ऐवजी गुंड म्हणून ज्याचं व्यक्तीमत्व महाराष्ट्रापुढे आलेलं आहे, अशा प्रवृत्तीची ओळख असणारा व्यक्ती आहे, तो पत्रकारांना चुप बसवत आहे. अशावेळेस बाजूला असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या एक शब्दही बोलत नाहीयत. त्यामुळे मूळ मुद्दा हा त्यांचा वर्तनाचा आहे”, अशी टीका सपकाळ यांनी केली.

काँग्रेसने वापरलेला शब्द शिवी आहे का? सपकाळ यांचा सवाल

“उपमुख्यमंत्रीपदावरची व्यक्ती पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही आणि त्यांच्यासमोर आमदार पत्रकारांना चुप बसवतात हे लोकशाहीला अशोभनीय आहे. अशावेळेस हाताची घडी तोंडावर बोट ठेवणं म्हणचे चुप बसणं अशी भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतल्याने काँग्रेसने ट्विटमध्ये गुंगी गुडिया असा शब्दप्रयोग केला आहे”, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

“गुंगी गुडिया शिवी आहे का? अपशब्द आहे का? असंसदीय शब्द आहे का? तर नाही. हे एक वर्णन आहे. जसा तो शब्द आहे तशा स्वरुपात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर अत्यंत व्यवस्थित बसला आहे”, अशी टीका त्यांनी केली.

‘सुनेत्रा पवारांचा मुकेपणा अशोभणीय’, सपकाळांची खोचक टीका

“सुनेत्रा पवार अनेक विषयांवर बोलत नाहीत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर सुनेत्रा पवार बोलत नाहीत. या अपघातात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल का होत नाही? त्यावर त्या बोलत नाहीत. अर्थ खातं अद्याप मिळालं नाही. त्यावर त्या बोलत नाहीत. भाजप पक्ष सुनेत्रा पवार यांच्या पक्षावर आणि पक्षातील लोकांवर फार मोठ्या प्रमाणात गदा आणत आहे. तेव्हाही त्या बोलत नाहीत. त्यांनी जो मुकेपणा आणला आहे, हे मुकेपण उपमुख्यमंत्रीपदाच्या नेत्यासाठी अशोभणीय आहे”, अशी खोचक टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

‘शहाणपणा शिकवू नका’

“कुठे अजित पवार यांच्यासारखा खमका नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसचे मतभेद होते, पण त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगाने कुठली शंका उपस्थित होऊ शकली नाही. अशा बाणेदार आणि परफेक्ट माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करणारी व्यक्ती काही बोलत नाही तर त्यांचं काँग्रेस पक्षाने केलेले वर्णन योग्य अत्यंत योग्य आहे. या टीकेला त्यांनी समजून घ्यावं. त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये”, अशा शब्दांत सपकाळ यांनी निशाणा साधला.

‘दुर्गा आहे असं त्यांनी सिद्ध करावं’

“इंदिया गांधी यांनादेखील एका काळात गुंगी गुडिया म्हटलं गेलं. त्याच इंदिरा गांधी यांनी आपल्या कतृत्वातून त्या टीकेला उत्तर दिलं होतं. थेट अटलबिहारी वाजपेयी सारख्या नेत्यांना त्यांना दुर्गा म्हणावं लागलं. सुनेत्रा पवार यांनी देखील त्या दुर्गा आहेत हे सिद्ध करुन दाखवावं”, असं आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं आहे.

“सुनेत्रा पवार यांनी त्या दुर्गा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी तातडीने अर्थखातं स्वत:कडे घ्यावं. अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा शोध लावल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे सांगावं. त्यांनी ताबोडतोब लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय घ्यावा. तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. त्यांनी स्मार्ट मीटर रद्द करावे. त्यांनी असं केलं तर आम्ही त्यांना दुर्गा म्हणू”, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळांकडून निवडणूक आयोगाचा उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोदी-शाह यांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे का, अशी परिस्थिती झाली आहे. आता थेट निवडणूक आयोगाने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून तुम्ही आणि तुमच्या मुलांकडे अधिकार घेत असताना पक्षाच्या घटनेला अनुसरुन नाही, असं म्हटलं आहे. या प्रश्नाचं उत्तरही सुनेत्रा पवार यांनी दिलं नाही. त्या काहीच बोलत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर आमच्यापक्षाने गुंगी गुडिया असा केलेला आरोप योग्य आहे”, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केल्यानंतर काँग्रेसने देखील जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.