Headlines

चिकन नेक नव्हे आता ’एलिफंट ट्रंक‘


सिलिगुडी कॉरिडॉरवर शत्रू डोळे वटारू शकणार नाही : भारताचे सर्वात मजबूत अन् अभेद्य द्वार

वृत्तसंस्था/कोलकाता

दशकांपासून जगभरातील कूटनीतिक तज्ञांच्या नजरेत भारताचा जो हिस्सा सर्वात ‘कमजोर नस’ मानला जात होता, तो आता देशाची सर्वात मोठा शक्ती ठरला आहे. उत्तर बंगालनजीक स्थित सिलिगुडी कॉरिडॉर केवळ 17-22 किलोमीटर रुंद चिंचोळा पट्टा असून त्याला नेहमीच ‘चिकन नेक’ म्हटले जात राहिले आहे. हा कॉरिडॉरवर आक्रमण करत शत्रू पूर्ण ईशान्य भारताचा संपर्क तोडू शकतो, असे बोलले जात होते. परंतु भारताने आता पूर्ण कहाणी बदलली आहे. हा मार्ग आता चिकन नेक राहिला नाही, तर एक शक्तिशाली एलिफंट ट्रंक म्हणजेच ‘हत्तीच्या सोंडेत’ रुपांतरित झाला असल्याचे भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.

भारतासाठी महत्त्वपूर्ण कॉरिडॉर

सिलिगुडी कॉरिडॉर ईशान्येतील राज्यांसाठी जीवनरेषा असल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा कॉरिडॉर भारताला ईशान्येतील 8 राज्यांसाठी जोडणारा एकमात्र भूमार्ग आहे. ईशान्येला जोडणारे जवळपास सर्व प्रमुख रेल्वेमार्ग, रस्तेमार्ग, इंधन आणि सैन्यपुरवठा याच चिंचोळया मार्गातून जात असतो. या भूगोलामुळेच याला भारताची सर्वात मोठी रणनीतिक कमजोरी मानले जात होते. कुठल्याही मोठ्या संघर्षात या चिंचोळ्या मार्गात अडथळे निर्माण झाल्यास ईशान्येत सैन्य आणि इतर आवश्यक सामग्री पोहोचविणे ठप्प होण्याची भीती होती.

चिकन नेक ठरला ‘एलिफंट ट्रंक’

सैन्य अधिकारी आता या सिलिगुडी कॉरिडॉरला ‘हत्तीची सोंड’ ठरवत आहेत. हत्तीची सोंड नाजुक दिसत असली तरीही अत्यंत शक्तिशाली अन् लवचिक असते. सैन्याच्या अधिकाऱ्यांनुसार 2014 नंतर पासून केंद्र सरकारने भारताच्या पूर्व सीमेवर स्वत:चे लक्ष अत्यंत वेगाने वाढविले आहे. या चिंचोळ्या मार्गाच्या संरक्षणासाठी बचावात्मक विचाराला बदलून याला आक्रमक रुप दिले आहे.

थ्री-गॅरीसन शील्ड

सिलिगुडी कॉरिडॉरला अभेद्य करण्यासाठी तीन सैन्यतळांचे सुरक्षा चक्र ‘थ्री-गॅरीसन शील्ड’ म्हणजेच तीन सैन्यतळांचे सुरक्षा चक्र निर्माण करण्यात आले आहे. आसाममध्ये लाचित बोरफुकन सैन्यतळ सैन्यासाठी दारूगोळ्याचे मोठे लॉजिस्टिक्स हब आहे. तर बिहारचा किशनगंज तळ आवश्यकता भासल्यास ईशान्येच्या दिशेने सैन्याला जलदपणे पाठविण्याचे काम करतो. पश्चिम बंगालचा चोपडा तळ आंतरराष्ट्रीय सीमेच्या अत्यंत नजीक आहे आणि हा तळ आपत्कालीन स्थितीत त्वरित कारवाई करणे आणि देखरेखीसाठी निर्माण करण्यात आला आहे.

चीन अन् बांगलादेश सीमेवरील तयारी

भारताची नजर केवळ कॉरिडॉरवर वाचविण्यावर केंद्रीत नसून शेजाऱ्यांच्या कृतींवर देखील आहे. भूतान अन् सिक्कीमदरम्यान स्थित चुम्बी खोरे सिलिगुडी कॉरिडॉरच्या अत्यंत नजीक आहे, तेथे चीनची सैन्यउपस्थिती नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्याच्या त्रिशक्ती कॉर्प्सला एस-400 हवाई सुरक्षा प्रणाली, ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रs, राफेल लढाऊ विमानांनी युक्त करण्यात आले आहे. याचबरोबर बांगलादेशात अलिकडच्या काळात घडलेली राजकीय उलथापालथ पाहता चोपडा तळाच्या मदतीने सीमा व्यवस्थापन आणि देखरेखीला आणखी कठोर करण्यात आले आहे. तर सीमावर्ती भागांमध्ये वेगाने पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. युद्धावेळी सुरक्षित वाहतुकीसाठी भूमिगत रेल्वे सुविधा निर्माण करण्याची देखील तयारी आहे. तर म्यानमारमार्गे कालादान मल्टी-मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पावर काम जारी आहे, जेणेकरून ईशान्येपर्यंत पोहोचण्यासाठी सिलिगुडी कॉरिडॉरच्या व्यतिरिक्त अन्य पर्यायी मार्ग देखील उपलब्ध रहावा.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत