प्राचीन इतिहासाच्या वारशाला सामावून असलेल्या इजिप्तच्या एका शहरात पुरातत्वतज्ञांनी 18 मकबऱ्यांचा शोध लावला आहे. इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातन अवशेष मंत्रालयाने याची घोषणा करतहे मकबरे अलेक्झेंड्रियापासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्यावर मरीना अल-अलामीनमध्ये शोधण्यात आले आहेत. हे मकबरे टॉलमी किंवा रोमन शासनाच्या काळातील असल्याचा अनुमान लावण्यात आला आहे. या मकबऱ्यांमध्ये चकित करणाऱ्या गोष्टी मिळाल्या आहेत.
टॉलमी वंशाच्या शासनादरम्यान इजिप्तवर अलेक्झांडरच्या एका सेनापतीच्या वंशजांनी शासन पेल होते, जे ख्रिस्तपूर्व 322 पासून 30 सालापर्यंत होते. या वंशाची अखेरची शासक क्लियोपेट्रो होती, जिच्या मृत्यूनंतर हा रोमन साम्राज्याचा हिस्सा ठरला होता. येथे रोमन शासन ख्रिस्तपूर्व 30 पासून ईसवी सन 395 पर्यंत जारी राहिले.
मकबऱ्यात मिळाली सोन्याची जीभ
11 मकबरे जमिनीत अत्यंत खोलवर खोदण्यात आले होते. तर उर्वरित 7 मकबरे जमिनीच्या पृष्ठभागाच्या नजीक होते. या मकबऱ्यांमध्ये सोन्याच्या जिभा मिळाल्या आहेत. या जिभांना बहुधा ममींच्या तोंडात ठेवण्यात आले होते. याचबरोबर एक वेदीही मिळाली असून ज्याच्या आधारावर लाकडी दरवाजाचे डिझाइन कोरण्यात आले होते.
प्राचीन दरवाजा
मकबऱ्यात एक प्राचीन दरवाजा मिळाला असून तो प्राचीन इजिप्तच्या अंत्यसंस्काराशी निगडित वास्तुकलेचा प्रमुख हिस्सा असायचा. इजिप्तच्या पारंपरिक मान्यतांनुसार हा दरवाजा जिवंत लोक आणि मृतांच्या जगादरम्यान एका दुव्याचे प्रतीक होता. मृत याच्या माध्यमातून जिवंत लोकांकडून प्राप्त भेटवस्तू मिळवू शकतात असे मानले जात होते अशी माहिती इजिप्तच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव हाशम हुसैन यांनी दिली आहे.
इजिप्तमध्ये यापूर्वी देखील अनेक ठिकाणी ममीसोबत सोन्याची जीभ मिळाली आहे. सोने देवतांचे मांस असते असे प्राचीन इजिप्तच्या लोकांचे मानणे होते. सोन्याची जीभ मृत्यूनंतर देवतांसोबत संभाषण करण्यास मृतांना मदत करू शकते असा त्यांचा विश्वास होता.
