ख्रिस्तियानो रोनाल्डो… हॅरी केन… किलियन एम्बापे असे ‘स्टार’ खेळाडू नाहीत आणि प्रतिस्पर्धी संघाचा दबदबा जगभरात ठाऊक; तरीही स्पेनने रविवारी बलाढ्य अर्जेंटिनावर मात करून वर्ल्ड कप फुटबॉलमधील विजेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. याआधी स्पेनच्या महिलांनीही विश्वचषक जिंकला होता, हे विशेष. काही उचित नि काही अनुचित कारणांसाठी गाजलेल्या या स्पर्धेत स्पेनने मिळवलेले हे यश अनेक अर्थांनी जागतिक फुटबॉलसाठी मोलाचे; तसेच अनेकांना धडे देणारे. त्यातला सर्वांत महत्त्वाचा धडा म्हणजे ‘साथी हाथ बढाना’ हे सूत्र! फुटबॉल हा सांघिक खेळ आहे. त्यातील यश हे संघाचे असते; कोणा एका खेळाडूचे नसते, ही खूणगाठ स्पेनच्या खेळाडूंच्या मनाशी पक्की बाधलेली. लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना, ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल, हॅरी केनचा इंग्लंड, किलियन एम्बापेचा फ्रान्स… अशी समीकरणे असली तरी ‘लामिन यमालचा स्पेन’ असे नाही म्हणता येत. भक्कम बचाव, संयम, योजनाबद्ध पासिंग आणि त्यापेक्षाही सांघिक कामगिरी ही स्पेनच्या विश्वविजयाची चतुःसूत्री. ‘आपल्याला मेस्सीला करंडक जिंकून द्यायचा आहे…’ असल्या व्यक्तिकेंद्री भावनांच्या मैदानात हा संघ कधीही उतरत नाही. आपल्याकडील क्रिकेटमध्ये असली उदाहरणे रग्गड! अशा भावनांच्या पल्याड जाऊन खेळ केल्यास काय होऊ शकते, हे स्पेनने दाखवून दिले आहे. ‘ला मार्चा रेयाल…’ हे स्पेनच्या राष्ट्रगीतातील शब्द. शाही संचलन हा त्याचा अर्थ. स्पेन संघाच्या विश्वविजयासाठी हे वर्णन अगदी चपखल ठरते.
या विजयामधून ठळकपणे नजरेत भरते ती त्या देशातील फुटबॉल क्लब्जची संस्कृती. स्पेनमध्ये फुटबॉलपटूंसाठीच नव्हे, तर मार्गदर्शकांसाठीही अकादमी आहेत. स्पेनने २०१०मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता त्या वेळी त्या संघात बार्सिलोना क्लबचे सात खेळाडू होते; तर या वेळच्या संघात बार्सिलोनाचे दहा खेळाडू होते! यावरून या क्रीडाजाळ्याचे महत्त्व लक्षात यावे. स्पेन संघाभोवती प्रसिद्धीचे वलय नाही; त्यामुळे ते केवळ युरोपियनच नव्हे तर ऑलिम्पिक विजेतेही होते, हे वास्तव जणू सारेच विसरले होते. उलट अर्जेंटिनाला प्रेक्षकांसह अनेक घटकांची साथ होती. त्यांच्या पराभवाने जगभरातील चाहते निराश झाले. स्पेनची या स्पर्धेतील कामगिरी सातत्यपूर्ण तर होतीच, शिवाय ती फुटबॉल या खेळाचे मूळ जपणारी अशी होती. त्यांनी अंतिम सामन्यातही पासिंगला महत्त्व देत संधी निर्माण केल्या. त्याच वेळी बचावात; तसेच आक्रमणात सर्वांचा सहभाग राहील, अशा चाली रचल्या. या संपूर्ण स्पर्धेत स्पेनला केवळ एक गोल स्वीकारावा लागला! बचाव व आक्रमण यांना समसमान संधी दिल्याचेच हे द्योतक.
जगातील कोट्यवधी क्रीडाप्रेमींना या स्पर्धेने खेळाचा आनंद दिला हे खरेच; मात्र त्या संदर्भातील काही बाबींची रुखरुख क्रीडाप्रेमींना लागलेली आहे. त्यास बऱ्याच अंशी कारणीभूत आहे तो जागतिक फुटबॉल महासंघ म्हणजे ‘फिफा’. वर्ल्ड कप फुटबॉलचे ‘अमेरिकीकरण’, तिकिटाचे अचाट दर, हायड्रेशन ब्रेकचा मुद्दा, अंतिम सामन्याचे लांबलेले मध्यांतर, व्हिडीओ असिस्टंट रेफ्रींचा वाढता हस्तक्षेप या बाबी खेळासाठी कितपत पोषक आहेत, यावर ऊहापोह व्हायला हवा. ही स्पर्धा अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी तर होत नाही ना, इतकी शंका यावी असे या स्पर्धेतील रेफ्रींचे निर्णय होते. अंतिम सामन्यातही काही वेगळे चित्र दिसले नाही. सोबतच ऊहापोह व्हायला हवा तो यजमान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दांडगाईचा. अमेरिकी खेळाडूला दाखवण्यात आलेल्या रेड कार्डच्या शिक्षेचे स्वरूप बदलणे भाग पाडण्यापर्यंत या गृहस्थांची मजल गेली. या स्पर्धेसाठी खेळाडू, पदाधिकारी अमेरिकेत येताना त्यांना त्रास कसा होईल, हे बघितले गेले. ही ट्रम्पशाहीची किमया. दोनशेहून अधिक देश सदस्य असलेल्या ‘फिफा’ने अशा शक्तींपुढे किती झुकावे यालाही मर्यादा आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या भारताकडे बघायला हवे. वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचा विषय निघाला की, ‘या स्पर्धेला केप वेर्देसारखा कमी लोकसंख्येचा देश पात्र ठरतो; पण भारत नाही,’ याकडे बोट दाखवले जाते, ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी हेटाळणी केली जाते. पण, भारतीय संघ वर्ल्ड कप फुटबॉलच्या पात्रता स्पर्धेत खेळत असतो, त्या वेळी आपण त्यांचा निकाल तरी मोबाइलवर स्क्रोल करून बघतो का, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने शोधावे! तूर्त स्पेनच्या यशाचा आनंद घेऊ या आणि त्यातून आपल्याला काही शिकता येते का ते बघू या!
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा