Online Dating Fraud: दिल्लीतील एका तरुणाची डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या तरुणीकडून फसवणूक झाली. ती त्याला एका मोठ्या पबमध्ये घेऊन गेली आणि सुमारे २० हजार रुपयांचं बिल करून निघून गेली. हा अनुभव शेअर करत त्याने इतर तरुणांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

नेमकं घडलं तरी काय?
हा अनुभव r/delhi या रेडिट पेजवरील Big_Cauliflower_7127 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर घडलं असं की, दिल्लीतील एक तरुण ब्लाइंड डेटवर गेला होता. डेटिंग अॅपवरून एका तरुणीसोबत त्याची ओळख झाली आणि एका मोठ्या पबमध्ये दोघांची भेट झाली. दरम्यान, गप्पागोष्टी करत असताना तरुणीने १३ हजार रुपयांची शॅम्पेन, ६ हजार रुपयांचे दोन हुक्के आणि काही खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली.
लक्षवेधी बाब म्हणजे, खाणं-पिणं झाल्यानंतर बिल देण्याची वेळ आली तेव्हा ती गुपचूप वॉशरूममध्ये निघून गेली. तरुणाला वाटलं होतं की, बिल दोघं अर्धं-अर्धं वाटून घेतील. मात्र, तिने बिलाबाबत साधी विचारपूसही केली नाही. या पोस्टच्या शेवटी तरुण म्हणतो की, बिल भरावं लागलं याचं दुःख नाही; पण हा अनुभव खूपच वाईट होता. किंबहुना, आपली फसवणूक झाल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली.
(फोटो सौजन्य – Emanuel Pedro/pexels.com)
नेटकरी काय म्हणताहेत?
ही पोस्ट आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी पाहिली असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींच्या मते, दिल्लीमध्ये अशा प्रकारची फसवणूक आता सामान्य झाली आहे. त्यामुळे डेटिंग अॅप्स वापरताना अधिक सावध राहणं गरजेचं आहे. तर काहींनी अनोळखी लोकांना भेटताना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण अशा प्रकारे फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

