Headlines

जायकवाडीतून 9 हजार क्युसेकने विसर्ग वाढला‎:मंगळवारी सायंकाळी 9,500; रात्री 11 वाजता 19,026 तर बुधवारी 28,134 क्सुसेकने पाणी सोडले‎




जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर कायम आहे. परिणामी धरण प्रशासनाने मुख्य सांडव्यावरील १८ दरवाजे दीड फूट उंचावून गोदावरी नदीपात्रात २८ हजार १३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. याशिवाय उजव्या कालव्यातून १ हजार आणि माजलगाव धरणासाठी डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे धरणातून होणारा एकूण विसर्ग २९ हजार ८३४ क्युसेकवर पोहोचला आहे. दरम्यान, धरणाच्या पायथ्याशी असलेला पूल वाहनासांठी बंद करण्यात आला असून बुधवारी २ हजार पर्यटकांनी धरणाला भेट दिला. मात्र, या ठिकाणी सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. सध्या जायकवाडी धरण ९३.४९ टक्के भरले असून धरणात ७१.६६ टीएमसी जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणात ३३ हजार ६१४ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. आवक कायम राहिल्यास पुढील काही तासांत विसर्गात आणखी वाढ केली जाण्याची दाट शक्यता असल्याचे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी सांगितले. पोलिसांनी धरणावर गस्त वाढवली आहे. धरण परिसरात बंद असलेली पोलिस चौकी पुन्हा सुरू करून २४ तास बंदोबस्त तैनात करावा, मुख्य सांडव्याजवळ आणि पुलावर लोखंडी बॅरिकेड्स उभारणे, सीसीटीव्ही बसवणे, धोक्याचे फलक लावणे आणि रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीसाठी बोट, लाइफ जॅकेट आणि प्रशिक्षित बचाव पथक धरण परिसरात कायमस्वरूपी तैनातची मागणी आहे. उघडलेले दरवाजे आणि पाण्याच्या फेसाळणाऱ्या धारांचे दृश्य पाहण्यासाठी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी उसळत आहे. मात्र, धोकादायक ठिकाणी उभे राहून मोबाइलवर सेल्फी आणि व्हिडिओ काढण्याचा वाढता मोह प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी धरण परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, बुधवारी २ हजार नागरिकांनी जायकवाडी धरण पाहण्यास हजेरी लावली. याठिकाणी सेल्फी, व्हिडीओ न काढण्याचे आवाहन केले आहे. कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी पर्यटकांना नदीपात्रात किंवा पाण्याच्या जवळ न जाण्याचे आवाहन केले. तर पाण्याची आवक पाहता कोणत्याही क्षणी विसर्ग वाढवला जाऊ शकतो. पुलावरून वाहतूक किंवा पायी ये-जा करू नये, असे पोलिस निरीक्षक महादेव गोमारे म्हणाले. धरणाचे १८ दरवाजे उघडल्यानंतर गर्दी आणि धोके लक्षात घेता पाटबंधारे विभागाने सुरक्षेची सूत्रे हलवली आहेत. धरण आणि गोदावरी नदीपात्र धोकादायक ठिकाणी अनर्थ घडू नये यासाठी विभागाचे २८ सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. हे कर्मचारी २४ तास कार्यरत असून, मुख्य भिंतीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. पर्यटकांची वाढती गर्दी पाहता सिंचन विभाग, पोलिस प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने संयुक्त कृती आराखडा तयार करून कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी रोटरी क्लबचे अध्यक्ष पवन लोहिया, बलराम लोळगे व नागरिकांनी केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत