Headlines

बलराज संघई यांचा कॉलम:गुरु पौर्णिमा विशेष: गुरु – ईश्वराहून मोठे स्थान




माणसाच्या जीवनामध्ये गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या दृष्टीने गुरुला ईश्वराहून मोठं म्हटलं तरी चालेल. ईश्वर प्रत्येक ठिकाणी असतो परंतु तो तितक्या जीवांना समजतो? प्रत्येक जीवातला सृष्टीतला, निसर्गाच्या प्रत्येक कणाकणात वसलेला ईश्वर समजून देण्याचं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य गुरु करत असतात. जो आपल्याहून अधिक बुद्धिमान, अनुभवी, समजदार, काहीतरी जास्त येणारा असा जो कोणीतरी सतत आपल्या कृतीतून वक्तव्यातून, कळकळीची विनंती करतो व इतरांना त्या बाबतीत सुधारण्याचा प्रयत्न करत असतो तोच तर गुरू असतो. साधारणपणे आपण सुरुवातीला आई-वडिलांकडून, घरातील मोठ्या व्यक्तींकडून, समाजातील वयस्कर व्यक्तींकडून आणि शाळेतील शिक्षकांकडून काही तरी सतत शिकत असतो. तर काही व्यक्ती मात्र विशिष्ट विषयांची शिकवण देत असतात. शिक्षण उद्देशाच्या दृष्टीने गुरु दोन प्रकारचे म्हणावे लागतील. लौकिक गुरु : आई-वडील, शिक्षक आणि इतर. जगण्याचे नैतिक नियम शिकवणारे, आपल्यात सतत काही ना काही सुधारणा करणारे. भौतिकतेच्या विषयात व संसारासंबंधी जगण्याशी निगडित गोष्टी शिकवणारे त्यांनाही पर्यायाने गुरु म्हणावे लागेल. लोकोत्तर गुरु : आध्यात्मिक शिक्षण देणारे, स्वतः साधनेमध्ये असून इतरांना साधना आदर्श, प्रशिक्षण देणारे, धर्माचे अनुकरण करत धर्माचा प्रसार करणारे, मुक्ती मार्गाचा स्वतः उद्देश धारण करून इतरांना त्या मार्गावर प्रवृत्त करणारे. अशा सर्व साधू संत प्रवर्तक महात्म्यांना गुरु म्हणतात. आपल्याला सर्व काही समजतं असे नव्हे. ते जसं आहे तसं किंवा असेल तसं आणि त्याचे सत्य स्वरूप समजण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. आपल्यामध्ये ज्ञान असतं परंतु ते निमित्ताने प्रगट होण्यास स्पष्ट होण्यास गुरुचे मोलाचे योगदान असते. दिवा असतो, वात असते, तेल असते परंतु त्याला प्रज्वलित करणारा कोणीतरी असावा लागतो. तोच तो गुरु. मराठीत म्हटलं आहे ज्याच्या जीवनात गुरु त्याचे जीवन खऱ्या अर्थाने सुरू. आपल्या जीवनाच्या उद्देशानुसार आपण गुरुची निवड केली पाहिजे. गुरु मध्येही उत्कृष्ट गुरु असतात. हिंदीमध्ये म्हणतात; पानी पीजे छान के गुरु कीजे जान के अर्थात् : यांच्याकडून आयुष्याचे जगण्याचे आणि मुक्तीचे तत्वज्ञान घ्यायचे आहे, ज्यांच्या मार्गाचे अनुसरण करायचे आहे, ज्यांच्या मागे मागे चालायचे आहे; तो गुरु देखील आपण योग्य असा निवडला पाहिजे. तर या ठिकाणी उत्कृष्ट गुरु कोणास म्हणावे मूळ शास्त्रात याचा उल्लेख आढळतो: सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम गुरु : जो १ वितराग : राग द्वेषाने रहित
२ सर्वज्ञ : ज्ञानी [ संपूर्ण ]
३ हितोपदेशी शास्त्राचा कर्ता [ सर्व जीवांना कल्याणकारी मार्ग दर्शवणारा असा आहे. आपल्या जीवनाचा सर्वांगीण सुधार करत मुख्य उद्देशाकडे नेऊन पोहोचवणाऱ्या गुरुबद्दल आपल्याला सतत आदर व भक्ती भाव असला पाहिजे. गुरुच्या वचनावर इतकी श्रद्धा असायला हवी की ” गुरुचा शब्द आदेश आणि वाक्य प्रमाण ” असेच मानावे. एकदा का गुरु जाणला, मानला की त्या आदरणीय गुरूंचे आपल्याकडे सतत लक्ष असते. ते आपल्यासमोर असोत अथवा नसोत, ते जवळ असोत अथवा दूर असोत, ते विद्यमान असोत अथवा निर्वाण स्थानी पोहोचलेले असोत. असतील तेथून गुरूंचे आपल्यावर सतत लक्ष असते. म्हणून वेळ संकटाची असो नसो, वेळ आनंदाची दुःखाची कुठलीही असेल ; वेळोवेळी आठवेल तेव्हा, शक्य होईल तेव्हा गुरुचे नामस्मरण करावे. एक अद्भुत शक्ती आपल्या सोबत असल्याचा अनुभव होईल. म्हणून जीवनामध्ये गुरुचे स्थान ईश्वराहून देखील महत्त्वाचे आहे असेच मला वाटते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत