Headlines

कापूस लागवडीत आधुनिक तंत्रज्ञान अवलंबा:विखरणमध्ये कापूस क्रांती अभियान; उपकृषी अधिकारी साळुंखेंचे आवाहन‎




“राज्य शासनाच्या कापूस उत्पादकता (कापूस क्रांती) अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हा आहे. कापसाची लागवड करताना ९० बाय १५ आणि ९० बाय ३० सेंटीमीटर अंतराचे तंत्र अवलंबल्यास झाडांची योग्य वाढ होऊन उत्पादनात निश्चितच मोठी वाढ होते,” असे प्रतिपादन उपकृषी अधिकारी किशोर साळुंखे यांनी केले. एरंडोल तालुक्यातील विखरण येथील माळी समाज मंगल कार्यालयात आयोजित शेतकऱ्यांच्या विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्गात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी डी. पी. गंभीरे, मंडळ कृषी अधिकारी ईश्वर पवार, सहाय्यक कृषी अधिकारी कुंदन पाटील तसेच पाणी फाउंडेशनच्या अमळनेर टीमची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमात आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय उपायांचा वापर आणि उत्पादन खर्चात बचत करण्याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी कुंदन पाटील यांनी एकात्मिक कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापनाची माहिती दिली. रासायनिक कीटकनाशकांचा संतुलित वापर करण्याचे आवाहन केले. तर मंडळ कृषी अधिकारी ईश्वर पवार यांनी शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय ॲपचा वापर करून हवामान अंदाज, पीक सल्ला आणि शासकीय योजनांची माहिती मिळवावी, असे सांगितले. या प्रशिक्षण वर्गात महिला बचत गटातील महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. पाणी फाउंडेशनच्या अमळनेर संघाने ‘फार्मर कप’ उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. ग्रामीण भागात पाणी संवर्धन, शाश्वत शेती आणि सामूहिक सहभागाचे काय महत्त्व आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांतून पटवून दिले. आगामी हंगामात कापूस उत्पादन वाढीवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत