म.टा. खास प्रतिनिधी, ठाणे: ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीन हात नाका चौकाच्या वाहतूककोंडी मुक्तीसाठी महत्त्वाकांक्षी तीन हात नाका सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प शहरातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक वाहतूक सुधारणा प्रकल्पांपैकी एक असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यामध्ये इंदिरानगर–रूपादेवीपाडा जलपुरवठा प्रकल्प, विविध रस्ते व पायाभूत सुविधा तसेच यशवंत रामा आंतरराष्ट्रीय तरणतलाव आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा समावेश होता.
‘मुख्यमंत्री असताना मंजूर केलेला हा सुमारे २०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होत आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे तीन हात नाक्यावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या सात प्रमुख वाहतूक प्रवाहांपैकी चार प्रवाह सिग्नलमुक्त आणि सुरळीत होतील. त्यामुळे लाखो वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचणार आहेत. या चौकावरील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून उपाययोजनांची अपेक्षा होती. मात्र, अशक्यप्राय वाटणाऱ्या या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुढील दीड वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,’ असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विकासकामांची पायाभरणी
२१ इंदिरानगरसाठी ३१ एमएलडी आणि रूपादेवीचा पाड्यासाठी एमएलडी अशी एकूण ५२ एमएलडी पाणीपुरवठा क्षमता निर्माण करण्यात आली आहे. तर रूपादेवी मंदिर परिसरातील मुलांसाठी मैदान कायम खुले राहील, या जागेवर कोणतेही बांधकाम होणार नाही, असा शब्द देत रूपादेवी मंदिर परिसर आणि हँगिंग गार्डनच्या सुशोभीकरणासाठी ३० कोटी रुपयांची घोषणा शिंदे यांनी केली. यशवंत रामा साळवी आंतरराष्ट्रीय तरणतलाव आणि क्रीडा संकुलाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर आदी उपस्थित होते.
युरोपीयन सल्लागारांच्या सहकार्याने हा प्रकल्प साकार करण्या येणार आहे. या योजनेत बांधकामादरम्यान आणि त्यानंतर सुरळीत वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी पाण्याच्या पाईपलाईन, गॅस लाईन आणि इंधन नेटवर्क यांसारख्या भूमिगत सुविधांचे तपशीलवार मॅपिंग समाविष्ट आहे. सिग्नलवर केवळ १५ सेकंद विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कार्यक्रमादर्मयान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या कामांना वेग देण्याचे निर्देश दिले आहेत.
यावेळी त्यांनी ठाणे कोस्टल रोड आणि इस्टर्न फ्रीवेच्या विस्तारावरही प्रकाश टाकला. खेडा नगरपासून आनंद नगर, साकेत, गायमुख आणि फाउंटन हॉटेलमार्गे इस्टर्न फ्रीवे विस्ताराला जोडण्यासाठी एका उन्नत मार्गाची योजना आखण्यात आली आहे. अहमदाबाद, जेएनपीटी आणि मुंबईहून येणाऱ्या अवजड व्यावसायिक वाहनांची वाहतूक शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून वळवण्यासाठी हा मार्ग बांधण्यात येत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा