महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. फार मोजक्याच ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलं आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलेलं बघायला मिळत आहे. यासोबतच ठाणे जिल्ह्यातही सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. ठाण्यातील कल्याण डोंबिवलीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तसेच नाशिकमध्ये देखील पावसाचा हाहा:कार बघायला मिळतोय. मुसळधार पावसाने नाशिकमध्ये रामकुंड परिसरात अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस
महाराष्ट्रातील पालघर जिल्हा आणि गुजरातच्या वलसाड, उंबरगाव परिसरात पावसाचे ढग मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले आहेत. त्यामुळे तिथे पाऊस देखील तसाच पडत आहे. गुजरातच्या उंबरगाव येथे तर केवळ 24 तासात तब्बल 906 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच वलसाडमध्येदेखील मुसळधार पाऊस सुरु आहे. गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात देखील पावसाचं रौद्ररुप बघायला मिळत आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासांच मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आल्यासारखी स्थिती आहे. मुसळधार पाऊस आणखी पुढचे 24 तास राहणार असल्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्याला पुढच्या 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग तब्बल 70 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासन अलर्टवर आहे. प्रशासनाचे कर्मचारी संभाव्य धोका लक्षात घेऊन अलर्टवर आहेत. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
ठाणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस
ठाणे जिल्ह्यालादेखील पुढच्या 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याण डोंबिवलीत बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच आहे. सकाळीदेखील संततधार सुरु होती. पावसासह वारा देखील मोठ्या प्रमाणात आहे.
सखल भागात पाणी साचण्याची भीती
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यात वाऱ्याचा वेग हा ताशी 70 किमी असा राहण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत दुपारनंतर पावसाने आक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे. पाऊस असाच पडत राहिला तर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती आहे.
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
नाशिकमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. नाशिकमघ्ये दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचलं आहे. रामकुंड परिसरातील मंदिरं, रामसेतू पूल पाण्याखाली गेला आहे. गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
नाशिकमध्ये २२ जुलैच्या सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसाची संततधार ही दुसऱ्या दिवशी देखील कायम असल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणाची पाणीपातळी अचानक वाढली होती. त्यामुळे नाशिकमधील प्रमुख नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीमध्ये टप्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग हा करण्यात येत आहे.
सायंकाळपर्यंत हा विसर्ग २० ते ३० हजार क्युसेक इतका करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली. त्यामुळे नदीकाठच्या रहिवासी आणि व्यावसायिक यांनी सतर्क रहावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.
पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत दुपारी साडे तीन वाजेपर्यंत पाणी लागले होते. त्यामुळे गोदावरी नदीचे पूर परिस्थिती ही वाढत वाढल्याने नदी लगत असलेल्या भांडी बाजार, सराफ बाजार यासोबतच पुढे सायखेडा चांदोरी, सायखेडा, निफाड या गावच्या नदी काठी राहणाऱ्या गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट
हवामान विभागाकडून राज्यातील पालघर, ठाणे, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर या भागांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा