व्हरेस्ट शिखरावरून सुरक्षितपणे खाली आल्यानंतर विवेक शिवदेने माझ्याकडे उच्चारलेले पहिले वाक्य होते… ‘मामा, एव्हरेस्ट हा एव्हरेस्टच आहे…’ जगातील तिसऱ्या क्रमांकाचे आणि एव्हरेस्टपेक्षा अधिक तांत्रिक मानले जाणारे कांचनजंगा शिखर यशस्वीपणे चढलेला गिर्यारोहक , मेरू, मंदासारख्या अवघड पर्वतांवर चढाई केलेला अनुभवी हिमालयवीर, आणि अनेक उच्च हिमालयीन मोहिमांचा अनुभव असलेला विवेक. त्यामुळे त्याच्याकडून एव्हरेस्टबद्दल काही वेगळे ऐकायला मिळेल असे वाटले होते. पण त्याने एका वाक्यात एव्हरेस्टचे संपूर्ण वर्णन करून टाकले.
गेल्या तेरा-चौदा वर्षांत एव्हरेस्टबद्दल अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आधुनिक कपडे आले, अधिक सक्षम ऑक्सिजन प्रणाली आल्या, हवामानाचे अचूक अंदाज उपलब्ध झाले, हेलिकॉप्टर रेस्क्यू वाढले. या सगळ्यामुळे अनेकांच्या मनात एक धारणा निर्माण झाली की एव्हरेस्ट आता सोपा झाला आहे. यावर्षी २०२६ मध्ये पुन्हा एव्हरेस्ट मोहिमेचे नेतृत्व करताना मला या समजुतीचा वारंवार विचार येत होता. २०१२ मध्ये गिरिप्रेमीची पहिली एव्हरेस्ट मोहीम झाली. नंतरच्या तेरा वर्षांत जग बदलले होते. पण एव्हरेस्ट बदलला असेल का? या प्रश्नाचे उत्तर मला एव्हरेस्ट बेस कॅम्पमध्ये पोहोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी मिळाले. पहाटे तंबूच्या बाहेर आलो आणि समोर खुम्बू हिमप्रपात दिसला. एव्हरेस्ट परिसरातील तो सर्वात धोकादायक, सर्वात अस्थिर आणि सर्वात भयावह भाग. हजारो टन बर्फ सतत सरकत असतो. आज असलेला मार्ग उद्या नसेल याची खात्री नसते. त्या दृश्याकडे पाहताना मनात आलेला पहिला विचार होता – काहीच बदललेले नाही.
एव्हरेस्ट अजूनही तसाच आहे. खरे तर एव्हरेस्टची लढाई शिखराच्या दिवशी सुरू होत नाही. ती बेस कॅम्पमध्ये सुरू होते. एव्हरेस्ट मोहिमेतील सर्वांत कठीण गोष्ट कधी कधी चढाई नसते; प्रतीक्षा असते. कधी हिमवर्षावामुळे थांबावे लागते. कधी वाऱ्यामुळे. कधी हिमप्रपातातील परिस्थितीमुळे. लोक अनेकदा विचारतात – भीती वाटत नाही का? गिर्यारोहणात भीती हा चुकीचा शब्द आहे. धास्ती वाटते, आणि ती वाटलीच पाहिजे. ज्याला भीती वाटेनाशी होते तो धोकादायक बनतो. पर्वताबद्दलचा आदर जिवंत ठेवणारी गोष्ट म्हणजे ही धास्ती.
खुम्बू हिमप्रपात ओलांडून वेस्टर्न कूममध्ये प्रवेश केल्यावर वेगळेच जग सुरू होते. सभोवताली एव्हरेस्ट, ल्होत्से आणि नुप्त्से यांच्या प्रचंड भिंती. मधोमध बर्फाचा सागर. दूरून पाहताना हा प्रदेश स्वर्गासारखा वाटतो. पण प्रत्यक्षात तो एक विशाल प्रेशर कुकर असतो. पहाटे उणे वीस ते उणे तीस अंश तापमान असते. काही तासांत दुपारी बाराच्या वेळी इथे ३०-३५ अंश तापमान होते, इतक्या जास्त तापमानात अंगावरील कपडे काढून टाकावेसे वाटतात. एका दिवसात जवळपास पन्नास अंश तापमानाचा फरक शरीर अनुभवत असते.
ल्होत्से फेसवर पोहोचल्यावर पर्वताचे स्वरूप पुन्हा बदलते. निळसर बर्फाची जवळपास सरळ भिंत. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावे लागते. इथे पोहोचल्यावर गिर्यारोहकाला जाणवायला लागते की आता तो खऱ्या अर्थाने एव्हरेस्टच्या प्रभावक्षेत्रात आला आहे.
यावर्षी आमच्या संघातील प्रत्येकाने हा अनुभव वेगळ्या पद्धतीने घेतला. विवेक शिवदेकडे अनुभव होता. कांचनजंगा, मेरू, अनेक हिमालयीन मोहिमा. पण अनुभव असूनही एव्हरेस्टने त्याची परीक्षा घेतलीच. म्हणूनच खाली आल्यावर त्याने ते वाक्य उच्चारले – ‘एव्हरेस्ट हा एव्हरेस्टच आहे.’
मिहीर जाधवची कथा मात्र पूर्णपणे वेगळी होती. त्याच्यासाठी ही केवळ गिर्यारोहण मोहीम नव्हती. त्याच्या वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न त्याच्या खांद्यावर होते. तीन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी एव्हरेस्ट शिखर गाठण्याचा प्रयत्न केला होता. ते कॅम्प ४ ला पोहोचले होते, पण काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना परतावे लागले. यावर्षी जेव्हा मिहीर शिखराच्या दिशेने जात होता, तेव्हा तो एकटा चालत नव्हता. त्याच्यासोबत एका पिढीचे स्वप्न चालत होते. शिखरावर पोहोचल्यावर त्याच्या डोळ्यांतील व मनातील आनंद हा केवळ वैयक्तिक यशाचा नव्हता; तो पित्याच्या अपूर्ण स्वप्नाला पूर्णत्व मिळाल्याचा आनंद होता.
अखिल काटकरचा प्रवास वेगळ्या प्रकारे प्रेरणादायी आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्याकडे पाहून कोणीही सांगितले नसते की हा माणूस कधीतरी एव्हरेस्ट शिखरावर उभा राहील. वजन एकशे दहा ते एकशे पंधरा किलोच्या आसपास, पण एक स्वप्न त्याने मनात जपून ठेवले होते. त्या स्वप्नासाठी त्याने स्वतःला पूर्णपणे बदलले. तीस-पस्तीस किलो वजन कमी केले. वर्षानुवर्षे प्रशिक्षण घेतले. म्हणूनच त्याची शिखर चढाई मला पर्वतारोहणाइतकीच आत्मपरिवर्तनाची कहाणी वाटते.
अखिलची कथा जितकी प्रेरणादायी आहे, तितकीच निकुंज शाहची कथा गिर्यारोहणाचा दुसरा महत्त्वाचा पैलू समोर आणते. निकुंज कॅम्प ४ च्या खालीपर्यंत पोहोचला होता. दोन- तीन वर्षांची तयारी, हजारो तासांचा सराव, असंख्य स्वप्ने आणि शिखर फक्त काही तासांच्या अंतरावर असताना शरीराने वेगळा संदेश द्यायला सुरुवात केली. अशा वेळी गिर्यारोहक दोन मार्गांपैकी एक निवडतो. पहिला म्हणजे अहंकाराचा ‘आता इतके आलोच आहोत तर पुढे जाऊ.’ आणि दुसरा म्हणजे अनुभवाचा – ‘आज नाही तर पुन्हा येऊ, पण सुरक्षित परत जाऊ.’ निकुंजने दुसरा मार्ग निवडला. अनेकांना कदाचित हे अपयश वाटेल. पण गिर्यारोहणात असे नसते. पर्वत तिथेच राहणार असतो. तुमच्याकडे पुन्हा प्रयत्न करण्याची संधी असते. पण चुकीचा निर्णय घेतला तर ती संधी कायमची निघून जाऊ शकते.
यंदाच्या मोहिमेत आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे एव्हरेस्टबद्दल बाहेरच्या जगात निर्माण झालेली आणि प्रत्यक्ष वास्तवातील दरी. सोशल मीडियावर एव्हरेस्ट अनेकदा गर्दी, वाहतूक कोंडी आणि व्यावसायिकतेच्या चर्चांमध्ये अडकतो. काही प्रमाणात त्या चर्चांमध्ये तथ्य असतेही. पण या चर्चांमध्ये एव्हरेस्टचे खरे स्वरूप अनेकदा हरवून जाते. जशी एव्हरेस्टच्या गर्दीची चर्चा होते तशी येथे होणाऱ्या कचऱ्यावरही लोक प्रश्न उभा करतात. मात्र गिर्यारोहक हा एक सच्चा निसर्गप्रेमी आहे तो एव्हरेस्ट होणाऱ्या सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावतो. यावर्षी सगळ्या गिर्यारोहकांना ‘सगरमाथा पोल्युशन कंट्रोल सेंटर’ या बेसकॅम्प स्थित नेपाळ सरकारच्या संस्थेने ‘पू बॅग्स’दिल्या होत्या. आपले मलमूत्र वरच्या कॅम्पवर न सोडता खाली घेऊन यायचे होते. सोबत सगळा कचरा खाली घेऊन येण्याचे बंधन देखील होते, या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून पाच हजार अमेरिकी डॉलर डिपॉझिट घेतले होते. यासाठी नेपाळी सरकारी व्यवस्था अगदी कटाक्षाने काम करते व सर्व गिर्यारोहक या नियमांचे पालन करताना दिसतात.
यंदा एव्हरेस्टवर आणखी एक वेगळा अनुभव आला. तंत्रज्ञानामुळे गिर्यारोहणात होत असलेले बदल प्रत्यक्ष पाहायला मिळाले. पूर्वी हिमदंश म्हणजे अनेकदा कायमस्वरूपी नुकसान असे समजले जायचे. हाताची किंवा पायाची बोटे गमावण्याची वेळ अनेक गिर्यारोहकांवर आली आहे. यावर्षी मात्र बेस कॅम्पमध्ये काही डॉक्टरांनी आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यात इलोप्रोस्टसारख्या औषधांचा समावेश होता. योग्य वेळी उपचार मिळाल्यास हिमदंशामुळे होणारे नुकसान कमी करण्याची आशा निर्माण झाली आहे.
ड्रोनचा वापर हा दुसरा महत्त्वाचा बदल होता. खुम्बू हिमप्रपातातून सामान वाहून नेण्याचे काम हे शेर्पांसाठी नेहमीच सर्वाधिक धोकादायक राहिले आहे. २०१४ मध्ये खुम्बू हिमप्रपातात झालेल्या दुर्घटनेने संपूर्ण गिर्यारोहण विश्व हादरले होते. त्यामुळे यावर्षी ड्रोनद्वारे काही प्रमाणात सामान वाहतूक होताना पाहणे हा एक वेगळाच अनुभव होता. मात्र या सगळ्या बदलांकडे पाहताना एक गोष्ट पुन्हा पुन्हा मनात येत होती. तंत्रज्ञान मदत करू शकते, ते धोका कमी करू शकते, पण शेवटी ती लढाई तुमचीच असते.
याच संदर्भात मला कामी रिता शेर्पांचे उदाहरण द्यावेसे वाटते. जगातील सर्वात अनुभवी शेर्पांपैकी एक. एव्हरेस्ट शिखरावर बत्तीस वेळा गेलेला एकमेव माणूस. यावर्षी तो जेव्हा शिखर चढाई करून खाली आला तेव्हा कोणीतरी विचारले, ‘आता तरी एव्हरेस्ट सोपा वाटतो का?’ तो हसला आणि म्हणाला, ‘मी बत्तीस वेळा एव्हरेस्टवर गेलो आहे. पण बत्तीसच्या बत्तीस वेळा तो वेगळाच वाटला.’ उलट गेल्या काही वर्षांत एव्हरेस्ट चढाई कठीण झाली आहे, असे त्याचे म्हणणे आहे. ‘शिखरमाथ्याजवळ खालच्या भागात असलेल्या बर्फाळ भाग आता उघडा दगडी स्वरूपाचा झाला आहे, येथील बर्फ वितळलेला आहे, त्यामुळे येथून चढाई करताना आम्हा गिर्यारोहकांचा कस लागतो,’ असे तो सांगतो.
२०२६ ची मोहीम आमच्यासाठी केवळ शिखर चढाईची मोहीम नव्हती. ती एका नव्या पिढीची मोहीम होती. विवेकसारखा अनुभवी गिर्यारोहक, मिहीरसारखा तरुण आणि भावनिक ध्येय घेऊन आलेला गिर्यारोहक, अखिलसारखा स्वतःला पूर्णपणे बदलून आलेला गिर्यारोहक आणि निकुंजसारखा योग्य वेळी योग्य निर्णय मान्य करून सत्य स्वीकारणारा अगदी तरुण गिर्यारोहक – या चौघांनी एव्हरेस्टचे चार वेगवेगळे चेहरे दाखवले. मला अनेकदा विचारले जाते, ‘प्रत्येकाने एव्हरेस्ट चढावा का?’ माझे उत्तर नेहमीच ‘नाही’ असे असते. प्रत्येकाने एव्हरेस्ट चढण्याची गरज नाही. प्रत्येकाची स्वप्ने वेगळी असतात. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. प्रत्येकाकडे तितका वेळ, संसाधने किंवा आवड असेलच असे नाही. पण प्रत्येकाने आयुष्यात एखादा एव्हरेस्ट शोधला पाहिजे. अशी एखादी गोष्ट जी प्रथमदर्शनी अशक्य वाटते. अशी एखादी गोष्ट ज्यासाठी स्वतःला बदलावे लागते. अशी एखादी गोष्ट जी आपल्याला आपल्या मर्यादांच्या पलीकडे घेऊन जाते. कारण एव्हरेस्टचे खरे महत्त्व शिखरावर नाही. ते त्या प्रवासात आहे, स्वतःला ओळखण्याच्या प्रक्रियेत आहे, नम्र होण्यात आहे, मर्यादा स्वीकारण्यात आहे, आणि त्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करण्यात आहे.
(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत. )

